अहमदनगरच्या ६१ गावांमध्ये पुन्हा लॉकडाऊन!

नगर
उमेर सय्यद
Updated Oct 03, 2021 | 23:40 IST

महाराष्ट्रातील कोरोना संकट नियंत्रणात येत असताना अहमदनगर जिल्ह्यातील ६१ गावांमध्ये पुन्हा लॉकडाऊन लागणार आहे.

lockdown in 61 villages in ahmednagar district maharashtra
अहमदनगरच्या ६१ गावांमध्ये पुन्हा लॉकडाऊन! 
थोडं पण कामाचं
  • अहमदनगरच्या ६१ गावांमध्ये पुन्हा लॉकडाऊन!
  • जिल्ह्यातील ११ तालुक्यांमधील ६१ गावांमध्ये लॉकडाऊन
  • ज्या गावांमध्ये दहापेक्षा जास्त कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण आढळले अशा ६१ गावांमध्ये लॉकडाऊन

अहमदनगर: महाराष्ट्रातील कोरोना संकट नियंत्रणात येत असताना अहमदनगर जिल्ह्यातील ६१ गावांमध्ये पुन्हा लॉकडाऊन लागणार आहे. कोरोना संसर्ग पसरू लागल्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी हा निर्णय घेतला आहे. lockdown in 61 villages in ahmednagar district maharashtra

अहमदनगर जिल्ह्यात दररोज ५०० ते ८००च्या दरम्यान कोरोना रुग्ण आढळत आहेत. जिल्ह्याचा पॉझिटीव्हीटी रेट पाच टक्क्यांपेक्षा जास्त आहे. यामुळे जिल्ह्यातील ज्या गावांमध्ये दहापेक्षा जास्त कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण आढळले अशा ६१ गावांमध्ये लॉकडाऊन लावण्याचा निर्णय घेण्यात आला. 

अहमदनगर जिल्ह्यातील ११ तालुक्यांमधील ६१ गावांमध्ये लॉकडाऊन लावला जाणार आहे. यामध्ये संगमनेर तालुक्यातील २४, श्रीगोंदा तालुक्यातील ९, राहाता तालुक्यातील ७ तर पारनेर तालुक्यातील ६ गावांसह अकोले, कर्जत, कोपरगाव, नेवासा, पाथर्डी, शेवगाव, श्रीरामपूर या तालुक्यांतील गावांचा समावेश आहे.

सोमवार ४ ऑक्टोबर पासून १३ ऑक्टोबर पर्यंत लॉकडाऊन राहील आणि १४ ऑक्टोबर पासून लॉकडाऊन शिथील करायचा की नाही याचा निर्णय तत्कालीन परिस्थिती पाहून घेतला जाईल. लॉकडाऊन काळात संबंधित गावांमध्ये पाच  पेक्षा जास्त नागरिकांना सार्वजनिक ठिकाणी एकत्र येण्यास मनाई आहे. कृषी माल खरेदी-विक्री आणि वाहतूक, अत्यावश्यक वस्तू आणि सेवांची खरेदी-विक्री तसेच त्यांच्याशी संबंधित वाहतूक, औषधांची दुकाने, वैद्यकीय सेवा वगळता बाकी सर्व बंद राहणार आहे. बाहेरील वाहनांना विना परवानगी लॉकडाऊन क्षेत्रात प्रवेश करता येणार नाही. दुधाचे संकलन आणि वितरण कोविड प्रोटोकॉलचे पालन करुन करण्याचे बंधन राहील. किराणा मालाची दुकानं सकाळी ८ ते ११ या तीन तासांसाठी सुरू राहतील. संपूर्ण लॉकडाऊन क्षेत्रात कोविड प्रोटोकॉलचे पालन करण्याचे बंधन राहील. लॉकडाऊन क्षेत्रातील शिक्षण संस्था आणि धार्मिक स्थळे बंद राहणार आहेत. लॉकडाऊन क्षेत्रात सभा, समारंभ, बैठका, रॅली, मोर्चा, प्रचार कार्यक्रम, वाढदिवस, लग्न, सामाजिक-सांस्कृतिक कार्यक्रम आणि राजकीय कार्यक्रम यांना बंदी राहील.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी