Exit Poll : प. बंगालमध्ये भाजप सर्वात मोठा पक्ष

लोकल ते ग्लोबल
Updated Apr 30, 2021 | 01:59 IST

एक्झिट पोलनुसार भाजप हा पश्चिम बंगालमध्ये तसेच द्रमुक हा तामीळनाडूत सर्वात मोठा पक्ष ठरण्याची शक्यता. आसाम आणि पुदुचेरी येथे भाजपची सत्ता येण्याची शक्यता.

थोडं पण कामाचं

  • Exit Poll : प. बंगालमध्ये भाजप सर्वात मोठा पक्ष
  • द्रमुक हा तामीळनाडूत सर्वात मोठा पक्ष ठरण्याची शक्यता
  • आसाम आणि पुदुचेरी येथे भाजपची सत्ता येण्याची शक्यता

नवी दिल्ली: पश्चिम बंगाल, तामीळनाडू, आसाम, केरळ ही चार राज्य तसेच पुदुचेरी हा केंद्रशासीत प्रदेश या पाच राज्यांच्या विधानसभांसाठी झालेल्या मतदानाची मोजणी आणि निकाल रविवार २ मे २०२१ रोजी आहे. विधानसभा निवडणुकांसाठीच्या मतदानाची प्रक्रिया पूर्ण झाली. यानंतर टाइम्स नाऊसह विविध वृत्तवाहिन्यांचे निवडणूक निकालाविषयीचे अंदाज अर्थात एक्झिट पोल (Exit Poll) जाहीर झाले. या एक्झिट पोलनुसार भाजप हा पश्चिम बंगालमध्ये तसेच द्रमुक हा तामीळनाडूत सर्वात मोठा पक्ष ठरण्याची शक्यता आहे. आसाम आणि पुदुचेरी येथे भाजपची सत्ता येण्याची शक्यता आहे. Vidhan Sabha Chunav Exit Poll on West Bengal, Assam, Kerala, Tamil Nadu, Puducherry Assembly Elections

सध्या पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसची तर तामीळनाडूत अण्णाद्रमुकची सत्ता आहे. पण निकालानंतर पश्चिम बंगालमध्ये भाजप तर तामीळनाडूत द्रमुक हा सर्वात मोठा पक्ष होणार आहे. द्रमुक सहज सत्ता मिळवू शकेल. पण पश्चिम बंगालमध्ये भाजप अवघ्या काही जागांमुळे सत्ता मिळवण्यात अपयशी ठरेल असा अंदाज व्यक्त होत आहे. दक्षिण भारतातील तामीळनाडूत अण्णाद्रमुक जाऊन द्रमुकची सत्ता येण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

आसाममध्ये भाजपला पुन्हा सत्ता मिळाली तर मुख्यमंत्री सर्वानंद सोनेवाल यांचे पद कायम राहणार की नाही याबाबत संभ्रम आहे. हा प्रश्न निकालानंतर सुटेल; अशी शक्यता व्यक्त होत आहे. पुदुचेरी येथे निवडणुकीच्या तोंडावर मुख्यमंत्री नारायण सामी यांचे सरकार कोसळले होते. सध्या तिथे भाजपमय वातावरण आहे. एनडीएचे मुख्यमंत्री म्हणून कोणाची निवड होणार याचे उत्तर लवकरच मिळण्याची शक्यता आहे.

विविध वृत्तवाहिन्यांच्या एक्झिट पोलचा एकत्रित विचार केल्यास भाजप पश्चिम बंगालमध्ये १४८ जागा जिंकत सर्वात मोठा पक्ष होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. तसेच आसामसाठी विविध वृत्तवाहिन्यांच्या एक्झिट पोलचा एकत्रित विचार केल्यास एनडीए ७२ जागांवर विजयी होण्याची शक्यता आहे.

पश्चिम बंगालमध्ये विधानसभेच्या २९४ जागा आहेत. यात किमान १०० किंवा त्यापेक्षा जास्त जागा भाजप जिंकेल अशी शक्यता सर्व माध्यमांकडून व्यक्त होत आहे. टाइम्स नाऊ आणि सी व्होटर यांच्या एक्झिट पोलनुसार भाजप पश्चिम बंगालमध्ये ११५, डावे १९, तृणमूल काँग्रेस १५८ जागा जिंकण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

तामीळनाडूत यूपीए १६६ तर एनडीए फक्त ६४ जागा जिंकेल असा अंदाज टाइम्स नाऊ आणि सी व्होटर यांच्या एक्झिट पोलने व्यक्त केला आहे. केरळमध्ये डाव्यांची सत्ता कायम राहणार हे स्पष्ट दिसत आहे. एलडीएफ ७४ तर यूडीएफ ६५ जागांवर विजयी होईल असा अंदाज टाइम्स नाऊ आणि सी व्होटर यांच्या एक्झिट पोलने व्यक्त केला आहे. आसाममध्ये जागा कमी झाल्या तरी एनडीए सलग दुसऱ्यांदा सत्तेत येण्याची शक्यता आहे. एनडीए ६५ तर यूपीए ५९ जागा जिंकेल असा अंदाज टाइम्स नाऊ आणि सी व्होटर यांच्या एक्झिट पोलने व्यक्त केला आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी