टूलकिट: फरार निकिता जेकब विरुद्ध काढले वॉरंट, दिशा रवीला अटक

warrant against absconding Nikita Jacob टूलकिट प्रकरणात फरार असलेल्या निकिता जेकब विरोधात दिल्ली पोलिसांनी वॉरंट काढले आहे. याआधी दिल्ली पोलिसांनी दिशा रवी हिला टूलकिटचे संपादन केल्याप्रकरणी अटक केली.

toolkit case warrant against absconding Nikita Jacob
टूलकिट: फरार निकिता जेकब विरुद्ध काढले वॉरंट, दिशा रवीला अटक 

थोडं पण कामाचं

  • टूलकिट: फरार निकिता जेकब विरुद्ध काढले वॉरंट, दिशा रवीला अटक
  • निकिताची न्यायालयात धाव
  • दिशाला पाच दिवसांची पोलीस कोठडी

नवी दिल्ली: भारत सरकार विरोधात वातावरण तापवण्यासाठी टूलकिट विकसित करणाऱ्यांना अटक करण्यास सुरुवात झाली आहे. टूलकिट प्रकरणात फरार असलेल्या निकिता जेकब विरोधात दिल्ली पोलिसांनी वॉरंट काढले आहे. याआधी दिल्ली पोलिसांनी पर्यावरण रक्षणाचे सामाजिक कार्य करते अशी ओळख सांगणाऱ्या दिशा रवी हिला टूलकिटचे संपादन केल्याप्रकरणी अटक केली. दिशाला ५ दिवसांची पोलीस कोठडी झाली. (toolkit case warrant against absconding Nikita Jacob)

दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने १० फेब्रुवारी रोजी मुंबईत वकील असलेल्या निकिता जेकब हिच्या घरावर छापा टाकला. यावेळी निकिताने तपासात सहकार्य करेन असे आश्वासन दिले. याच कारणामुळे निकिताला पोलिसांनी अटक करणे टाळले. यानंतर संधी साधून निकिता फरार झाली. अद्याप निकिता सापडलेली नाही. दिल्ली पोलिसांनी निकिताचा शोध सुरू केला असून तिच्याविरोधात वॉरंट काढले आहे.

निकिता जेकब खलिस्तान समर्थकांच्या संपर्कात होती. टूलकिटसाठी निकिताने दिशा आणि अन्य काही जमांची मदत घेतली. वकील असलेली निकिता टूलकिट संदर्भात खलिस्तान समर्थक पोएटिक जस्टिस फाउंडेशनचा संस्थापक एमओ धालिवाल याच्याशी चर्चा करत होती. निकिता पुनीत नावाच्या सहकाऱ्याच्या माध्यमातून धालिवालच्या संपर्कात आली होती. 

पर्यावरण क्षेत्रात काम करणाऱ्या दिशाची ग्रेटा थनबर्ग हिच्याशी ओळख आहे. या ओळखीचा फायदा करुन घेतला तर भारत सरकार विरोधात जगभर वातावरण तापवणे सोपे होईल, असे मत निकिताने व्यक्त केले. यानंतर धालिवालकडून हिरवा कंदिल मिळताच निकिताने दिशाला सोबत घेतले. निकिता आणि दिशा या दोघीजणी टूलकिट प्रकरणाशी संबंधित आहेत. पोलिसांनी छापा टाकला म्हणजे लवकरच अटक होणार आणि अडचणी वाढणार याचा अंदाज येताच निकिता फरार झाल्याची शक्यता व्यक्त होत आहे.

प्रजासत्ताक दिनी दिल्लीत ट्रॅक्टर रॅली झाली. ही रॅली होण्याआधी धालिवाल, निकिता जेकब, दिशा रवी यांच्यासह आणखी काही जणांनी झूमवर व्हिडीओ कॉन्फरन्स केल्याची माहिती 'टाइम्स नाऊ' या वृत्तवाहिनीला सूत्रांनी दिली आहे. टूलकिट प्रकरणी पोलीस तपास सुरू असून लवकरच आणखी काही जणांना अटक होण्याची शक्यता आहे.

निकिताची न्यायालयात धाव

निकिताने शरण येण्यासाठी किमान एक महिन्याचा अवधी मिळावी अशी मागणी करत न्यायालयात धाव घेतली आहे. दिल्ली पोलिसांनी छापा टाकला त्यावेळी निकिताचा मोबाइल, लॅपटॉप, हार्ड ड्राइव्ह, पेन ड्राइव्ह जप्त केला. यानंतर घाबरुन निकिता सुरक्षित ठिकाणी गेली आहे असे निकिताच्या वकिलाचे म्हणणे आहे. निकिता ११ फेब्रुवारी रोजी मुंबईच्या उच्च न्यायालयात गेली होती. या नंतर ती फरार झाली आहे. दिल्ली पोलिसांनी वॉरंट काढून निकिताचा शोध सुरू केल्याचे सांगितले. दिसताक्षणी निकिताला अटक करुन कोर्टात हजर करू, असेही दिल्ली पोलिसांनी सांगितले.

...म्हणून ग्रेटा थनबर्गला UNच्या माजी अधिकाऱ्याचे पत्र

दिशाचा मोबाइल आणि लॅपटॉप जप्त

भारतात सरकार विरोधात वातावरण तापवण्यासाठी टूलकिटमध्ये मार्गदर्शन आहे. या टूलकिटच्या मसुद्यावर काम केल्याचा आरोप दिशा रवी हिच्यावर आहे. दिशा ही २१ वर्षांची तरुणी आहे. ठोस पुराव्यांच्या आधारे दिशाला बंगळुरूतून अटक केल्याचे दिल्ली पोलिसांनी जाहीर केले. दिशाचा मोबाइल आणि लॅपटॉप जप्त करण्यात आला.

दिशाला पाच दिवसांची पोलीस कोठडी

दिल्ली पोलिसांच्या सायबर तज्ज्ञांनी सखोल तपासणी केली. या तपासणीत दिशा रवी हिने टूलकिटच्या मसुद्याचे संपादन केल्याचे पुरावे हाती आले. यानंतर दिशाला अटक केल्याचे दिल्ली पोलिसांनी सांगितले. अटक केल्यानंतर विमानाने दिशाला दिल्लीत आणण्यात आले. तिला दिल्लीच्या कोर्टात हजर करण्यात आले. चौकशी करण्यासाठी दिशाची सात दिवसांची पोलीस कोठडी मिळावी, अशी मागणी पोलिसांच्यावतीने करण्यात आली. कोर्टाने दिशाला पाच दिवसांची पोलीस कोठडी दिली.

टूलकिटसाठी व्हॉट्सअॅप ग्रुपवर चर्चा

दिशाने व्हॉट्सअॅप ग्रुप तयार केला. या ग्रुपच्या माध्यमातून टूलकिट तयार करण्यासाठी दिशाने बरीच चर्चा केली. खलिस्तान समर्थक पोएटिक जस्टिस फाउंडेशन या गटासोबत हातमिळवणी करुन दिशाने टूलकिटच्या मसुद्याचे संपादन केले, असा आरोप दिल्ली पोलिसांनी केला. ग्रेटाने टूलकिट ट्वीट केले. नंतर दिशाने सांगितले म्हणून ग्रेटाने ट्वीट डीलीट केले, असेही दिल्ली पोलिसांचे म्हणणे आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी