VIDEO: नगरमधील प्रसिध्द उद्योजकाचं भर रस्त्यातून अपहरण, थरार नाट्य सीसीटीव्हीमध्ये कैद 

नगर
Updated Nov 18, 2019 | 17:20 IST | ऊमेर सय्यद

अहमदनगरमधील एका प्रसिद्ध उद्योजकाचं भर रस्त्यातून अपहरण केल्याची घटना नुकतीच उघडकीस आली आहे. दरम्यान, हा सगळा प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.

famous businessman abducted in ahmednagar thriller drama imprisoned in cctv
VIDEO: नगरमधील प्रसिध्द उद्योजकाचं भर रस्त्यातून अपहरण, थरार नाट्य सीसीटीव्हीमध्ये कैद   |  फोटो सौजन्य: Times Now

थोडं पण कामाचं

  • अहमदनगरमध्ये प्रसिद्ध उद्योजकांचं भर रस्त्यातून अपहरण
  • नगरमधील उद्योजकाच्या अपहरणामुळे परिसरात घबराट
  • बंदुकीचा धाक दाखवून करीम हुंडेकरी यांचं अपहरण

अहमदनगर: अहमदनगर जिल्ह्यातील प्रसिध्द उद्योजक करीम हुंडेकरी यांचे आज पहाटे ५ वाजेच्या सुमारास शहरातील कोठला परिसरातून अपहरण करण्यात आलं आहे. भल्या पहाटे एका उद्योजकाचं अपहरण झाल्याने संपूर्ण अहमदनगर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली असून कारण अद्यापही स्पष्ट झालेलं नाही. दरम्यान, अपहरणावेळी घटना स्थळावरून एक कार भरधाव वेगाने जात असल्याचं सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागलं असून सध्या  पोलिस या फुटेजच्या आधारेच संपूर्ण तपास करत आहेत. 

करीम हुंडेकरी हे पहाटे कोठला परिसरातील मक्का मस्जिद येथे नमाज पठण करण्यासाठी जात असतानाच त्यांचं अपहरण केलं. एका पांढऱ्या रंगाच्या कारमधून आलेल्या काही जणांनी हुंडेकरी यांना बंदुकीचा धाक दाखवत त्याचे अपहरण केलं असल्याचं समजतं आहे.. दरम्यान, अद्याप या अपहरणामागचं नेमकं कारण स्पष्ट झालेलं नाही. याशिवाय या अपहरणामागचा नेमका सूत्रधार कोण आहे हे देखील समजू शकलेलं नाही. सध्या पोलिस याप्रकरणी कसून तपास करत आहेत.

करीम हुंडेकरी हे अहमदनगर जिल्ह्यातील नामांकित उद्योजकांपैकी एक उद्योजक असून त्यांच्या अपहरणाने व्यापारी वर्गामध्ये घबराट आणि दहशतीचं वातावरण निर्माण झालं आहे.  

विशेष म्हणजे हुंडेकरी यांचं अपहरण ज्यावेळी करण्यात त्यावेळी काही जणांनी अपहरणकर्त्यांना पाहिलं असल्याचं समजतं आहे. त्यामुळे प्रत्यक्षदर्शीआणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलीस अपहरणकर्त्यांचा शोध घेत आहेत. दरम्यान, याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा देखील  दाखल करण्यात आला आहे. 

(उद्योजक करीम हुंडेकरी)

दरम्यान, करीम हुंडेकरी यांचं अपहरण होऊन आता अनेक तास उलटून गेलेले आहे. मात्र, अपहरणकर्त्यांनी त्यांच्या कुटुंबीयांजवळ किंवा इतर कुणाजवळही कोणतीही मागणी केलेली नाही. त्यामुळे हे अपहरण पैशासाठी करण्यात आलं आहे की इतर दुसऱ्या कोणत्या गोष्टीसाठी याविषयी अद्याप तरी कुणालाही काहीही माहिती नाही. मात्र, अपहरणकर्त्यांकडे हत्यारं असल्यामुळे हुंडेकरी यांच्या कुटुंबीयांमध्ये अतिशय चिंतेचं वातावरण पसरलं आहे.  

अहमदनगरमध्ये अशा प्रकारे अपहरणाची घटना घडल्यामुळे आता पोलिसांसमोर देखील मोठं आव्हान निर्माण झालं आहे. त्यामुळे लवकरात लवकर अपहरणकर्त्यांना अटक करुन करीम हुंडेकरी यांची सुटका करणं ही पोलिसांची प्राथमिकता असणार आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी