विधानसभा निवडणूक: उमेदवारासह ४० कार्यकर्त्यांवर तात्काळ गुन्हा दाखल, पाहा असं नेमकं काय घडलं! 

नगर
Updated Oct 11, 2019 | 09:53 IST | ऊमेर सय्यद

अहमदनगरमध्ये एमआयएमच्या उमेदवारासह ४० कार्यकर्त्यांवर आचारसंहिता भंग केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर विरोधकांच्या दबावामुळेच गुन्हा दाखल करण्यात आल्याचं एमआयएम उमेदवाराने म्हटलं आहे.

ahmednagar police fir filed against mim candidate and his 40 activists on violating the code of conduct
विधानसभा निवडणूक: उमेदवारासह ४० जणांवर तात्काळ गुन्हा दाखल 

थोडं पण कामाचं

  • आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी उमेदवाराविरोधात गुन्हा दाखल
  • परवानगी न घेता रॅली काढल्याच्या आरोपाखाली एमआयएमच्या उमेदवारावर गुन्हा दाखल
  • अहमदनगरमधील कोतवाली पोलिसांनी केली कारवाई

अहमदनगर: प्रशासनाकडून परवानगी न घेता प्रचार रॅली काढत त्या रॅलीमध्ये एमआयएम पक्षाच्या घोषणा दिल्याप्रकरणी विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात एमआयएम पक्षाच्या तिकीटावर उभे असलेले उमेदवार मीर आसीफ सुलतान यांच्यासह त्यांच्या ४० कार्यकर्त्यांवर आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  

बुधवारी रात्री परवानगी न घेता एमआयएम पक्षाचे उमेदवार यांनी अहमदनगर शहरातून प्रचार रॅली काढली होती. त्या रॅलीमध्ये एमआयएम पक्षाचे अध्यक्ष असदउद्दीन ओवेसी यांच्या तसेच पक्षाच्या नावाने घोषणाबाजी करण्यात आली होती. दरम्यान विनापरवानगी प्रचार रॅली काढत आचारसंहिता आणि जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने लागू करण्यात आलेल्या जमाव बंदीचा भंग केल्याप्रकरणी पोलीस कर्मचारी सचिन गोरे यांच्या फिर्यादीवरून उमेदवार आसीफ सुलतान यांच्यासह त्यांच्या ४० कार्यकर्त्यांवर १४५१/२०१९ महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७ (१)(३)/१३५ नुसार कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

(एमआयएम उमेदवार)

'कोतवाली पोलिसांनी विरोधकांच्या दबावाखाली येऊन आमच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. नगर शहरात विना परवानगी शिवसेना-भाजप आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या प्रचार रॅली सुरू असताना देखील त्यांच्यावर पोलीस प्रशासन गुन्हे दाखल करत नाही. वास्तविक पाहता आम्ही प्रचार रॅली काढली नव्हती. मी नमाज पडायला शहर परिसरातील आशा चौक परिसरात गेलो होतो. दरम्यान मी एमआयएम पक्षाचा उमेदवार असल्यामुळे मला मतदार भेटायला आले होते. मात्र असं असताना पोलीस प्रशासनाने मला कोणतीही नोटीस न बजावता थेट गुन्हा दाखल केला.'  अशी प्रतिक्रिया एमआयएम पक्षाचे उमेदवार मीर आसीफ सुलतान यांनी दिली आहे.

अशाप्रकारे थेट गुन्हा नोंदविल्यामुळे नगरमध्ये आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. सध्या प्रचाराचा धुराळा संपूर्ण राज्यात सुरु आहे. पण सध्या आचारसंहिता लागू असल्याने उमेदवारांना देखील प्रचारादरम्यान काळजी घेणं आवश्यक ठरणार आहे.

विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी आता अवघे ८ दिवस उरले आहेत. त्यामुळे आता सर्वच पक्षांनी आपला प्रचार जोरदारपणे सुरु केला आहे. दरम्यान, २१ ऑक्टोबरला राज्यभरात मतदान पार पडणार आहे. तर २४ ऑक्टोबरला मतमोजणी होणार आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी