Bengaluru violence Reason: एका रात्रीत होत्याचं नव्हतं झालं, का भडकला हिंसाचार; जाणून घ्या याबाबत सारं काही

Reason for Bengaluru violence: काल (मंगळवार) रात्री बंगळुरू शहरात प्रचंड हिंसाचार भडकला. नेमकं यावेळी काय घडलं याबाबत प्रत्येक गोष्ट जाणून घ्या:

bengaluru violence
एका रात्रीत होत्याचं नव्हतं झालं, का भडकला हिंसाचार?  |  फोटो सौजन्य: Times Now

थोडं पण कामाचं

  • बंगळुरु शहरात मंगळवारी रात्री प्रचंड हिंसाचार
  • एका फेसबुक पोस्टवरून हिंसाचार, पोलिसांच्या गोळीबारात तीन लोकांचा मृत्यू
  • याप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत ११० लोकांना केली अटक 

बंगळुरू: बंगळुरू (Bengaluru) शहराला मंगळवारी रात्री अत्यंत भीषण असा हिंसाचार (violence) उसळला. त्यामुळे संपूर्ण शहरात भीतीचं वातावरण पसरलं होतं. एका फेसबुक पोस्टवरून (Facebook Post) झालेल्या हिंसाचारात तीन लोक ठार झाले तर ६० पोलीस (Police) जखमी झाले आहेत. हिंसाचारादरम्यान पोलिसांच्या वाहनांना देखील आगी लावण्यात आल्या. अशी माहिती पोलिसांनी दिली. याशिवाय एका बेसमेंटमधील सुमारे २०० ते २५० वाहनेही जाळण्यात आली आहेत. शहर पोलिस आयुक्त कमल पंत यांचे म्हणणे आहे की, या हिंसक घटनेचा सध्या तपास सुरु असून या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत ११० लोकांना अटक केली आहे. परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी डीजे हल्ली व केजी हल्ली या दोन पोलीस स्टेशन हद्दींमध्ेय कर्फ्यू लागू केला आहे. तर उर्वरित शहरात कलम १४४ लागू करण्यात आलं आहे. जाणून घ्या मंगळवारी रात्री बंगळुरु शहरात काय घडले ते: 

  1. वादग्रस्त फेसबुक पोस्टनंतर संतप्त जमाव हा कवल बायरासँड्रा येथे कॉंग्रेसचे आमदार अखंड श्रीनिवास मूर्ती यांच्या घराबाहेर मोठ्या प्रमाणात एकत्र जमले आणि त्यांनी वादग्रस्त पोस्टबाबत जोरजोरात घोषणाबाजी केली. यानंतर जमावाने काँग्रेस आमदाराचा पुतण्या  नवीन याच्या अटकेची मागणी करत थेट जाळपोळ करण्यास सुरूवात केली. 
  2. पुलकेशी नगरचे आमदार मूर्ती यांनी एक व्हिडिओ शेअर करुन जमावाला हिंसा न करण्याचा आग्रह केला. मूर्ती यांनी आपल्या या व्हिडिओमध्ये म्हटले आहे की, 'काही समाजकंटकांच्या नादी लागून आपण हिंसाचाराचा अवलंब करु नये.'
  3. याच दरम्यान, बंगळुरूमधील केजी हल्ली पोलीस स्टेशनबाहेर देखील  मोठा जमाव जमला होता.
  4. दरम्यान, जमावाच्या आणखी एका गटाने डीजी हल्ली पोलीस स्टेशनवर हल्ला केला. येथील जमावाने काही वाहनं पेटवून दिली तर काही वाहनांची तोडफोड केली. दरम्यान, जमावाने केलेली ही हिंसा अनेक कॅमेऱ्यात कैद झाली असून सोशल मीडियावर त्याचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाले आहेत.
  5. या हिंसक घटनेत तीन जणांचा मृत्यू झाला आहे. जाळपोळीत अनेक जण जखमी झाले आहेत. जमावाने केलेल्या हल्ल्यात आणि दगडफेकीत सुमारे ६० पोलीस जखमी झाले आहेत. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी अखेर पोलिसांना गोळीबार करावा लागला. 
  6. या हिंसक घटनेवर बंगळुरूचे पोलीस आयुक्त कमल पंत यांनी सांगितले की, हिंसाचाराच्या या घटनेत आतापर्यंत ११० जणांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान, पोलिसांनी अशीही माहिती दिली आहे. वादग्रस्त फेसबुक पोस्ट शेअर केल्याप्रकरणी नवीन याला देखील पोलिसांनी अटक केली आहे. 
  7. एका पोलीस अधिकाऱ्याने अशी माहिती दिली की, पोलीस आयुक्त पंत यांनी हिंसाचारग्रस्त भागाला भेट दिली. बंगळुरूच्या पूर्वेकडील भागात सध्या अत्यंत चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी