केंद्रीय गृहमंत्री अमित शहा कोरोना पॉझिटिव्ह, उपचारासाठी रुग्णालयात दाखल

Union Home Minister Amit Shah tests positive for Coronavirus: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. अमित शहा यांनी स्वत: ट्वीट करुन याची माहिती दिली आहे.

Amit Shah
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा  

थोडं पण कामाचं

  • केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना कोरोना
  • अमित शहा यांनी स्वत: ट्वीट करुन दिली माहिती
  • उपचारासाठी रुग्णालयात दाखल

नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांना कोरोनाचा (Coronavirus) संसर्ग झाला आहे. अमित शहा यांनी स्वत: ट्वीट करुन याची माहिती दिली आहे. अमित शहा यांनी ट्वीट करुन म्हटलं, कोरोनाची सुरुवातीची लक्षणे आढळून आल्यानंतर मी कोरोना टेस्ट करुन घेतली आणि कोरोना टेस्टचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. माझी तब्येत ठीक आहे. परंतु डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार रुग्णालयात दाखल होत आहे. गेल्या काही दिवसांत माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांना विनंती करतो की त्यांनी कृपया आपली टेस्ट करुन घ्यावी.

दिल्लीमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव हा मोठ्या प्रमाणात होता आणि हा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तसेच कोरोनाची साखळी मोडण्यासाठी अमित शहा हे स्वत: लक्ष घातले. अमित शहा यांनी प्रशासकीय अधिकारी, डॉक्टर आणि संबंधितांसोबत बैठका घेऊन कोरोना चाचण्या वाढवल्या आणि इतरही महत्वाची पाऊलं उचलली होती. या सर्वांनंतर दिल्लीतील परिस्थिती आता नियंत्रणात आली आहे.

भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी ट्वीट करुन गृहमंत्री अमित शहा यांच्या प्रकृतीत सुधारणा होण्यासाठी प्रार्थना केली आहे. त्यांनी ट्वीट करत म्हटलं, माननीय गृहमंत्री अमित शहा यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याची बातमी मिळाली. त्याच्या प्रकृतीत त्वरित सुधारणा व्हावी अशी मी देवाकडे प्रार्थना करतो.

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनीही अमित शहा यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी असं म्हणत ट्वीट केलं आहे. राजनाथ सिंह यांनी ट्वीट करत म्हटलं, अमितजी तुम्ही कोरोना व्हायरसच्या या आव्हानावर नक्कीच मात कराल आणि विजय मिळवाल असा मला विश्वास आहे. तुम्ही लवकरात लवकर बरे व्हावेत ही परमेश्वराकडे प्रार्थना आहे.

राजकीय नेत्यांना कोरोनाचा संसर्ग 

काही दिवसांपूर्वी मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांना सुद्धा कोरोनाचा संसर्ग झाला होता. शिवराज सिंह चौहान यांनी सुद्धा ट्वीट करुन आपल्याला कोरोनाचा संसर्ग झाल्याची माहिती दिली होती. उत्तरप्रदेश राज्य सरकारमधील कॅबिनेट मंत्री कमल राणी वरुण (Uttar Pradesh Cabinet minister Kamal Rani Varun) यांचे रविवारी (२ ऑगस्ट २०२०) कोरोनाने (Coronavirus) निधन झाले आहे. कमल राणी वरुण यांच्यावर उत्तरप्रदेशमधील लखनऊ (Lucknow) येथील रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांचं निधन झालं. त्या ६२ वर्षांच्या होत्या.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी