१३ वर्ष मंत्रीपद देऊनही काही करता आले नाही तर बांगड्या भरा - पवारांचा यांना टोला 

नगर
Updated Oct 16, 2019 | 18:08 IST | टाइम्स नाऊ मराठी

भाजपचे श्रीगोंदाचे आमदार बबनराव पाचपुते यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी जोरदार टीका केली आहे. 

vidhansabha election 2019 sharad pawar shrigonda babanrao pachpute news in marathi
१३ वर्ष मंत्रीपद देऊनही काही करता आले नाही तर बांगड्या भरा - पवारांचा यांना टोला   |  फोटो सौजन्य: YouTube

श्रीगोंदा :  भाजपचे उमेदवार बबनराव पाचपुते म्हणतात, १३ वर्ष मंत्रीपद दिले होते पण काहीच अधिकार नव्हते, फक्त सह्या करण्याचे अधिकार होते. १३ वर्ष मंत्रीपद देऊन जर तुम्हांला काही करता येत नसेल तर एकतर बांगड्या तरी भराव्या असा खोचक टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी श्रीगोंदा येथे लगावला. 

शरद पवार यांनी बबनराव पाचपुतेंच्या काष्टीच्या सभेतील भाषणाचा समाचार घेताना हे वक्तव्य केले आहे. ते म्हणाले, बबनराव म्हणाले, १३ वर्ष मी मंत्री होतो, पण फक्त मला सही करण्याचा अधिकार होता. एखाद्या मंत्र्याने सही केली तर त्याचा आदेश होतो. मंत्र्याने सही केली तर एखादं धरण असो, कारखाना असो, रस्ता असो त्याला मंजुरी मिळते. जो सहीचा अधिकार १३ वर्ष ज्या मंत्र्यांना होता आणि म्हणताहेत की काही करता आलं नाही. आता यांच काय करायचं. त्यांना गृहखात्याचे राज्यमंत्री केले. राज्य सरकारमध्ये वन खाते अत्यंत महत्त्वाचे खाते आहे. लोकांना कळत नाही. मी स्वतः  वनमंत्री होतो. मुख्यमंत्री असताना मी गृहखाते कमी केलं आणि वन खातं घेतलं. महाराष्ट्रात वन संपत्ती वाढविल्याशिवाय पाण्याचा प्रश्न सुटणार नाही. त्यामुळे बबनरावांना मी स्वतः सांगितले की हे खाते घ्याव ही माझी इच्छा आहे, आणि त्यातून काही तरी निकाल द्यावा. पण १३ वर्ष मंत्री असून काही करता येत नसेल तर एकतर बांगड्या तरी भरल्या पाहिजे असा खोचक टोला पवारांनी यावेळी लगावला. 

शरद पवारांचे भाषण पाहा -  ( ४१.०४ मिनिटांवर) 

आपल्याकडे एक म्हणं आहे नाचता येईना अंग वाकडं. बारामतीतून नगर जिल्ह्यात जाताना नदी ओलांडल्यावर काही तरी मोठं बांधकाम दिसतं, मला वाटतं की ते काही हॉटेल आहे. पण ते बबनरावाचं घर असल्याचा पवारांनी उल्लेख केल्यावर उपस्थितांनी एकच जल्लोष केला.  श्रीगोंद्यात एक नाही दोन कारखाने नवीन सुरू झाले. तुम्ही कारखाने काढा, पण कामगारांचे आणि शेतकऱ्यांचा पैसे आधी द्या, असा टोलाही पवारांनी यावेळी लगावला. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी