Exclusive [VIDEO] 'एकच वादा, रोहित दादा',  मंत्री राम शिंदेंच्या सभेतच घोषणाबाजी

नगर
Updated Oct 17, 2019 | 22:01 IST | ऊमेर सय्यद

BJP Ram Shinde Rally: भाजपचे मंत्री राम शिंदे यांना आपल्या प्रचारादरम्यान गावकऱ्यांच्या रोषाला सामोरं जावं लागलं. एवढंच नव्हे तर त्यांच्या चौकसभेदरम्यान रोहित पवार यांच्याविषयी घोषणाबाजी देखील करण्यात आली. 

strong slogans of rohit pawars name from in bjp minister ram shinde's rally in karjat jamkhed   
Exclusive [VIDEO] 'एकच वादा, रोहित दादा',  मंत्री राम शिंदेंच्या सभेतच घोषणाबाजी  |  फोटो सौजन्य: Times Now

थोडं पण कामाचं

  • राम शिंदेंना गावकऱ्यांच्या रोषाला जावं लागलं सामोरं
  • कर्जत-जामखेडच्या लढतीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष
  • कर्जत-जामखेडमध्ये रोहित पवार विरुद्ध राम शिंदे असा रंगणार सामना

अहमदनगर: विधानसभा निवडणुकीसाठी अवघे ३ दिवस उरलेले असताना आता उमेदवार थेट मतदारांच्या दारी जाऊन मतांचा जोगवा मागत आहेत. फक्त शहरी भागातच नव्हे तर ग्रामीण भागात देखील उमेदवार प्रत्येक छोट्या गावा-गावात जाऊन मतं मागत आहेत. पण अशाच एका गावात मतं मागण्यासाठी गेलेले भाजपचे उमेदवार आणि कॅबिनेट मंत्री राम शिंदे यांना थेट गावकऱ्यांच्या रोषालाच सामोरं जावं लागलं आहे. यावेळी गावकऱ्यांनी राम शिंदेंसमोर फक्त आपला रोषच व्यक्त केला नाही तर थेट शिंदे यांचे विरोधी उमेदवार रोहित पवार यांच्या नावाच्या घोषणाही दिल्या. यामुळे राम शिंदे यांनी सभेतून काढता पाय घेतला. पण यामुळे ही गोष्ट स्पष्ट झाली आहे की, राम शिंदे यांच्यासाठी ही निवडणूक फार सोपी नसणार आहे. 

'गेल्या १० वर्षापासून तुम्हीच आमदार आहात. मग चारीला पाणी का येत नाही? पाण्याचा प्रश्न कधी सोडविणार?, असे प्रश्न विचारत पालकमंत्री आणि कर्जत-जामखेड मतदारसंघातील भाजपाचे उमेदवार राम शिंदे यांना कर्जत तालुक्यातील कानगुडेवाडी येथील गावकऱ्यांच्या रोषाला सामोरं जावं लागलं. दरम्यान, यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार रोहित पवार यांच्या नावाच्या घोषणाही देण्यात आल्या. अचानक गावकऱ्यांनी प्रश्नांची सरबत्ती सुरु केल्यानंतर राम शिंदें यांनी आयोजित चौकसभेतून काढता पाय घेतला. दरम्यान, हा सगळा प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला असून आता या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.  

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत-जामखेड मतदारसंघातून शरद पवार यांचे नातू आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार रोहित पवार हे विद्यमान भाजपा आमदार आणि कॅबिनेट मंत्री राम शिंदे यांच्याविरोधात निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यामुळे अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत-जामखेड मतदारसंघाकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलं आहे. त्यामुळे दोन्ही पक्षातील उमेदवारांनी संपूर्ण ताकद पणाला लावून आपआपला प्रचार सुरु केला आहे. पण स्वतःचाच प्रचार करत असताना कानगुडेवाडी येथे खुद्द मंत्री साहेबांना गावकऱ्यांच्या रोषाला सामोरं जावं लागल्याने आता या प्रकाराची चर्चा संपूर्ण मतदारसंघात रंगू लागली आहे. 

पाहा संपूर्ण व्हिडिओ:

दरम्यान, कर्जत-जामखेड मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप यांच्यातच थेट लढाई होणार आहे. राम शिंदे हे गेले दोन टर्म आमदार असल्याने त्यांची येथील मतदारसंघावर पकड मजबूत आहे. पण असं असलं तरीही रोहित पवारांच्या रुपाने राष्ट्रवादीने एक तरुण आणि सक्षम असा पर्याय येथील जनतेसमोर दिला आहे. त्यामुळे आता येथील मतदार आपला कौल कुणाच्या बाजूने देणार हे २४ ऑक्टोबरला आपल्याला समजेलच पण अशा प्रकारे एका मंत्र्यालाआपल्याच मतदारसंघात मतदारांच्या रोषाला सामोर जाणं हे निश्चितच धक्कादायक ठरु शकतं.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी