अहमदनगर : मंकीपॉक्स व्हायरसची दहशत आता भारतात देखील होऊ लागली आहे. यां व्हायरसचा एकही रुग्ण भारतात आढळून आलेला नाही. मात्र तरीही राज्य सरकारच्या आदेशानुसार अहमदनगर जिल्हा देखील अलर्ट झाला आहे. जिल्ह्यातील सर्वात गजबजलेले एअरपोर्ट असलेल्या शिर्डीत प्रशासनाने कंबर कसली आहे.
अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी येथील एअरपोर्टवर कोविडमध्ये ज्या प्रकारे प्रवाश्यांची तपासणी केली गेली होती, तशाच प्रकारची तपासणी करण्यात येणार असल्याची प्रतिक्रीया जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिली आहे.
२ वर्ष जगात थैमान घातलेला कोरोना विषाणूची प्रकरणे कमी झाली आहे. पण आता मंकीपॉक्स या विचित्र व्हायरसची दहशत सुरू झाली आहे. जगभरातील अनेक देशांमध्ये मंकीपॉक्सची लागण झालेले रुग्ण आढळून आले आहे .
WHOच्या मते, मंकीपॉक्स हा विषाणूजन्य झुनोटिक रोग आहे. याचे विषाणू प्राण्यांपासून माणसात पसरतात. सध्या भारतात मंकीपॉक्सचा एकही रुग्ण आढळून आलेला नाही, मात्र इतर देशांतील प्रकरणे पाहता केंद्रीय आरोग्य विभागाने सर्व राज्यांना सतर्क राहण्याचे निर्देश दिले आहेत.
त्यानुसार शिर्डी एअरपोर्टवर एक टीम तैनात करण्यात येणार असून एअरपोर्टवर बाहेर राज्यातून किंवा देशातून आलेल्या प्रवाश्यांची तपासणी केली जाणार आहे. तपासणीमध्ये लक्षणे आढळून आल्यास संबंधितास विलगीकरणात ठेवण्यात येणार आहे. अशी माहिती अहमदनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी दिली आहे.
जगभरात मंकीपॉक्सच्या रुग्णसंख्येत वाढ पाहता केंद्र सरकार सतर्क झाले आहे. केंद्र सरकारने हे प्रकरण गांभीर्यानं घेत आंतरराष्ट्रीय विमानतळं, बंदर आणि देशाच्या सीमाभागांत लक्ष ठेवण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान महाराष्ट्रात राज्य सरकारने देखील अॅडव्हायझरी जारी केली आहे. त्यानुसार आता अहमदनगर प्रशासन देखील अलर्ट झाले आहे.