राष्ट्रवादी काँग्रेसला जबरदस्त झटका, शिवसेनेच्या गळाला आणखी एक मोठा नेता 

नगर
Updated Oct 10, 2019 | 10:07 IST | ऊमेर सय्यद

Ahmednagar Politics: ऐन निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसला एक मोठा फटका बसला आहे. कारण नगरमधील माजी महापौरांनीच शिवसेनेत प्रवेश केला आहे.

vidhansabha elections 2019 abhishek kalamkar former mayor of ncp's ahmednagar joins shiv sena
राष्ट्रवादी काँग्रेसला जबरदस्त झटका, शिवसेनेच्या गळाला आणखी एक मोठा नेता   |  फोटो सौजन्य: Twitter

थोडं पण कामाचं

  • राष्ट्रवादीचा एक बडा नेता शिवसेनेच्या गळाला
  • नगरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा झटका
  • माजी महापौराचा राष्ट्रवादी सोडून शिवसेनेत प्रवेश

अहमदनगर: ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. कारण नगर जिल्ह्यातील एक मोठा नेता शिवसेनेच्या गळाला लागला आहे.  राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे माजी महापौर अभिषेक कळमकर यांनी काल (बुधवार) शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेमध्ये प्रवेश हाती शिवबंधन बांधून घेतलं. दरम्यान, यावेळी अभिषेक यांनी राष्ट्रवादीवर खरमरीत टीका देखील केली आहे. 'आता या वाघाची पिंजऱ्यातून सुटका झाली आहे.' असं म्हणत कळमकर यांनी राष्ट्रवादीवर टीका केली आहे. 

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाला लागलेले ग्रहण सुटता सुटेना असे चित्र दिसत आहे. अहमदनगर शहरातील राष्ट्रवादी पक्षातील माजी महापौर अभिषेक कळमकर यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने अहमदनगर शहरामध्ये राष्ट्रवादी पक्षाला मोठा फटका बसला आहे. 

अहमदनगर शहरातील राष्ट्रवादी कॉंग्रेस मध्ये विद्यमान आमदार संग्राम जगताप आणि अभिषेक कळमकर यांच्यातील वाद सर्वश्रुत आहे. मात्र काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांची अहमदनगर शहरामधील सभा संपताच आमदार जगताप गटातील कार्यकर्त्यांनी माजी महापौर असलेले अभिषेक कळमकर यांना धक्काबुक्की करत मारहाण देखील केली होती. या धक्काबुक्कीनंतर कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी गेलेल्या कळमकर यांची पक्षातील वरिष्ठांनी समजूत काढत तक्रार न देण्यास भाग पाडले होतं. तर पोलीस ठाण्यात तक्रार न करता जगताप यांच्या कार्यकर्त्यांवर पक्षाने कारवाई करण्याची मागणी कळमकर यांनी केली होती. मात्र पक्षाने त्या संबंधित कार्यकर्त्यांवर काहीही कारवाई न केल्याने प्रचंड नाराज झालेल्या कळमकर यांनी काल थेट  उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळे आता विधानसभा निवडणुकीत येथील राष्ट्रवादीचे उमेदवार संग्राम जगताप यांना फटका बसण्याची शक्यता आहे.  

दरम्यान, शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर कळमकर असं म्हणाले की, 'त्या पिंजऱ्यात मी बंद होतो आणि बंद असताना माझ्यावर सतत वार होत होते.  आता मात्र, मी त्या पिंजऱ्यातून बाहेर आलो आहे.' याचवेळी कळमकर यांनी येत्या २१ तारखेला भाजपा-शिवसेनेच्या उमेदवाराला मतदान करण्याचं आवाहन केलं आहे.

ऐन विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या माजी महापौरांने शिवसेनेत प्रवेश केल्याने राष्ट्रवादी पक्षाला अहमदनगर शहरात चांगलाच फटका बसला आहे.  तर विद्यमान आमदार आणि सध्याचे उमेदवार संग्राम जगताप यांच्या देखील अडचणीत वाढ झाली आहे. 

मागील पंचवार्षिक निवडणुकीत भाजपा आणि शिवसेना यांनी स्वतंत्र निवडणुका लढविल्याने याचा फायदा राष्ट्रवादी पार्टीला झाला होता. त्यावेळी शिवसेनेच्या उमेदवाराचा अवघ्या ४ हजार मतांनी जगताप यांनी पराभव केला होता. आता मात्र भाजपा शिवसेना यांच्यात युती झाल्याने आणि ऐन निवडणुकीच्या काही दिवसआगोदर माजी महापौर यांनी सेनेत प्रवेश केल्याने राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाला मोठा फटका बसला असून अहमदनगर शहरात होणारी विधानसभेची लढत ही अतिशय चुरशीची होणार असल्याचं दिसतं आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी