शिवसेनेच्या बालेकिल्ल्याला राष्ट्रवादीचा सुरुंग, पाच नगरसेवकांचा राष्ट्रवादीत प्रवेश 

नगर
उमेर सय्यद
Updated Jul 04, 2020 | 19:50 IST

Shiv Sena Corporator join NCP: राष्ट्रवादीचा शिवसेनेला मोठा झटका, नगर पंचायतीच्या पाच विद्यमान नगरसेवकांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश.

jolt to shiv sena in Ahmednagar as 5 corporator join ncp
शिवसेनेच्या बालेकिल्ल्याला राष्ट्रवादीचा सुरुंग 

थोडं पण कामाचं

  • अहमदनगरमध्ये शिवसेनेला मोठा धक्का 
  • शिवसेनेच्या पाच विद्यमान नगरसेवकांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश 
  • उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत बारामतीमध्ये झाला प्रवेश

अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर नगर पंचायतीतील (Parner Nagar Panchayat) शिवसेनेच्या पाच विद्यमान नगरसेवकांनी (Shiv Sena Corporator) बारामतीत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या उपस्थिती राष्ट्रवादी (NCP) पक्षात प्रवेश केला आहे. शिवसेनेच्या विद्यमान नगरसेवकांनीच राष्ट्रवादीत प्रवेश केल्याने शिवसेनेच्या नगरपंचायतीच्या बालेकिल्ल्याला राष्ट्रवादीने सुरुंग लावल्याने राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे.

यामध्ये शिवसेनेच्या किसन गांधाडे, डॉक्टर मूद्द्सर सय्यद, नंदू देशमुख, वैशाली औटी, नंदा देशमाने या नगरसेवकांचा समावेश आहे. या सर्वच्या सर्व पाच नगरसेवकांनी राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला आहे. दरम्यान पारनेर नगर पंचायतीच्या स्थापनेपासून पारनेर नगर पंचायत ही शिवसेनेचे माजी मंत्री विजय औटी यांच्या ताब्यात आहे. मात्र असं असलं तरी आगामी नगरपंचायत निवडणुका डोळ्यासमोर ठेवून पारनेर तालुक्याचे राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार निलेश लंके यांनी शिवसेनेला शह देण्यासाठीच पाच नगरसेवकांचा राष्ट्रवादी पक्ष प्रवेश करवून घेतला असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. 

वास्तविक पहाता शिवसेनेचे माजी मंत्री विजय औटी यांच्या ताब्यात असल्याने पारनेर नगर पंचायतीने विजय औटी यांना प्रत्येक विधानसभा निवडणुकीत भरभरून मतदान करून निवडून दिले. मात्र आत्ता पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत पारनेर तालुक्याने राष्ट्रवादीचे निलेश लंके यांना विधानसभेवर पाठवल्याने शिवसेनेत मतभेदाचे वातावरण निर्माण झाले होते.

आता अखेर नगरपंचायतीच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांच्या नेतृत्वाखाली बारामतीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत शिवसेनेच्या पाच नगरसेवकांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्याने राजकीय वर्तुळात या प्रवेशाची चांगलीच चर्चा रंगली आहे.

महाराष्ट्रात शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांची सत्ता आहे. मात्र असे असले तरी तिन्ही पक्षांत मतभेद असल्याच्या घटना देखील समोर आल्या आहेत. सरकार निर्णय घेताना आपल्याला विश्वासात घेत नसल्याने काँग्रेस नेते नाराज होते. तर लॉकडाऊनचा कालावधी वाढवताना आपल्याला विश्वासात घेतले नसल्याचं काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते खासगीत बोलत आहेत. त्यानंतर आता राष्ट्रवादीने शिवसेनेचे पाच नगरसेवक आपल्या गळाला लावल्याने राजकीय वर्तुळात विविध चर्चा सुरू झाल्या आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी