अहमदनगर: शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस या तीन पक्षांनी एकत्र येऊन महाविकास आघाडीचं सरकार राज्यात यशस्वीरित्या स्थापन केलं आहे. दरम्यान असं असलं तरीही अद्याप मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. त्यामुळे आता या तीनही पक्षातील अनेक आमदारांना मंत्रिपदाची आशा लागली आहे. त्यासाठी आपआपले दबाव गट तयार करण्याचं काम देखील सुरु झालं आहे. याचदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू आणि कर्जत-जामखेडचे नवनिर्वाचित आमदार रोहित पवार यांना मंत्री करण्यात यावं अशा आशयाचे फलक आता त्यांच्या मतदारसंघात झळकू लागले आहेत.
राज्यातील सर्वात मोठा जिल्हा असलेल्या अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत-जामखेड मतदारसंघात भाजपाचे माजी मंत्री राम शिंदे आणि शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांच्यात झालेल्या लक्षवेधी विधानसभा निवडणुकीत रोहित पवार यांनी भाजपाचे माजी मंत्री राम शिंदे यांचा तब्बल ६० हजार मतांनी पराभव केला होता. त्यामुळे ते इथे जायंट किलर ठरले होते.
कर्जत-जामखेड मतदारसंघाला विकासात्मक दृष्टीकोन असणारं तरुण व कार्यक्षम नेतृत्व पवार यांच्या रूपाने या लाभलं असल्याची चर्चा आता येथील नागरिकांमध्ये सुरु आहे. त्यामुळे जर त्यांची मंत्रिमंडळात वर्णी लागली कर कर्जत-जामखेडचा कायापालट झाल्याशिवाय राहणार नाही. अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी कार्यकर्तांकडून पाहायला मिळत आहे.
नव्याने स्थापन जालेल्या महाविकास आघाडी सरकारमध्ये 'रोहित पवार यांना नामदार करा.' अशा आशयाचे फलक जामखेड मतदारसंघातील प्रत्येक चौकाचौकात लावण्यात आले आहेत. खरं तर मंत्रिपदासाठी सध्या अनेक जण इच्छुक आहेत. अशावेळी पहिल्यांदाच निवडून आलेल्या आमदार रोहित पवार यांची मंत्रिमंडळात वर्णी लागणार का? हे पाहणं औत्सुक्याचे ठरणार आहे.
रोहित पवार यांनी अतिशय नियोजनबद्धपणे आपल्या मतदारसंघाची बांधणी केली होती. एकीकडे राज्यात भाजपची हवा असल्याचं चित्र विधानसभा निवडणुकीपूर्वी होतं. त्याच दरम्यान, रोहित पवार यांनी आपल्या मतदारसंघात ग्राऊंड लेव्हल जाऊन प्रचार केला. यामुळे सामान्य मतदारांमध्ये त्यांनी आपली एक चांगली इमेज तयार केली. ज्याचा त्यांना या निवडणुकीत खूप फायदा झाला. त्यामुळे आता पहिल्याच टर्ममध्ये जर त्यांना मंत्रिपद मिळालं तर कर्जत-जामखेडच्या मतदारांना त्याचा नक्कीच आनंद होईल.