School Student Corona Positive :अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील जवाहर नवोदय शाळेत ३३ विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. दोन दिवसांपूर्वी याच शाळेतील १९ विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे शाळेतील ४५० विद्यार्थ्यांची कोरोना टेस्ट करण्यात आली होती. त्यापैकी ३३ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे.
कोरोना बाधित सर्व विद्यार्थ्यांना पारनेर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. विद्यापीठात दोन दिवसांपूर्वी १९ आणि आज ३३ विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने एकूण रुग्णांची संख्या ५२ वर पोहोचली आहे. त्यामुळे शाळा ७ दिवसांसाठी बंद करण्यात आली आहे. ज्या विद्यार्थ्यांची टेस्ट निगेटिव्ह आले आहे त्यांना शाळेच्या वसतिगृहातच क्वारंटाईन करण्यात आले आहे.
केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या अखत्यारित जवाहर नवोदय विद्यालय ही अनुदानीत शिक्षण संस्था कार्यरत आहे. या शाळेत सहावी ते बारावीपर्यंत मोफत निवासी शिक्षणाची व्यवस्था आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण १९८६ अंतर्गत या शाळेची स्थापना झाली. आतापर्यंत शाळेला ३४ वर्ष झाली आहेत. या शाळेत प्रवेश घेण्यासाठी दरवर्षी पाचवी आणि आठवीत शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश परीक्षा देता येते. त्यांना प्रवेश परीक्षा आणि आपली पाचवी/आठवीची वार्षिक परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतरच प्रवेशालाठी पात्र ठरवले जाते.
प्रत्येक जिल्ह्यातून प्रवेश परीक्षा उत्तीर्ण झालेल्या फक्त ८० विद्यार्थ्यांची निवड केली जाते. या विद्यार्थ्यांना शाळेच्या वसतीगृहात राहून शिक्षण घ्यावे लागते. सीबीएसई बोर्डाच्या अभ्यासक्रमानुसार शाळेत शिक्षण दिले जाते. समाजाच्या सर्व थरांतील हुशार विद्यार्थ्यांना शिक्षणाची समान संधी मिळावी या हेतूने ही शिक्षणसंस्था कार्यरत आहे. ज्या जिल्ह्यांमध्ये ग्रामीण भागाचे प्रमाण जास्त आहे प्रामुख्याने अशा जिल्ह्यांमध्ये जवाहर नवोदय विद्यालयाच्या शाळा आहेत. देशात संस्थेच्या ६६१ शाळा आहेत.