अहमदनगर : शनिशिंगणापुरात (shani shingnapur) पूजा साहित्यांच्या माध्यमातून भाविकांची होणारी फसवणूक होत असल्याची तक्रार वारंवार होत असल्यानं अखेर देवस्थाननं (Devasthan) याची दखल घेतली आहे. पूजा साहित्यात देण्यात येणाऱ्या यंत्राची तक्रार भाविकानं थेट राज्य सरकारला (State Government) केल्यानंतर शनिशिंगणापूर देवस्थानने पुजासाहित्यातील सर्व यंत्र मंदिरात नेण्यास बंदी घातल्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती देवस्थानचे अध्यक्ष भागवत बानकर यांनी दिली.
देवावरील श्रद्धेचा फायदा घेत पुजासाहित्यातील यंत्राच्या माध्यमातून भाविकांची दिशाभूल केली जात होती. अव्वाच्या-सव्वा पैसे भाविकांकडून उकळले जात असल्याने देवस्थानने यंत्र बंदीचा धाडसी निर्णय घेतला आहे. 30 एप्रिलच्या शनिवार रोजीच्या अमावस्या यात्रेत मंदिर परीसरात यंत्राचा सडा पडला होता. पायदळी पडणाऱ्या यंत्राने पावित्र्य बिघडत आहे, अशी तक्रार भाविकांनी राज्य सरकारला केली होती.यानंतर विश्वस्त मंडळाने बैठक घेवून पुजेच्या ताटातील नवग्रह यंत्र, शनियंत्र, शिक्का व कलश यंत्र मंदिरात घेवून जाण्यास बंदी घातली आहे. त्यामुळे शनैश्वर देवस्थाननं सर्व पुजा-साहित्य विक्रेत्यांना यंत्र बंदीबाबत सुचित केलंय. तर त्याचबरोबर या वस्तू मंदिरात जाणार नाही याकरीता सुरक्षा विभागाचे पथक महाद्वारमध्ये ठेवण्यात आले आहेत. या धाडसी निर्णयानंतर पुजा विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत.
बंदी घातलेल्या वस्तूसह पुजेचे ताट पाचशे ते दोन हजारास विकले जात होते. देवस्थानच्या निर्णयाचे भाविकांनी स्वागत केले आहे. तसंच यंत्र बंदीचा निर्णय कायमस्वरुपी अमलात रहावा अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.