टूलकिट: दिशा पाठोपाठ निकिता, शंतनूच्या अटकेची तयारी

टूलकिट प्रकरणी दिल्ली पोलिसांनी दिशा रवी पाठोपाठ निकिता जेकब आणि शंतनू मुळूक या दोघांना अटक करण्याची तयारी सुरू आहे. निकिता आणि शंतनू विरोधात अजामीनपात्र वॉरंट काढण्यात आले आहे.

toolkit case : disha arrested, delhi police issued non bailable warrant aginst nikita and shantanu
टूलकिट: दिशा पाठोपाठ निकिता, शंतनूच्या अटकेची तयारी 

थोडं पण कामाचं

  • टूलकिट: दिशा पाठोपाठ निकिता, शंतनूच्या अटकेची तयारी
  • खलिस्तान समर्थक धालिवालने दिशा, निकिता, शंतनूशी केलेली चर्चा
  • कॅनडातील महिलेच्या माध्यमातून धालीवालने केल्या हालचाली

नवी दिल्ली: टूलकिट प्रकरणी दिल्ली पोलिसांनी वेगवेगळ्या टीम तयार करुन एकाचवेळी अनेक बाबींचा तपास सुरू केला आहे. या प्रकरणात दिशा रवी हिच्या पाठोपाठ निकिता जेकब आणि शंतनू मुळूक या दोघांना अटक करण्याची तयारी सुरू आहे. निकिता आणि शंतनू विरोधात अजामीनपात्र वॉरंट काढण्यात आले आहे. (toolkit case : disha arrested, delhi police issued non bailable warrant aginst nikita and shantanu)

टूलकिट प्रकरणाचे लागेबांधे वेगवेगळ्या देशांतील मोठ्या शहरांमध्ये असल्याचे प्राथमिक तपासात आढळल्याचे दिल्ली पोलिसांनी सांगितले. बंगळुरूतून दिशाला अटक केली आहे. ती पोलीस कोठडीत आहे. मुंबईच्या निकिता जेकब आणि पुण्याच्या शंतनू मुळूक या दोघांच्या टूलकिट प्रकरणातील भूमिकेचा तपास सुरू आहे. निकिता आणि शंतनू या दोघांना तपासाचा भाग म्हणून अटक करण्याची तयारी सुरू आहे. निकिताने अटक टाळण्यासाठी मुंबईच्या उच्च न्यायालयात वकिलामार्फत दाद मागितली आहे. सध्या निकिता आणि शंतनू फरार आहेत.

दिल्ली पोलिसांच्या सायबर तज्ज्ञांनी ठोस माहितीआधारे कारवाई सुरू केली आहे. दिशा आणि निकिताच्या घरातून इलेक्ट्रॉनिक गॅजेट जप्त करण्यात आली आहेत. या गॅजेटची तज्ज्ञांमार्फत तपासणी सुरू आहे. 

बंगळुरूची दिशा रवी ही स्वतःची ओळख पर्यावरण क्षेत्रात काम करणारी कार्यकर्ता अशी करून देते. 'मी २१ वर्षांची आहे आणि पर्यावरण क्षेत्रात काम करत असल्यामुळे स्वीडनच्या ग्रेटा थनबर्गला ओळखते', असे दिशाचे म्हणणे आहे. तर 'दिशा, निकिता आणि शंतनू हे खलिस्तानवाद्यांच्या संपर्कात होते. टूलकिट प्रकरणात चौकशी सुरू झाल्यापासून ते निर्दोष असल्याचा दावा करत आहेत', असे दिल्ली पोलिसांनी सांगितले. 

खलिस्तान समर्थक धालिवालने दिशा, निकिता, शंतनूशी केलेली चर्चा

निकिता ही मुंबईत वकिली करते तर पुण्यात इंजिनिअर म्हणून काम करणारा शंतनू काही दिवसांपासून दिल्लीत सक्रीय होता. टूलकिटवर काम करण्याच्या निमित्ताने दिशा, निकिता आणि शंतनू व्हॉट्सअॅप, टेलिग्राम आणि झूम द्वारे एकमेकांच्या तसेच खलिस्तानवाद्यांच्या संपर्कात होते, असा आरोप दिल्ली पोलिसांनी केला. प्रजासत्ताक दिनी दिल्लीत ट्रॅक्टर रॅली झाली. ही रॅली होण्याआधी खलिस्तान समर्थक पोएटिक जस्टिस फाउंडेशनचा संस्थापक एमओ धालिवाल याने टूलकिटवर काम करणाऱ्यांशी झूमवरुन व्हिडीओ कॉन्फरन्स करुन चर्चा केली होती. या कॉन्फरन्समध्ये दिशा, निकिता आणि शंतनू सहभागी झाले होते, असे दिल्ली पोलिसांनी सांगितले. (disha ravi, nikita jacob, shantanu muluk had zoom meeting before republic day violence said delhi police)

टूलकिटमध्ये वेगवेगळ्या माध्यमातून भारताविरोधात जगभर वातावरण तापवण्यासाठीचे धोरण आहे. या टूलकिटवर काम करण्याच्या निमित्ताने दिशा, निकिता आणि शंतनू यांनी खलिस्तानवाद्यांशी चर्चा केली. तसेच दिशा ग्रेटा थनबर्गच्या संपर्कात होती. भारताविरोधात ग्रेटा काही बोलली तर टूलकिट यशस्वी होईल या विश्वासातून प्रयत्न सुरू होते.

टूलकिटवर चर्चेसाठी दिशाने एक व्हॉट्सअॅप ग्रुप आणि एक टेलिग्राम ग्रुप तयार केला होता. व्हॉट्सअॅप ग्रुपवर दहापेक्षा जास्त सदस्य होते. टूलकिट प्रकरण भोवणार याचा अंदाज आल्यानंतर दिशाने व्हॉट्सअॅप ग्रुप आणि  टेलिग्राम ग्रुप डीलीट केले. ग्रेटाने टूलकिट ट्वीट केल्याचे वृत्त भारतीय माध्यमांनी दाखवले. यानंतर दिशाने ग्रेटाशी संपर्क साधला. चॅटिंग करुन दिशाने ग्रेटाला टूलकिटची लिंक शेअर करणारे ट्वीट डीलीट करण्यास सांगितले. 

कॅनडातील महिलेच्या माध्यमातून धालीवालने केल्या हालचाली

खलिस्तान समर्थक पोएटिक जस्टिस फाउंडेशनचा संस्थापक एमओ धालिवाल याने कॅनडातील एका महिलेच्या माध्यमातून दिशा, निकिता आणि शंतनू यांच्याशी संपर्क साधला. सर्वांनी मिळून टूलकिटवर काम करण्याचा निर्णय घेतला. टूलकिटच्या माध्यमातून जगभर भारत सरकार विरोधी वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला जाणार होता. टूलकिट तयार झाल्यावर ते दिशाने ग्रेटाला पाठवले होते. पण ग्रेटाने टूलकिट ट्वीट करण्याची चूक केली आणि सगळे बिंग फुटले.

दिशाला वकिलाशी बोलण्याची परवानगी

दिशाला अटक झाली आहे. पण कायद्यातील तरतुदीनुसार तिला मर्यादीत कालावधीत स्वतःच्या वकिलाशी चर्चा करण्याची परवानगी आहे. दिशा पाच दिवसांच्या पोलीस कोठडीत ३० मिनिटांसाठी एकदा वकिलाशी बोलू शकते. तसेच दिशाला तिच्या कुटुंबातील सदस्यांना १५ मिनिटांसाठी एकदा भेटता येईल, असे कोर्टाने सांगितले. या व्यतिरिक्त दिशाला घरातून कपडे, मास्क, पुस्तके अशा निवडक खासगी वस्तू रितसर परवानगी घेऊन वापरण्याची परवानगी दिली आहे.

दिशाला पाकिस्तान आणि काँग्रेसचे समर्थन

दिशा रवी हिच्या अटकेनंतर भारत सरकार विरोधात नाराजी व्यक्त करणारे तसेच दिशाच्या सुटकेची मागणी करणारे काही ट्वीट झाले आहेत. हे ट्वीट पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांच्या पक्षाच्या अधिकृत हँडलवरुन तसेच काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांकडून झाले आहेत.

दिल्ली पोलिसांनी नोंदवली FIR

दिल्ली पोलिसांच्या सायबर विभागाने टूलकिट प्रकरणात एक एफआयआर नोंदवली. यात गुन्हेगारी स्वरुपाचा कट करणे, देशद्रोह तसेच भारतीय दंडविधानातील इतर गंभीर कलमांतर्गत गुन्ह्याची नोंद करण्यात आली. भारत सरकार विरोधात टूलकिटच्या माध्यमातून सामाजिक, सांस्कृतिक आणि आर्थिक युद्ध पुकारल्याप्रकरणी खलिस्तान समर्थकांविरोधात एफआयआर नोंदवण्यात आली. गूगल, ट्विटर, व्हॉट्सअॅप, टेलिग्राम, झूम यांच्यासह भारतात लोकप्रिय असलेल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मकडून पोलिसांनी टूलकिट संदर्भातल्या पोस्ट, इ-मेल, डोमेन यूआरएल, सोशल मीडिया अकाउंट यांची माहिती मागवली. टूलकिट संदर्भात सोशल मीडियावर झालेली चर्चा, माहितीची देवाणघेवाण याचे तपशील तपासले जात आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी