साहेब... एकदा विचारा तर खरं... तुम्ही चाललात कुठे?

नगर
Updated Mar 25, 2020 | 18:29 IST

देशभरात संचारबंदी लागू करण्यात आल्यानंतर बाहेर फिरणाऱ्या व्यक्तींना पोलिसांकडून बेदम चोप दिला जात आहे. मात्र, जे जीवनावश्यक वस्तू आणण्यासाठी बाहेर पडले त्यांनी मात्र याबाबत नाराजी व्यक्त केली आहे.

the time needed to buy essential items should be decided by govt the demand of ahmednagar people 
साहेब... एकदा विचारा तर खरं... तुम्ही चाललात कुठे?  |  फोटो सौजन्य: Times Now

अहमदनगर: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी करण्यात आल्यानंतर अहमदनगर जिल्ह्यात जीवनावश्यक वस्तू खरेदीसाठी घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांना कोणतीही विचारपूस न करता बेदम मारहाण होत असल्याने नागरिकांमध्ये पोलिसांच्या कठोर भूमिकेबद्दल व जिल्हा प्रशासनाच्या अपुऱ्या माहितीबद्दल नाराजी व्यक्त केली जात आहे. 

कोरोनासारख्या आजाराशी सामना करण्यासाठी अहमदनगर जिल्ह्यासह संपूर्ण देशात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. मात्र, जीवनावश्यक वस्तूंच्या दुकानांच्या संदर्भात कोणतीही ठराविक वेळेची माहिती न देता संचारबंदी लागू करण्यात आल्याने संभ्रमात पडलेल्या नागरिकांनी मंगळवारी  जीवनावश्यक वस्तू खरेदीसाठी गर्दी केली होती. दरम्यान यावेळी अनेक भागात अचानकपणे पोलिसांनी केलेल्या मारहाणीमुळे नागरिकांची एकच तारांबळ उडाली. 

दरम्यान जीवनावश्यक वस्तू खरेदीसाठी घराबाहेर पडल्यास नागरिकांना भाजीपालाऐवजी पोलिसांचा मार खावा लागत असल्याने आम्ही जीवनावश्यक वस्तू खरेदी करायचे तरी कधी? असा उलट प्रश्न नागरिकांनी केला आहे. गोरगरिबांना किराणा, दूध, भाजीपाल्यांची साठवण करून ठेवणे कठीण आहे. रोजच्या रोज हातावर पोट भरणाऱ्यांची संख्या अधिकाधिक असल्याने दररोजच्या रोज किराणामाल असो किंवा भाजीपाला आणून स्वतःच्या पोटाची भूक भागवावी लागते. अश्यात पोटाची खळगी भागविण्यासाठी जीवनावश्यक वस्तूंची खरेदी करण्याकरिता घराबाहेर पडणे कठीण झाले असून जिल्हा प्रशासनाच्या वतीने याबाबत वेळेचे निर्बंध किंवा अन्य योग्य त्या उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे.

अहमदनगर जिल्हा प्रशासनाने ज्याप्रमाणे पेट्रोल पंपसाठी वेळेचा निर्बंध घातला आहे. त्या पद्धतीने अन्य वस्तूंच्या खरेदीसाठी देखील योग्य त्या उपाय योजना करून एक कालावधी ठरवून देण्याची गरज निर्माण झाली आहे. पेट्रोल भरण्यासाठी पहाटे ५ ते सकाळी ९ असा चार तासांचा कालावधी देण्यात आला. मात्र किराणा माल, दूध, भाजीपाला यासाठी आम्ही घराबाहेर निघायचे तरी कधी? हाच प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडला आहे.

लागू करण्यात आलेल्या संचारबंदीमध्ये जीवनावश्यक वस्तूंची दुकाने चालू राहणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासन व राज्य सरकारतर्फे देण्यात आली आहे. वास्तविक पाहता जीवनावश्यक वस्तू खरेदीसाठी घरा बाहेर पडणाऱ्या नागरिकांना कोणतीही विचारपूस न करता पोलीस प्रशासनाकडून मारहाण करण्यात येत आहे. पोलिसांनी चोप देण्याची घेतलेली भूमिकाही योग्य आहे पण ते टवाळखोरांना तसेच विनाकारण वाहनांवर फिरणाऱ्यांना लागू करण्यात यावी. असं सांगत जिल्हा प्रशासनाने किराणा माल, तसेच भाजीपाला घेण्यासाठी पेट्रोल पंपसारखे वेळेच निर्बंध लावण्याची मागणी ॲडव्होकेट शिवाजी कराळे यांनी केली आहे.

घराबाहेर पडताच नागरिकांना अन्न ऐवजी पोलिसांचा मार खावा लागत असल्याने आम्ही जीवनावश्यक वस्तू खरेदी करायचे तरी कधी असा प्रश्न नागरिकांसमोर उपस्थित झाला असल्याने अहमदनगर जिल्हा प्रशासनाने भाजीपाला किंवा किराणा माल खरेदीसाठी योग्य ती वेळ ठरवून देण्याची मागणी होत आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...