दूध दरवाढीसाठी राज्यभरात आंदोलन, शेतकऱ्यांसह भाजपा उतरली रस्त्यावर

नगर
उमेर सय्यद
Updated Aug 01, 2020 | 11:56 IST

दूध दरवाढीच्या मागणीसाठी राज्यभरात आंदोलनाला सुरूवात झाली आहे. दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या सोबतच भारतीय जनता पक्षाचे नेतेही रस्त्यावर उतरुन आंदोलन करत आहेत. 

Maharashtra Dairy farmers launch a protest
दूध दरवाढीसाठी राज्यभरात आंदोलन, शेतकऱ्यांसह भाजप उतरली रस्त्यावर  |  फोटो सौजन्य: ANI

थोडं पण कामाचं

  • राज्यभरात दूध आंदोलनाचा एल्गार 
  • दूध दरवाढीची मागणी करत शेतकरी आक्रमक 
  • संतप्त शेतकऱ्यांनी रस्त्यावर ओतले दूध 

अहमदनगर : दूध उत्पादक शेतकऱ्यांना दुधाला किमान ३० रुपये दर मिळावा या प्रमुख मागाणीसाठी राज्यात किसान सभा आणि दुध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीने आज पासून पुन्हा आंदोलन सुरू केले आहे. शेतकऱ्यांच्या या मागणीसाठी भारतीय जनता पार्टीनें देखील ठाकरे सरकार विरोधात आंदोलनाचं हत्यार उपसले असून भाजपा नेते राधाकृष्ण विखेपाटील आणि राम शिंदे हे देखील रस्त्यावर उतरले आहेत.

दुध दरवाढ करावी यासाठी शेतकऱ्यांनी अहमदनगर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात दगडाला दुधाचा अभिषेक घालून आंदोलनास सुरवात केली आहे. तर माजी मंत्री राधाकृष्ण विखेपाटील यांनी राहता तर राम शिंदे यांनी नगर - सोलापूर महामार्गावर आंदोलन केले आहे.

लॉकडाऊन पूर्वी शेतकऱ्यांना गायीच्या दुधासाठी ३० ते ३५ रुपये प्रति लिटर दर मिळत होता. आज परिस्थिती काही प्रमाणात पूर्व पदावर येऊन सुध्दा शेतकऱ्यांना दुधासाठी केवळ १७ रुपये प्रति लिटर दर दिला जात आहे. वाढलेल्या उत्पादन खर्चाच्या तुलनेत दिला जाणारा हा दर अत्यंत तोकडा आहे. सरकारने शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी १० लाख लिटर दुध खरेदी करून यापासून पावडर बनविण्याचा निर्णय घेतला होता. मात्र हा निर्णय केवळ मोजक्या सहकारी संघांना लागू करण्यात आला होता. राज्यात एकूण दूध संकलनापैकी ७८ टक्के दूध संकलित करणाऱ्या खाजगी संघ व कंपन्यांना या योजनेतून वगळण्यात आले होते. परिणामी राज्यातील केवळ १२ तालुक्यातील शेतकऱ्यांनाच या योजनेचा अंशतः लाभ मिळाला असुन सरकारने दुधाला ३० रुपये भाव द्यावा या मागणीसाठी हे आंदोलन सुरू करण्यात आले आहे.

दरम्यान लादलेल्या अटी व शर्तीमुळे १० लाख लिटर पैकी प्रति दिन केवळ निम्मेच दूध सरकार खरेदी करू शकले. सरकारच्या अशा अपुऱ्या व पक्षपाती हस्तक्षेपामुळे शेतकऱ्यांना कोट्यवधींचा तोटा सहन करावा लागला असून आज पासून दूध उत्पादक शेतकरी रस्त्यावर उतरला असून दगडाला दुधाचा अभिषेक घालून आंदोलन सुरू करण्यात आले आहे.

दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समिती व किसान सभा या प्रश्नावर गेली महिनाभर विविध मार्गाने सरकारचे लक्ष वेधत होती. राज्यातील विविध शेतकरी नेते व संघटनाही या प्रश्नावर सक्रिय होत्या. सरकारने या पार्श्वभूमीवर शेतकरी संघटना, किसान सभा व दुध संघाची एकत्र बैठक २१ जुलै रोजी आयोजित केली होती. मात्र बैठकांमध्ये वेळ वाया घालवण्याची गरज नसल्याचे सांगत सरकारला दूध उत्पादकांचे प्रश्न माहीत आहे, त्यामुळे प्रति लिटर १० रुपये अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केल्यास शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे. बैठकांमध्ये वेळ वाया घळविण्या ऐवजी १० रुपये प्रति लिटर थेट अनुदानाची सरकारने घोषणा करावी अशी मागणी किसान सभेने यावेळी केली आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी