Ahmednagar Police arrest accused in murder case of afghan sufi preacher: अफगाणिस्तानातून महाराष्ट्रात आलेले मुस्लिम धर्मगुरू ख्वाजा सय्यद चिश्ती यांची गेल्या महिन्यात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. मुस्लिम धर्मगुरूची हत्या झाल्याने एकच खळबळ उडाली होती. या हत्या प्रकरणानंतर नाशिक पोलिसांनी आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांच्या वेगवेगळ्या टीम्स तयार केल्या होत्या. मात्र, तरीही आरोपी हे फरारच होते. पण अखेर अहमदनगर पोलिसांनी एक मोठी कारवाई केली आहे. (Afghanistan spiritual guru sufi saint khwaja syed chishti murder case Ahmednagar police nabbed accused)
अहमदनगर पोलिसांनी या हत्या प्रकरणात तीन आरोपींना अटक केली आहे. संतोष ब्राह्मने, गोपाळ बुरगुले, विशाल पिंगळे अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे असल्याची माहिती समोर आली आहे. इतकेच नाही तर अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून दोन पिस्तूल आणि १० जिवंत काडतुसे देखील जप्त करण्यात आली आहेत.
अधिक वाचा : अल्पवयीन मुलीला छेडल्याचा जाब विचारला, आणि पुढे जे घडलं ते...
३ ऑगस्ट रोजी रात्री उशिरा अहमदनगर - मनमाड येथील एका हॉटेलवर काही अज्ञात इसम जेवण्यासाठी आले असून त्यांच्याकडे हत्यारे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचला. पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके आणि त्यांच्या पथकाने हॉटेलजवळ सापळा रचत तिन्ही आरोपींना अटक केली.
नाशिक जिल्ह्यातील येवला येथे ६ जुलै रोजी अफगाणिस्तानमधून आलेले मुस्लीम धर्मगुरू ख्वाजा सय्यद चिश्ती यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. दरम्यान आरोपींना अटक करण्यासाठी येवला पोलिसांनी अनेक जिल्ह्यात पथके ही रवाना केली होती. आता नगरमधून आरोपींना अटक करण्यात आली असून या आरोपींचा ताबा आता नाशिक पोलिसांकडे देण्यात येईल. आरोपींच्या चौकशीत हत्या करण्यामागचं नेमकं कारण काय आहे याबाबत अधिक माहिती समोर येईल.