समाजातील अपमानास्पद वागणुकीमुळे दोन मुलं आणि पत्नीला विषारी इंजेक्शन देत डॉक्टरची आत्महत्या

नगर
उमेर सय्यद
Updated Feb 20, 2021 | 17:44 IST

शनिवारी सकाळी डॉक्टरांना अनेक फोन करूनही त्यांच्या कडून प्रतिसाद मिळत नसल्याने कंपाउंडर व इतर लोक त्याचे घरी पोहचले. दार वाजवले मात्र तरीही दार उघडले न गेल्याने पोलिसांना कळवण्यात आले.

Ahmednagar doctor commits suicide by injecting his wife and two children with poison at rashin
दोन मुलं आणि पत्नीला विषारी इंजेक्शन देत डॉक्टरची आत्महत्या 

थोडं पण कामाचं

  • कोणता हा समाज ज्याने उद्ध्वस्त एक कुटुंब? 
  • समाजात मिळणाऱ्या अपमानास्पद वागणुकीमुळे डॉक्टरानें स्वतःसह कुटुंबीयांना देखील संपवले 

अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यात कर्जत तालुक्यातील राशीन येथील नामांकीत डॉ महेंद्र थोरात त्याची पत्नी दोन मुले हे आज आपल्या राहत्या घरात मृत अवस्थेत आढळून आल्याने तालुक्यात एकच खळबळ माजली. १६ वर्षीय मुलाला कानाने ऐकता येत नाही तर त्याला समाजात मिळणाऱ्या अपमानास्पद आणि अपराधीपणाच्या वागणुकीमुळे डॉक्टर महेंद्र थोरात यांनी स्वःत सह आपल्या कुटुंबीयांना देखील संपवले आहे.  

कर्जत तालुक्यातील राशीन येथील नामांकीत आणि सर्वात जास्त रुग्णांना सेवा देऊन लोकांच्या गळ्यातील ताईत असलेले डॉ महेंद्र जालिंदर थोरात (वय ४७) यांनी आपल्या राहत्या घरी गळफास घेतला असल्याचे उघड झाले. तर त्यांची पत्नी वर्षा महेंद्र थोरात (वय ४१), यांच्यासह दोन मुले कृष्णा (वय १६) आणि कैवल्य (वय ६) हे तिघेही घरात मृतावस्थेत आढळले.

शनिवारी सकाळी डॉक्टरांना अनेक फोन करूनही त्यांच्या कडून प्रतिसाद मिळत नसल्याने कंपाउंडर व इतर लोक त्याचे घरी पोहचले. दार वाजवले मात्र तरीही दार उघडले न गेल्याने शेवटी पोलिसांना बोलावून दार तोडून घरात प्रवेश केला असता अत्यंत धक्कादायक चित्र समोर आलं. 

सुसाईड नोटमध्ये काय?

दरम्यान पोलिसांना आत्महत्या केलेल्या खोलीत एक चिठ्ठी आढळली असून त्यामध्ये डॉ थोरात यांनी लिहिले आहे की, आमचा मुलगा कृष्णा यास ऐकण्यास कमी येत होते त्यामुळे समाजात आम्हाला खूप अपमानास्पद व्हावे लागत होते यातून आम्हा दोघांना खूप अपराधीपणा वाटत होते. यातुन आम्ही आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला असून याबाबत कोणाला ही जबाबदार धरू नये असे या चिठ्ठीत म्हटले आहे. 

सदर घटना अत्यंत क्लेशदायक असून हे समजताच संपूर्ण राशीन शहर बंद झाले जो तो हे कसे झाले हाच प्रश्न विचारत होता. डॉ थोरात यांनी मुलाच्या चिंतेने आपल्या परिवारालाच संपवल्याच्या या घटनेवर अनेकांचा विश्वासच बसत नाहीये. 

डॉक्टर थोरात यांच्या १६ वर्षीय कृष्णला ऐकता येत नव्हते. महेंद्र थोरात हे स्वःत डॉक्टर असल्यामुळे त्यांनी आपल्या मुलाचा चांगला उपचार व्हावा यासाठी अथक प्रयत्न केले मात्र कृष्णावर उपचार काही सफल होतं नव्हते. 

कोणता हा समाज ज्याने उद्ध्वस्त एक कुटुंब? 

अशा परिस्थिती एखद्याला धीर देण्याऐवजी आज समाजाने जनावरांप्रमाणे एक कुटुंब खाल्लं असे बोलायला हरकत नसावी? कारणं डॉक्टर थोरात यांनी त्यांच्या सुसाईड नोटमध्ये उल्लेख केला तो म्हणजे समाजाचा. मुलाला ऐकता येत नाही मात्र अशा मुलाला जगण्याची प्रेरणा देण्याऐवजी त्याला अपमानास्पद व अपराधीपणाची वागणूक देण्यात आल्यानेच आम्ही सामूहिक आत्महत्या करत असल्याची नोट डॉक्टर थोरात यांनी सोडली. 

मात्र समाजाच्या या जाचाला कंटाळून आज ज्या डॉक्टराने आपलं कुटुंब संपवलं तो समाज नेमका आहे तरी कसा. एखद्याच्या कुटुंबाला उध्वस्त करणाऱ्या असल्या समाजातील जनावरांना काही होईल का शिक्षा? की असले जनावर अश्याच एखद्या कुटुंबाला संपविण्याच्या प्रतीक्षेत आहे. याची दखल समाजातील माणसानांच घ्यावी लागेल हे मात्र नक्की.

दरम्यान या घटनेबाबत पोलिसांनी कर्जत पोलीस ठाण्यात आत्महत्येची नोंद केली असून पुढील तपास पोलीस करत असल्याची माहिती पोलीस उपअधीक्षक सौरभ अग्रवाल यांनी दिली आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी