अहमदनगर: आज का शिवाजी नरेंद्र मोदी पुस्तकाचा निषेध, NCPकडून शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला दुधाभिषेक

नगर
Updated Jan 14, 2020 | 19:37 IST | ऊमेर सय्यद

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांशी केल्यानं आज अहमदनगरमध्ये निषेध करण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसनं 'आज का शिवाजी नरेंद्र मोदी' या पुस्तकाचा निषेध नोंदवला.

Ahmednagar NCP
अहमदनगर: आज का शिवाजी नरेंद्र मोदी पुस्तकाचा निषेध, NCPकडून शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला दुधाभिषेक 

अहमदनगर: भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांशी केल्यानं आज अहमदनगरमध्ये निषेध करण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसनं 'आज का शिवाजी नरेंद्र मोदी' या पुस्तकाचा निषेध नोंदवला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी नगरमधल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास दुधाभिषेक घातला. भारतीय जनता पार्टीचे नेते जय भगवान गोयल यांनी पंतप्रधान मोदी यांची छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी तुलना करत आज का शिवाजी नरेंद्र मोदी हे पुस्तक प्रकाशित केलं होतं. पुस्तकाच्या नावावरून तसंच नरेंद्र मोदीची छत्रपती शिवाजी महाराजांशी तुलना केल्यानं महाराष्ट्रभर संतापाची लाट पहायला मिळाली. तसंच यावरून राज्यभर बरंच राजकारणही तापलं.

आज अहमदनगरमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे शहर जिल्हा अध्यक्ष माणिकराव विधाते यांच्या नेतृत्वाखाली पुस्तकाचे लेखक भगवान गोयल यांचा निषेध करत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला दुधाभिषेक घालण्यात आला.

 वादग्रस्त पुस्तक अखेर घेतलं मागे

 दोनच दिवसांपूर्वी 'आज के शिवाजी - नरेंद्र मोदी' हे पुस्तक राजधानी दिल्लीच्या भाजप कार्यालयात प्रकाशित करण्यात आलं होतं. छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना कोणाशीही होऊ शकत नाही. त्यामुळे हे पुस्तक तात्काळ मागे घेण्यात यावं अशी मागणी सर्वच स्तरातून होत होती. यासाठी विरोधकांनी भाजपवर बरीच टीका देखील केली. अखेर आज (मंगळवार) हे पुस्तक मागे घेत असल्याची माहिती केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली. याबाबत त्यांनी ट्वीट देखील केलं आहे. 

छत्रपती शिवाजी महाराज महान शासक होते. लोककल्याणासाठी शिवाजी महाराजांनी अथक परिश्रम केले. अनेक शतकानंतरही त्यांची चिरंतन प्रेरणा आजही कायम आहे. त्यांची तुलना इतर कुणाशीही होवू शकत नाही. नुकत्याच प्रकाशित पुस्तकाचा भाजपशी काहीही संबंध नाही. भाजपच्या कार्यक्रमाचाही तो भाग नव्हता. लेखकाने क्षमा मागितली असून पुस्तकही मागे घेण्यात आले. हा वाद आता संपला आहे.' असं म्हणत प्रकाश जावडेकर यांनी या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे. या पुस्तकावरुन राज्यभरात भाजपवर बरीच टीका केली जात होती. अखेर जनक्षोभामुळे जय भगवान गोयल यांनी हे पुस्तक मागे घेतलं आहे. 

या संपूर्ण प्रकरणावरुन राज्यातील शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तीनही प्रमुख पक्षांनी भाजपवर निशाणा साधला होता. काँग्रेसने तर याबाबत राज्यभर आंदोलनं करण्याची हाक देखील दिली होती. 'आज के शिवाजी - नरेंद्र मोदी' अशा शिर्षकाचं पुस्तक जय भगवान गोयल या भाजप नेत्याने प्रकाशित केलं होतं. यावेळी पुस्तकाच्या मुखपृष्ठावर नरेंद्र मोदींसह छत्रपती शिवाजी महाराज याचा फोटो तुलनात्मक पद्धतीने छापण्यात आला होता. ज्यामुळे यावर बरीच टीका झाली. राज्यातील भाजपच्या अनेक खासदार आणि आमदारांनी देखील हे पुस्तक मागे घ्यावं अशी मागणी केली होती.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी