जोवर शेतकरी अडचणीत आहे, तोवर त्यांच्यावर वीजबिलाची सक्ती करणार नाही: उर्जा मंत्री 

नगर
Updated Aug 24, 2019 | 19:02 IST | ऊमेर सय्यद

Electricity Bills: सरकारवर मागील पाच वर्षात कोणत्याही शेतकऱ्याचं वीज कनेक्शन तोडलेलं नाही. अशी प्रतिक्रिया राज्याचे उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे. 

Bawankule
तोपर्यंत शेतकऱ्यांवर वीजबिलाची सक्ती करणार नाही: उर्जामंत्री  |  फोटो सौजन्य: Times Now

थोडं पण कामाचं

  • अहमदनगर, पुणे आणि सोलापूर या ३ जिल्ह्यातील अनेक भागांना वीज वितरण होणाऱ्या वीज उपकेंद्राचं भूमीपूजन
  • मागेल त्या गावांना वीज देणार, ऊर्जा मंत्री बावनकुळेंचं आश्वासन
  • शेतकरी अडचणीत असेपर्यंत वीज बिलासाठी सक्ती करणार नाही, बावनकुळेंची प्रतिक्रिया 

अहमदनगर: राज्य सरकारच्या महत्वाकांक्षी 'मुख्यमंत्री सौर ऊर्जा वाहिनी योजना' या अंतर्गत राज्यात मागेल त्या गावांना शाश्वत वीज उपलब्ध करुन देणार असल्याची माहिती ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे.  भाजपा आमदार आणि कॅबिनेट मंत्री राम शिंदे यांच्या प्रयत्नाने अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील देऊळवाडी येथे ३७५ कोटी रुपये खर्चाच्या ४०० KV या उच्च क्षमतेच्या वीज उपकेंद्राचे भूमीपूजन राज्याचे ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते पार पडले. अहमदनगर जिल्ह्यातील बाभळेश्वरनंतर हे सर्वात मोठे उपकेंद्र असणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली आहे 

'आज महाराष्ट्र सरकार ५ रुपये तोटा सहन करूनही राज्यातील शेतकऱ्यांना १ रुपया  ६० पैसे या दराने आम्ही वीज दिली आहे. एकट्या अहमदनगर जिल्ह्यामध्ये १ रुपये ६० पैसे किंमतीने वीज देऊन देखील साडेतीन लाख कोटी रुपयांची थकबाकी  शेतकऱ्यांकडे आहे. तर महाराष्ट्रातील एकूण ४२ लाख शेतकऱ्यांकड़े २७ हजार कोटी रुपये थकीत आहेत. मात्र आमच्या सरकारने मागली ५ वर्षात कधीही वीजेच्या वसुलीसाठी कोणत्याही शेतकऱ्याचे वीज कनेक्शन कापलेले नाही. जोपर्यंत शेतकरी अडचणीत आहे तोपर्यंत आम्ही शेतकऱ्यांकडून वीज बिलाची सक्ती करणार नाही.'  अशी प्रतिक्रिया ऊर्जा मंत्री बावनकुळे यांनी दिली आहे. 

दरम्यान अहमदनगर, पुणे आणि सोलापूर अशा तीन जिल्ह्यातील अनेक भागांना कर्जत येथील उपकेंद्रातून वीज वितरण होणार असून २०३५ पर्यंत या उपकेंद्र प्रकल्पाच्या माध्यमातून शेतकरी आणि उद्योगधंद्याना शाश्वत वीज मिळणार आहे. 

महाराष्ट्र सरकार मुख्यमंत्री सौर ऊर्जा वाहिनी योजनेअंतर्गत मागेल त्या गावांना वीज वितरण करण्यात येणार आहेत. यासाठी गावातील शेतकऱ्यांनी पडीक जमीन उपलब्ध करून द्यावी. शेतकऱ्यांनी जमीन उपलब्ध करून दिल्यास मागेल त्या गावांना योग्य दरात योग्य मेगावॅटच्या वीजचे प्रकल्प उभे करून दिले जातील. असा विश्वास चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला आहे. यावेळी भाजपाचे आमदार खासदार आणि पदाधिकारी आणि शेतकरी देखील या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

भाजपच्या अनेक नेत्यांकडून सध्या विकास कामांचं उद्घाटन केलं जात आहे. त्यामुळे आता आगामी विधानसभा निवडणुकीत या सगळ्याचा नेमका काय परिणाम होणार हे पाहणं देखील महत्त्वाचं आहे. दुसरीकडे नगर जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस देखील जोर लावत आहे. मंत्री राम शिंदे यांच्या मतदारसंघात शरद पवार यांचे नातू रोहित पवार हे आव्हाने देणार असल्याचं जवळपास निश्चित झालं आहे. त्यामुळे आता राम शिंदे यांनी देखील मतदारसंघात वेगवेगळी विकास कामं सुरु केली आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...