शिवसेना-राष्ट्रवादीने मिळून दिला भाजपला मोठा धक्का, 'असं' घडलं राजकारण 

नगर
उमेर सय्यद
Updated Sep 29, 2020 | 19:17 IST

Ahmednagar Corporation Politics: अहमदनगर महापालिकेत भाजपची सत्ता असताना देखील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने स्थायी समितीच्या सभापतीपदी आपलाच उमेदवार निवडून आणला आहे. 

shiv sena ncp gave a big blow to bjp big politics happened in ahmednagar municipal corporation
शिवसेना-राष्ट्रवादीने मिळून दिला भाजपला मोठा धक्का  |  फोटो सौजन्य: Times Now

थोडं पण कामाचं

  • सभापती आमचाच, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगतापांचे स्पष्टीकरण 
  • अहमदनगर महापालिका स्थायी समिती सभापतीपदावरुन मोठं राजकारण 
  • शिवसेना-राष्ट्रवादीने भाजपला दिला धोबीपछाड

अहमदनगर: 'अहमदनगर महानगरपालिकेच्या (Ahmednagar Muncipal Corporation) स्थायी समितीचा सभापती (Standing Committee Chairman) हा राष्ट्रवादीचाच (NCP) असून नवनिर्वाचित सभापती मनोज कोतकर हे भाजपाच्या (BJP) नोटिशीला योग्य उत्तर देऊन कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करतील.' अशी प्रतिक्रीया राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे आमदार संग्राम जगताप यांनी दिली आहे. त्यामुळे आता अहमदनगरमध्ये महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभापती पदावरुन नवं राजकारण रंगलं आहे. 

अहमदनगर महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभापतिपदी भाजपाचे उमेदवार असलेले मनोज कोतकर यांनी ऐनवेळी भाजपाला राम-राम ठोकत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश करून स्थायी समितीच्या सभापती पदाचा मान मिळवला आहे. भाजपाचा उमेदवार असताना देखील सभापती पदासाठी थेट राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश केल्याने भाजपने मनोज कोतकर यांना नोटीस पाठवून तीन दिवसात उत्तर मागितलं आहे. त्यावर संग्राम जगताप यांनी आता राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने भूमिका स्पष्ट केली आहे. 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी ऑनलाईन पद्धतीने पार पडलेल्या स्थायी समिती सभापती पदाच्या निवडणुकीनंतर अहमदनगर भारतीय जनता पक्षाने नवनिर्वाचित सभापती हे भाजपाचेच असल्याचा दावा केला होता. तर त्यांच्या दाव्यानंतर स्वतः सभापतीपदी निवड झालेले मनोज कोतकर यांनी देखील चुप्पी साधली होती. 

स्वतः नवनिर्वाचित सभापती यांनी चुप्पी साधल्याने ते भाजपाचे की राष्ट्रवादीचे असा संभ्रम निर्माण झाला होता, दरम्यान भारतीय जनता पार्टीने मनोज कोतकर यांना कायदेशीर नोटीस काढून तीनं दिवसात खुलासा सादर करण्यास सांगितले आहे. भाजपाने सभापती कोतकर यांना नोटीस पाठवताच राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे आमदार संग्राम जगताप यांनी यासंदर्भात खुलासा दिला आहे. 

त्यांनी सांगितले की, 'नवनिर्वाचित सभापती हे गेल्या २ वर्षांपासून भाजपात होते मात्र आता त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचा पंचा गळ्यात घालून राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. त्यामुळे ते आता राष्ट्रवादी कॉंग्रेसचे स्थायी समिती सभापती आहेत. अशी प्रतिक्रिया आमदार जगताप यांनी देत सभापती कोणाचा यांवर अखेर पडदा टाकला आहे. 

नवनिर्वाचित सभापती यांनी भाजपातून राष्ट्रवादीत प्रवेश केल्याने त्यांना भाजपा पक्षाने नोटीस पाठवली आहे. असे असले तरी सभापती मनोज कोतकर हे त्यांच्या नोटिशीला योग्य उत्तर देऊन कायदेशीर प्रक्रिया पार पाडतील. अशी माहिती जगताप यांनी दिल्याने अखेर अहमदनगर महानगरपालिकेच्या सभापती पद हे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाकडेच असल्याचा जाहीर करण्यात आलं असून मनोज कोतकर हे देखील राष्ट्रवादीचेच असल्याचा खुलासा करण्यात आला आहे. पण यामुळे आता भाजपला मोठा धक्का बसला आहे.

अहमदनगर महानगरपालिकेत भारतीय जनता पक्षाची सत्ता आहे. असं असताना देखील स्थायी समितीत भाजपाचे संख्याबळ हे ४ आहे तर शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसची संख्या ५ आहे. अशावेळी भाजपाला स्थायी समितीपासून दूर ठेवण्यासाठी शिवसेना आणी राष्ट्रवादी कॉंग्रेसने आघाडी धर्म पाळत भाजपाचाच स्थायी समितीच्या उमेदवाराला राष्ट्रवादीत प्रवेश देत सभापती पदाची माळ त्यांच्या गळयात टाकल्याने अहमदनगरचे राजकारण चांगलेच ढवळून निघाले आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी