Bengaluru violence: काँग्रेस आमदाराच्या पुतण्याने केली वादग्रस्त पोस्ट, प्रचंड हिंसाचारात २ जण ठार

Bengaluru Violence: कर्नाटकातील कॉंग्रेस आमदाराच्या पुतण्याच्या सोशल मीडियावर एक वादग्रस्त पोस्ट शेअर केल्याने भडकलेल्या हिंसाचारात दोन जण ठार तर 60 पोलीस जखमी झाले आहेत. तसेच कलम १४४ लागू करण्यात आलं आहे.

Bengaluru violence
काँग्रेस आमदाराच्या पुतण्याने केली वादग्रस्त पोस्ट, प्रचंड हिंसाचारात २ जण ठार   |  फोटो सौजन्य: Twitter

थोडं पण कामाचं

  • कॉंग्रेस आमदाराच्या पुतण्याने सोशल मीडिया पोस्टवर शेअर केलेल्या वादग्रस्त पोस्टमुळे उसळला हिंसाचार
  • आमदाराच्या पुतण्याला अटक न केल्याने संतप्त जमाव झाला हिंसक
  • या हिंसाचारात दोन लोकांचा मृत्यू झाला आहे तर ६० पोलिस जखमी झाले आहेत

बंगळुरू: कर्नाटकातील बंगळुरुत (Bengaluru violence) एका वादग्रस्त सोशल मीडिया पोस्टवरून संतप्त जमावाने काल (मंगळवार) रात्री कॉंग्रेस आमदाराच्या (Congress MLA) घरावरच हल्ला केला. यावेळी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात दोन जणांचा मृत्यू झाला आहे तर अनेक पोलीस जखमी झाले आहे. आमदाराच्या पुतण्याने एक वादग्रस्त पोस्ट शेअर केल्याने लोक संतप्त झाले आणि ही हिंसा भडकली असल्याचं समजते आहे. यावेळी संतप्त जमाव आणि  पोलिसांमध्ये जोरदार चकमक झाली. आमदाराच्या पुतण्याने केलेल्या पोस्टप्रकरणी त्याला अटक करण्यात यावी अशी मागणी आंदोलकांकडून केली जात आहे. दरम्यान, अचानक उसळलेला हिंसाचार आणि जमावाने पोलिसांवर चढवलेला हल्ला लक्षात घेता आता बंगळुरूमध्ये कलम १४४ लागू करण्यात आलं आहे.

पोलिसांच्या गोळीबारात दोन लोकांचा मृत्यू

बंगळुरूचे पोलिस आयुक्त कमल पंत यांचे म्हणणे आहे की, पोलिसांच्या गोळीबारात दोन लोकांचा मृत्यू झाला तर एका जखमी व्यक्तीला रुग्णालयात नेण्यात आले आहे. या चकमकीत एसीपीसह सुमारे ६० पोलिस जखमी झाले आहे. हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर बंगळुरू शहरातील कलम १४४ आणि डीजे हल्ली आणि केजी हल्ली पोलीस स्टेशन भागात कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. त्याच वेळी, बेंगळुरू येथील सहआयुक्त (गुन्हे) संदीप पाटील म्हणाले की, हिंसाचार प्रकरणात ३० जणांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात आणखी काही लोकांना अटक केली जात आहे. अशीही त्यांनी माहिती दिली. 

जमावाने आमदारांच्या घराला घेरले

मिळालेल्या माहितीनुसार, सोशल मीडियावरील पोस्टविरोधात तीव्र नाराजी व्यक्त करत शेकडो लोकांनी आमदार अखंड श्रीनिवास मूर्ती यांच्या घराला घेराव घालून थेट दगडफेक सुरू केली. एवढंच नव्हे तर आंदोलकांनी आमदाराच्या घराला आगही लावण्याचा प्रयत्न केला. तसेच घराला लावण्यात आलेली आग विझण्यासाठी आलेला अग्निशमन दलाच्या गाड्यांना देखील आंदोलकांनी पुढे येऊ दिलं नव्हतं. ज्यावेळी जमावाने घरावर हल्ला केला तेव्हा आमदार त्यांच्या घरात नव्हते.

लोकांनी पोलिसांवर दगडफेक केली

याव्यतिरिक्त, केजी हल्ली पोलीस ठाण्याबाहेर हजारो लोक जमले आणि त्यांनी तेथील पोलिसांवर हल्ला केला. जमावाने तेथे देखील जाळपोळ केली. आमदार श्रीनिवास मूर्ती यांचा पुतण्या पी. नवीन याल त्वरित अटक करण्याची मागणी संतप्त जमाव करीत होते. लोकांचं म्हणणं आहे की, एक गट हा नवीन विरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी  केजी हल्ली पोलीस स्टेशनमध्ये गेला होता परंतु पोलिसांनी गुन्हा नोंदविण्याऐवजी परस्पर हे प्रकरण सोडवावं असा त्यांना सल्ला दिला होता. दरम्यान, मुख्यमंत्री बी एस येडियुरप्पा यांनी या घटनेबद्दल कर्नाटकचे गृहमंत्री बसवराज बोम्मई यांच्याशी बोलून परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी योग्य ती पावले उचलण्यास सांगितले आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी