Rename Ahmednagar, rename the district as Ahilyanagar : अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्याचे नाव बदलून अहिल्यानगर करा अशी मागणी करणारे पत्र भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिले आहे.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीच्या दिवशी पोलिस बळाचा गैरवापर करण्यात आला. अहिल्यादेवी भक्तांना चोंडी येथे दर्शनाला जाण्यापासून रोखले. हे सर्व काही आजोबा नातवाच्या आदेशाने झाले; असा आरोप पडळकर यांनी केला.
मुंबईत १९९३ मध्ये झालेल्या बॉम्बस्फोटांमध्ये दाऊद इब्राहिमचा हात होता. या दाऊदच्या बहिणीसोबत नवाब मलिक यांची भागीदारी आहे. मलिकांना आजही शरद पवार यांच्याकडून राजकीय संरक्षण मिळत आहे. अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीच्या दिवसाचा वापर आजोबा आणि नातवाकडून नातवाला मोठे करण्यासाठी केला गेला.
मुस्लिम राजवटींनी हिंदू मंदिरे लुटली, तोडली. अहिल्यामातेने हिंदू संस्कृतीत प्राण फुंकले. मंदिरांचा जीर्णोद्धार केला. ही बाब लक्षात घेता, ज्या जिल्ह्यात हिंदु राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवींचा जन्म झाला त्या 'अहमदनगर' जिल्ह्याचे नाव बदलून अहिल्यानगर करावे अशी अहिल्याप्रेमींची लोकभावना असल्याचे भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर म्हणाले. आपण कोणत्या इतिहासाचा वारसा सांगणार आहात? मुघलांच्या की होळकरांच्या? अहिल्यानगर नामांतराचा निर्णय तातडीने घेऊन आपण स्वाभिमानी मुख्यमंत्री आहात हे सिध्द करा असे पडळकर म्हणाले. बहुजन जागा झालाय आणि संघटीत झालाय याची आठवण पडळकरांनी मुख्यमंत्र्यांना करुन दिली.