Kalsubai : अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील महाराष्ट्राचे ऐव्हरेस्ट म्हणुन परीचित असलेल्या कळसुबाई शिखरावर मुसळधार पाऊस झाला. या शिखराच्या पायथ्याशी असलेल्या कृष्णावंती नदीला आलेल्या पुरामुळे हजारो पर्यटक शिखरावर अडकले होते. तेव्हा स्थानिक नागरिकांच्या मदतीने पोलिसांनी या पर्यटकांची सुटका केली आहे.
भंडारदरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात व कळसुबाई शिखराच्या परिसरात शनिवारी सकाळपासून अतिवृष्टी होत होती. शिखरावरही प्रचंड पाऊस पडत असल्याने संपुर्ण पाणी पायथ्याशी उगम पावलेल्या कृष्णावंती नदीला येऊन मिळत असल्याने कृष्णावंती नदीला पुर आला होता. शनिवार असल्याने सकाळी पावसाचा अंदाज न आल्याने हजारो पर्यटक शिखराच्या दिशेने गिर्यारोहनासाठी रवाना झाले होते.
सकाळी ९ वाजल्यापासून मात्र प्रचंड प्रमाणात पाऊस सुरु झाल्याने गिर्यारोहक शिखर खाली उतरुन आले असता नदीच्या पाण्यामुळे बारी व जहागिरवाडी या ठिकाणी पोहचु शकत नव्हते. तेव्हा काही गिर्यारोहकांनी पोलिस हेल्पलाईन क्रमांक ११२ ला फोन करत पुराच्या पाण्यामुळे अडकल्याची माहिती दिली. हा संदेश तातडीने राजुर पोलीस स्थानकाला प्राप्त होताच सहाय्यक पोलिस निरीक्षक नरेंद्र साबळे आपल्या फौजफाट्यासह घटनास्थळावर हजर झाले.
तोपर्यंत जहागिरदार वाडीतील काही व्यावसायिक, गाईड आणि स्थानिक नागरिकांनी दोरीच्या सहाय्याने नदीच्या पलिकडे अडकलेल्या गिर्यारोहकांना स्वत: नदीवरील एका केटीवेअरच्या ठिकाणी पाण्यात उभे राहत साखळी करत बाहेर काढण्यास सुरुवात केली. जवळजवळ संध्याकाळी सात वाजेपर्यंत हे बचाव कार्य सुरच होते. संध्याकाळपर्यंत एक हजार गिर्यारोहकांची सुखरुप सुटका करण्यात पोलीस व ग्रामस्थांना यश आले होते.
अधिक वाचा : कडक सॅल्यूट ! रजेवर असलेल्या जवानाने जीवाची पर्वा न करता वाचवले प्रवाशांचे प्राण