नवी दिल्ली: प्रजासत्ताक दिनी ट्रॅक्टर रॅलीसाठी लाठ्याकाठ्या घेऊन जा असे सांगणारा भारत किसान युनियनचे नेता राकेश टिकैत यांचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. केंद्र सरकार आपले ऐकत नाही. झेंडे आणि लाठ्या घेऊन चला, असेही टिकैत व्हिडीओमध्ये सांगताना दिसत आहे. या व्हिडीओ संदर्भात विचारल्यावर राकेश टिकैत यांनी झेंड्यासाठी लाठ्या हव्या असल्यामुळे लाठ्या घेण्यासाठी सांगत असल्याचे स्पष्टीकरण दिले. ट्रॅक्टर रॅलीत हिंसा करण्याच्या उद्देशाने लाठ्या नेण्यास सांगितले नव्हते, असा दावा राकेश टिकैत यांनी केला. (viral video shows farmer leader Rakesh Tikait appealing to supporters to be armed with lathis)
याआधी मंगळवारी प्रजासत्ताक दिनी तब्बल ४१ शेतकरी संघटनांनी ट्रॅक्टर रॅली काढली. यात प्रामुख्याने पंजाब आणि हरयणातील शेतकरी संघटना होत्या. दिल्ली पोलिसांनी शेतकऱ्यांना ट्रॅक्टर रॅलीसाठी परवानगी देताना विशिष्ट मार्ग आणि वेळ यांची अट घातली होती. शेतकऱ्यांनी या अटींचे पालन करुन शांततेत ट्रॅक्टर रॅली काढण्याचे आश्वासन दिले होते. प्रत्यक्षात राजपथावर प्रजासत्ताक दिनानिमित्त संचलन (परेड) सुरू असतानाच शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर रॅलीला सुरुवात केली. वेळ आणि मार्ग या दोन्ही अटींचे उल्लंघन शेतकऱ्यांनी केले. ठरलेल्या वेळेआधी आणि निश्चित झालेल्या मार्गाऐवजी भलत्याच मार्गाने शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर दिल्लीत घुसवले.
प्रजासत्ताक दिनाच्या बंदोबस्तामुळे दिल्लीत अनेक ठिकाणी बॅरिकेड लावले होते. हे बॅरिकेड पाडून, त्यांची मोडतोड करुन शेतकरी वेगाने पुढे सरसावले. पोलिसांच्या अंगावर ट्रॅक्टर घालणे, पोलिसांवर तलवार उगारणे, दगडफेक करणे अशा वेगवेगळ्या प्रकारे शेतकऱ्यांनी हल्ले केले. शेतकऱ्यांच्या हिंसेमुळे ८३ पोलीस जखमी झाले. सार्वजनिक संपत्तीची नासधूस झाली.
आंदोलनाच्या नावाखाली हिंसक धुडगूस घालणाऱ्या शेतकऱ्यांपैकी काही जणांनी लाल किल्ल्यावर जाऊन स्वतःचे झेंडे तिथे झळकावण्यास सुरुवात केली. राष्ट्रीय सणाच्या दिवशी हा प्रकार घडला. यामुळे देशभर संतापाची लाट उसळली. कनॉट प्लेसची बाजारपेठ प्रजासत्ताक दिनी दिवसभरासाठी बंद ठेवण्यात आली. दिल्ली मेट्रोची अनेक स्टेशन प्रवाशांसाठी बंद झाली. दिल्लीच्या संवेदनशील भागांमध्ये तसेच हरयाणातील सोनीपत, झज्जर आणि पलवल या तीन जिल्ह्यांमध्ये इंटरनेट सेवा बंद करण्यात आली. हरयाणा आणि दिल्ली या दोन्ही राज्यांमध्ये पोलिसांना हाय अलर्टवर ठेवण्यात आले. दिल्लीला जोडणाऱ्या प्रमुख रस्त्यांवरील वाहतूक थांबवण्यात आली.
या घटनेनंतर राकेश टिकैत यांचा व्हिडीओ व्हायरल झाला. या व्हिडीओवर टिकैत यांनी स्पष्टीकरण दिले. हिंसेसाठी लाठ्या घेऊन जाण्यास सांगितले नाही, असा दावा त्यांनी केला. तसेच प्रजासत्ताक दिनी ट्रॅक्टर रॅलीच्या नावाखाली कायदा हाती घेण्याच्या प्रकरणात त्यांनी जबाबदारी झटकण्यास सुरुवात केली. हिंसा करणारे आमच्या संघटनेचे नव्हते. विरोधकांनी रॅलीत घुसून हिंसा केली, असा आरोप राकेश टिकैत यांनी केला. हा आरोप करताना त्यांनीही एकही पुरावा सादर केलेला नाही. ट्रॅक्टर रॅलीच्या नावाखाली धुडगूस घालणाऱ्या जमावाला पोलिसांनी मागे रेटायला सुरुवात केल्यानंतर राकेश टिकैत यांच्यासह सर्व शेतकरी नेत्यांनी शेतकऱ्यांना माघारी येण्यास सांगितले. दिल्लीच्या सीमेजवळ जिथे आंदोलकांचा तळ पडला आहे त्या ठिकाणी सर्व आंदोलक शेतकऱ्यांना परत बोलावण्यात आले.
दिल्ली पोलिसांनी ट्रॅक्टर रॅलीच्या नावाखाली धुडगूस घालणाऱ्यांविरोधात आतापर्यंत १५ एफआयआर नोंदवल्या आहेत. पोलिसांनी दिल्लीत अनेक रस्त्यांवर बसवलेल्या कॅमेऱ्यांचे फूटेज तपासून हिंसा करणाऱ्यांचे चेहरे ओळखले आहेत. दिल्लीला शेजारच्या राज्यांशी जोडणारे प्रमुख रस्ते अडवून बसलेल्या आणि कायदा हाती घेऊन धुमाकूळ घालणाऱ्या अनेकांना अटक केली जाण्याची शक्यता आहे.