मूल होत नाही म्हणून पत्नीवर अत्याचार करण्याची मित्राला दिली परवानगी; आरोपी पतीला अटक

नगर
भरत जाधव
Updated Sep 26, 2021 | 15:43 IST

राज्यात काही ठिकाणी महिलांवरील अत्याचाराच्या घटना उघडकीस येत असताना अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात घृणास्पद प्रकार घडला आहे.

Husband gives permission to friends to abuse wife
पत्नी अत्याचार करण्यासाठी पतीनेच मित्राला दिली परवानगी   |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • पीडित महिलेने शेजारी राहणाऱ्या महिलेच्या मदतीने पोलिसात केली तक्रार.
  • पत्नीवर नराधम पतीचे अत्याचार

अहमदनगरः राज्यात काही ठिकाणी महिलांवरील अत्याचाराच्या घटना उघडकीस येत असताना अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात घृणास्पद प्रकार घडला आहे. एका पतीनेच पत्नीवर बलात्कार करण्यासाठी मित्रांना परवानगी दिली. मित्राच्या मदतीने पत्नीवर अत्याचार घडवून आणल्याचा गुन्हा पतीने केला आहे.  मूल होत नाही, म्हणून पत्नीला जबदस्तीने आपल्या मित्रासोबत संबंध ठेवण्यास भाग पाडणारा पती आणि त्याच्या मित्रालाही पोलिसांनी अटक केली. पीडित महिलेने शेजारी राहणाऱ्या महिलेच्या मदतीने आपल्या नातेवाईकांशी संपर्क केला आणि पोलिसांत जाऊन फिर्याद दिल्याने हा प्रकार उघडकीस आला.

भांडणानंतर माहेरी गेली होती पत्नी

कल्याणच्या एका २२ वर्षीय तरुणीचे पाथर्डी तालुक्यातील एका गावातील तरुणाशी २०२० मध्ये लग्न झाले आहे. काही काळ पतीच्या कुटुंबियांसह ती सासरी राहिली. त्यानंतर भांडण झाल्याने माहेरी निघून गेली होती. मागील महिन्यात ती सासरच्या गावातच राहणाऱ्या तिच्या आजोबांकडे राहण्यासाठी आली. सुमारे पंधरा दिवसांपूर्वी तिचा पती तिच्या आजोबांच्या घरी आला. झाले गेले विसरून जाऊन पुन्हा नांदायला चल असे म्हणून तिलासोबत घेऊन गेला. 

नशेच्या गोळ्या देऊन पीडितेवर अत्याचार

सासरी राहत असताना २२ सप्टेंबरच्या रात्री तिचा पती त्याच्या एका मित्रासह घरी आला. घरात दोघांनी तिच्या खोलीत जाऊन दरवाजा आतून बंद केला. आपल्याला मूल हवे असल्याने तू या मित्राशी संबंध ठेव, असे पतीने पत्नीला सांगितले. यासाठी तिने नकार दिला. तेव्हा पतीने तिला पकडून तिच्या तोंडात जबरदस्तीने दोन गोळ्या टाकल्या. त्यामुळे तिला काही वेळातच चक्कर आली. त्यानंतर पतीच्या मित्राने तिच्यावर अत्याचार केले. त्यानंतर पतीनेही अत्याचार केले. नंतर मित्र निघून गेला. पतीने तिला धमकावले की ही गोष्ट कोणाला सांगू नको. मूल हवे असेल तर मित्राशी संबंध ठेवावेच लागतील. त्यानंतर दुसऱ्या दिवशी रात्री पुन्हा तो मित्र घरी आला. त्या दोघांनीही पुन्हा तिच्यावर अत्याचार केले.

शेजारी राहणाऱ्या महिलेच्या मदतीने केली तक्रार

दुसऱ्या दिवशी दुपारी पती घरी नसताना त्या तरुणीने शेजारी राहणाऱ्या महिलेकडे जाऊन तिच्या मोबाईलवरून माहेरी संपर्क केला. त्यानुसार तिचा मामा तिच्याकडे आले. दोघांनी पाथर्डी पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दिली. पोलिसांनी तातडीने गुन्हा दाखल केल्यानंतर पती आणि त्याच्या मित्राला अटक करण्यात आली.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी