पंजाब: लुधियाना (Ludhiana) रेल्वे स्टेशनचा (railway station) एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एका व्यक्तीला जीवदान मिळालं आहे. नशीब बलवत्तर म्हणून वृद्धानं मृत्यूलाही चकवा दिला आहे. एका 85 वर्षीय वृद्ध व्यक्ती चालत्या ट्रेनमध्ये चढण्याचा प्रयत्न करत आहे. याचवेळी त्या वृद्धाचा पाय घसरला आणि ते ट्रेन खाली गेले. यानंतर जवळपास ट्रेनचे 7 डबे त्यांच्यावरुन गेले. पण त्याहून विशेष म्हणजे, या वृद्ध व्यक्तीच्या केसांनाही धक्का लागला नाही.
देवाचा चमत्कार
व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये दिसणार्या व्यक्तीचे नाव गुरजीत सिंग आहे. ते पठाणकोट एक्स्प्रेसमध्ये बसून दिल्लीला जात होते. याचदरम्यान ते पाणी घेण्यासाठी स्टेशनवर खाली उतरले होते. ट्रेन सुरू झाल्याचं पाहून ते ट्रेनच्या दिशेनं पुन्हा धावू लागले. ते ट्रेनमध्ये चढण्याचा प्रयत्न करत असताना त्यांचा तोल गेला. त्यानंतर ते रेल्वे रुळावर खाली पडले. यानंतर ट्रेनच्या 7 बोगी त्यांच्या अंगावरून गेल्या, मात्र नशीब बलवत्तर म्हणून या वृद्धाचा जीव वाचला आहे.
ज्या क्षणी हा वृद्ध व्यक्ती खाली पडले तेव्हा ते रुळाजवळच्या छोट्या भिंतीला चिकटले. शरीरानं बारिक असल्यानं वृद्धाला ते चिकटून राहणं जमलं. यादरम्यान वृद्धाच्याजवळून ट्रेन जात राहिली आणि हे दृश्य पाहून प्रवाशांचा श्वास कोंडला होता.
प्रवाशांनी जेव्हा आरडाओरड केला तेव्हा कोणीतरी ट्रेनची साखळी ओढली आणि ट्रेन थांबवली. यानंतर गुरजीत सिंग यांची सुखरूप सुटका करण्यात आली. ही संपूर्ण घटना स्टेशनवर लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यातमध्ये कैद झाली आहे.