VIDEO: भयंकर... आईसह बसलेल्या तीन वर्षीय मुलाला बिबट्याने नेलं उचलून

नगर
उमेर सय्यद
Updated Oct 30, 2020 | 13:26 IST

अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी येथे एका तीन वर्षीय मुलाला बिबट्याने उचलून नेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. 

leopard attack
VIDEO: भयंकर... आईसह बसलेल्या तीन वर्षीय मुलाला बिबट्याने नेलं उचलून  |  फोटो सौजन्य: Times Now

अहमदनगर: पाथर्डी तालुक्यातील शिरपूर गावाअंतर्गत पानतास वाडी शिवारात तारकनाथ वस्तीवरील सार्थक बुधवंत या तीन वर्षाच्या मुलाला बिबट्याने (leopard attack) आईच्या हातातून पळवून नेल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

बिबट्या तिनं वर्षाच्या सार्थकला पळवून घेऊन जात असताना आई सुनंदाने बिबट्याचे शेपूट ओढून धरले मात्र आईचे हे प्रयत्न तोकडे पडले. रात्री उशिरा अकरा वाजण्याच्या सुमारास सदर घटना घडली. या घटनेमुळे संपूर्ण गावात एकच खळबळ माजली आहे. त्यानंतर आजूबाजूच्या गावातील शेकडो तरुणांनी लाठ्या काठ्यासह सभोवतालचा सुमारे पाच किलोमीटरचा परिसर पिंजून काढला परंतु सार्थक मिळून आला नाही. रात्री उशिरापर्यंत सार्थकचा शोध घेणे सुरू होते. शोध मोहिमेत वनविभाग पोलीस कर्मचारी व शेकडो तरुण सहभागी झाले होते.

अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात गेल्या १५ दिवसातील ही तिसरी घटना असल्याने नागरिक भयभीत झाले आहेत. काही दिवसांपूर्वीच बिबट्याने एका आठ वर्षीय मुलावर हल्ला चढवत त्याचा जीव घेतला होता. दरम्यान, त्याचा देखील सार्थक प्रमाणे शोध घेतला असता दुसऱ्या दिवशी त्याचा मृतदेह एका शेतात आढळून आला होता. 

पाथर्डी तालुक्यात वारंवार होणाऱ्या बिबट्याच्या या हल्ल्यामुळे ग्रामस्थ भयभीत झाले असून या नरभक्षक बिबट्याला त्वरित पकडण्याची मागणी आता पाथर्डी येथील ग्रामस्थांकडून होत आहे.

बिबट्याच्या हल्ल्यातून थोडक्यात बचावल्या राधाकृष्ण विखेंच्या पत्नी आणि नातवंडे!

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच भाजपाचे नेते राधाकृष्ण विखे-पाटील त्यांची पत्नी शालिनी विखे-पाटील आणि त्यांचे नातवंड हे बिबट्याच्या हल्ल्यातून थोडक्यात बचावले. शालिनी विखे-पाटील या आपल्या शेतात त्यांचे सुपुत्र खासदार सुजय विखे-पाटील यांच्या मुलांना म्हणजेच आपल्या नातवंडांना घेऊन शेतात गेल्या होत्या. शेतात गेल्यावर नातवंडं तिथे जवळपासच खेळू लागली. खेळता-खेळता मुलं दमली. त्यामुळे शालिनीताई त्यांना खाऊ देत होत्या. त्याचवेळी जवळ असलेल्या ऊसाच्या शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्यांनी या तिघांच्याही दिशेने झेप घेतली. पण त्याचवेळी या तिघांच्या जवळ असलेला एक कुत्रा अचानक मध्ये आला. हाच कुत्रा बरोबर बिबट्याच्या जबड्यात सापडला. कुत्रा जबड्यात येताच बिबट्याने थेट ऊसाच्या शेतात धूम ठोकली. दरम्यान, बिबट्याने ज्या कुत्र्याचे प्राण घेतले तो त्यांचा पाळीव कुत्रा होता. त्यामुळे कुत्र्याच्या मृत्यूचे देखील विखे-पाटील कुटुंबीयांना दु:ख वाटत आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी