राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्या रेखा जरे यांची गाडी अडवून भर रस्त्यात हत्या

नगर
रोहित गोळे
Updated Dec 01, 2020 | 17:01 IST

अहमदनगर जिल्ह्यातील महिला कार्यकर्त्या रेखा जरे यांची गाडी अडवून भर रस्त्यात गळा चिरुन हत्या केल्याची धक्कादायक घटना पारनेरमध्ये घडली आहे. या घटनेमुळे संपूर्ण नगरमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. 

rekha jare
राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्या रेखा जरे यांची गाडी अडवून भर रस्त्यात हत्या  |  फोटो सौजन्य: Facebook

थोडं पण कामाचं

  • राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्या रेखा जरे यांची हत्या
  • भर रस्त्यात गाडी अडवून करण्यात आली हत्या
  • दुचाकीस्वाराने रेखा जरे यांच्या गळ्यावर केले धारदार शस्त्राने वार

अहमदनगर: राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्या (NCP activist)  रेखा जरे-पाटील (Rekha Jare)  यांची भर रस्त्यात गळा चिरून हत्या (Murder) केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्यातील पारनेर तालुक्यात ही धक्कादायक घटना घडली आहे. मारेकऱ्यांनी रेखा जरे यांच्या गळ्यावर धारदार शस्त्राने हल्ला करत त्यांची हत्या केल्याची प्राथमिक माहिती मिळते आहे. दरम्यान, एका महिला कार्यकर्त्याच्या हत्येमुळे संपूर्ण अहमदनगर जिल्हा हादरुन गेला आहे. ही घटना काल (सोमवार) रात्री आठ वाजेच्या सुमारास घडली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, पारनेर तालुक्यातील जतेगाव येथे एका दुचाकी स्वाराने रेखा जरे यांची कार अडवून त्यांच्यावर जीवघेणा हल्ला चढवला. ज्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला. रेखा जरे यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केल्याने त्या गंभीररित्या जखमी झाल्या होत्या. त्यामुळे त्यांना तात्काळ अहमदनगर जिल्हा रुग्णालयात नेण्यात आलं होतं. पण त्याआधीच त्यांचा मृत्यू झाला. 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रेखा जरे, त्यांचा मुलगा आणि त्यांच्या आई या पुण्याहून नगर येत असताना जतेगाव येथे त्यांच्या कारची काच दुचाकी स्वाराला लागल्याने त्यातून मोठा वाद झाला. कारची काच लागल्याने दुचाकीस्वार संतापला व त्याने रेखा जरे यांच्या कारला ओव्हरटेक करत त्यांची कार अडवली. त्यानंतर भर रस्त्यात दुचाकीस्वारासोबत रेखा जरे यांचा वाद झाला. त्याचवेळी दुचाकीस्वाराने थेट धारदार शस्त्राने थेट त्यांच्या गळ्यावर वार केले. यावेळी दुचाकीस्वारासोबत आणखी एक जण असल्याची देखील माहिती मिळते आहे. दरम्यान, एका क्षुल्लक वादातून ही हत्या घडली की यामागे आणखी देखील काही कारण आहे याचा देखील पोलीस तपास करत आहेत. 

दरम्यान, या घटनेनंतर पोलीस अधिकारी विशाल ढुमे यांनी हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी पोलिसांची वेगवेगळी पथके रवाना केली आहेत. त्यामुळे लवकरच आरोपींना अटक करण्यात येईल. दुसरीकडे या घटनेची माहिती मिळताच अहमदनगरचे आमदार संग्राम जगताप यांनी तात्काळ रुग्णालयात धाव घेऊन या घटनेची माहिती घेतली.

रेखा जरे या गेल्या अनेक वर्षांपासून महिला सक्षमीकरणासाठी काम करत होत्या. यशस्विनी महिला ब्रिगेड (Yashaswini Mahila Brigade)  ही संस्था देखील त्यांनी स्थापन केली होती. ज्याच्या त्या अध्यक्ष देखील होत्या. अहमदनगर जिल्ह्यात महिलांच्या सक्षमीकरणासाठी त्यांनी अनेक उपक्रम देखील राबवले होते. तसंच अनेक प्रश्नांसाठी त्यांनी आंदोलने देखील केली होती. याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात देखील त्या बऱ्याच प्रमाणात सक्रीय होत्या.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी