[Video] :आमदार म्हणतात, ‘भाजप कार्यकर्त्यांच्या दुकानांवर बहिष्कार टाका’; व्हिडिओ व्हायरल

लोकल ते ग्लोबल
Updated Jul 22, 2019 | 22:55 IST | टाइम्स नाऊ हिंदी

[Video] : उत्तर प्रदेशातील आमदार नाहिद हसन यांचा वादग्रस्त व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये आमदार हसन यांनी नागरिकांना भाजपशी संबंधित व्यक्तीच्या दुकानातून साहित्य खरेदी करू नका, असं आवाहन केलंय.

Nahid Hasan_TN
भाजपच्या दुकानदारांना वाळीत टाका; आमदाराचा अजब फतवा  |  फोटो सौजन्य: Times Now

थोडं पण कामाचं

  • समाजवादी पक्षाच्या आमदाराचा अबज फतवा
  • भाजपशी संबंधित दुकानदारांकडून साहित्य खरेदी करू नका
  • राजकीय वर्तुळात व्हायरल व्हिडिओची चर्चा
  • आमदारांवर कारवाईची मागणी

कैराना (उत्तर प्रदेश) : उत्तर प्रदेशातील कैराना येथील समाजवादी पक्षाचे आमदार नाहिद हसन यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये आमदार हसन यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, भाजपशी संबंधित व्यक्तीच्या दुकानातून साहित्य खरेदी करू नका. त्याच्या या वादग्रस्त व्हिडिओमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. मुळात आमदार हसन आणि वाद हे समीकरण जुनेच आहे. यापूर्वी एका सरकारी अधिकाऱ्याने त्यांच्यावर जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला होता. त्यांचा व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमुळे एक वेगळ्या प्रकारची राजकीय अस्पृश्यता समाजात रुजेल अशी भीती व्यक्त होत आहे. त्यामुळे समाजवादी पक्ष याची कशी दखल घेणार याकडे ही सगळ्यांचे लक्ष लागले आहे. आमदार हसन यांच्यावर या व्हिडिओप्रकरणी कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

‘अधिकारी भाजपच्या डोक्याने चालतात’

आमदार हसन यांनी केरानामधील एका अतिक्रमण विरोधी मोहिमेवर टीका केली आहे. यात त्यांनी भाजपचे नेते आणि काही सरकारी अधिकाऱ्यांना लक्ष केले आहे. अधिकारी मंडळी भाजपच्या डोक्याने चालत आहेत, असा आरोप त्यांनी केला आहे. ते म्हणाले, ‘कैरानाचा परिसर आमच्या पूर्वजांनी वसवला आहे. माझी वडील त्यांचे वडील यांनी इथे गरिबांना राहण्यासाठी जागा दिल्या. आजच नव्हे तर, अनेक वर्षांपासून हे लोक इथे राहतात. काही भाजपचे नेते आणि भाजपच्याच डोक्याने चालणारे सरकारी अधिकारी यांनी कैरानामधील गरिबांना बेघर करण्याचा डाव रचला आहे. गरिबांचे पुर्नवसन अशा ठिकाणी केले जात आहे की तिथे त्यांना ग्राहकच मिळणार नाहीत. अशाने त्यांचा रोजगार ठप्प होणार आहे. त्यांची कुटुंबं उघड्यावर येतील.’

दुकानांवर बहिष्कार टाकण्याचे आवाहन

आमदार हसन यांचा एक वादग्रस्त व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. त्यात त्यांनी नागरिकांना भाजपशी संबंधित दुकानदारांवर बहिष्कार टाकण्याचे आवाहन केले आहे. ते म्हणाले, ‘कैराना आणि आसपासच्या गावातील नागरिकांना माझी हात जोडून विनंती आहे. जे लोक कैरानामधून सामान खरेदी करतात त्यांनी बाजारातील भाजपशी संबंधित दुकानादारांच्या दुकानातून साहित्य खरेदी करू नका. काही दिवसांसाठी तुम्हाला कष्ट घ्यावे लागतील. इतर ठिकाणांहून सामान खरेदी करा. बाजारात असणारे हे भाजपचे दुकानदार ताळ्यावर येतील. त्यांचे घर चालवणे आपल्यावर अवलंबून आहे. सगळ्यांनी जेवढे पण लोक आहेत त्यांनी इथून साहित्य खरेदी करणे बंद करा. हाच माझा मेसेज आहे.’

वादग्रस्त व्यक्तिमत्व

आमदार हसन हे आधीपासूनच वादग्रस्त व्यक्तिमत्व आहे. यापूर्वीही त्यांच्यावर अनेक आरोप झाले आहेत. काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेश पॉवर कार्पोरेशनच्या एका उपविभागीय अधिकाऱ्याने त्यांच्यावर आरोप केला होता. शामली जिल्ह्यात कारमधील काही गुडांनी त्यांच्यावर हल्ला केला होता. त्या हल्ल्याचा आरोप आमदार हसन यांच्यावरच लावण्यात आला होता. याप्रकरणी झिंझाना पोलीस ठाण्यात रितसर तक्रारही दाखल करण्यात आली आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...