Anna Hazare Health Update : अण्णांच्या हृदयात २० टक्के ब्लॉकेज

नगर
उमेर सय्यद
Updated Nov 25, 2021 | 20:07 IST

20 percent blockage in anna hazare's heart ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांची पुण्याच्या रुबी हॉस्पिटलमध्ये त्यांची अँजिओग्राफी करण्यात आली. यात अण्णा हजारे यांच्या हृदयात २० टक्के ब्लॉकेज आढळले.

20 percent blockage in anna hazare's heart
अण्णांच्या हृदयात २० टक्के ब्लॉकेज 
थोडं पण कामाचं
  • अण्णांच्या हृदयात २० टक्के ब्लॉकेज
  • पुण्याच्या रुबी हॉस्पिटलमध्ये अण्णा हजारेंवर उपचार सुरू
  • अण्णा हजारे यांची प्रकृती स्थिर

20 percent blockage in anna hazare's heart । राळेगणसिद्धी (अहमदनगर) : ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांची पुण्याच्या रुबी हॉस्पिटलमध्ये त्यांची अँजिओग्राफी करण्यात आली. यात अण्णा हजारे यांच्या हृदयात २० टक्के ब्लॉकेज आढळले. यामुळे तातडीने अण्णांवर पुढील उपचार सुरू करण्याचा निर्णय डॉक्टरांनी घेतला. अण्णा हजारे यांची प्रकृती स्थिर आहे.

अण्णा हजारे यांचे पुण्याच्या रुबी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत, अशी माहिती राळेगणसिद्धीचे सरपंच धनंजय पोटे यांनी दिली. अण्णा हजारे ८४ वर्षांचे आहेत. छातीत दुखू लागल्यामुळे त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल केले. अँजिओग्राफी केल्यावर हृदयात ब्लॉकेज आढळले. वयाचा विचार करुन डॉक्टरांनी लगेच उपचार सुरू केले आहेत. अण्णांच्या तब्येतीवर हॉस्पिटलचे अनुभवी डॉक्टर लक्ष ठेवून आहेत. डॉक्टरांनी अण्णांना विश्रांतीचा सल्ला दिला आहे. 

भ्रष्टाचार विरोधी आंदोलनामुळे अण्णा हजारे चर्चेत आले. याआधी त्यांनी गांधीवादी विचारांच्या जोरावर राळेगणसिद्धी गावाचा कायापालट केला. या कार्यासाठी अण्णा हजारे यांना १९९० मध्ये पद्मश्री आणि १९९२ मध्ये पद्मभूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

अण्णा हजारे यांच्या प्रकृतीविषयी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून चौकशी

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आल्याचे समजल्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या तब्येतीची चौकशी केली तसेच लवकर बरे व्हावेत अशी सदिच्छा व्यक्त केली. मुख्यमंत्री सध्या एच एन रिलायन्स रुग्णालयात दाखल असून त्यांच्यावर फिजिओथेरपी सुरू आहे. मात्र आज अण्णा हजारे यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे कळल्यावर त्यांनी अण्णांच्या प्रकृतीला आराम मिळावा अशी भावना व्यक्त केली.

अण्णांची प्रकृती ठणठणीत

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची तब्येत ठणठणीत असून काळजीचे कोणतेही कारण नाही. प्रसिद्धी माध्यमांच्या प्रतिनीधींकडून सातत्याने विचारणा होत असल्याने ही अधिकृत माहिती अण्णांच्या कार्यालयाकडून देण्यात येत आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी