Ahmadnagar News : नगर महापालिकेत आरोग्य निरीक्षकाचा प्रताप

नगर
Updated Jul 11, 2019 | 21:09 IST | टाइम्स नाऊ मराठी वृत्तसेवा

Ahmadnagar News: अहमदनगर महापालिकेच्या एका स्वच्छता निरीक्षकानं आपल्या ऑफिसच्या व्हॉट्सअपग्रुपवर मस्करीत एक पोस्ट केली. त्याचा त्याच्या नोकरीवर इतका गंभीर परिणाम झाला की त्याला निलंबित व्हावं लागलं आहे.

controversial whatsapp post
अहमदनगरच्या आरोग्य निरीक्षकाची वादग्रस्त पोस्ट   |  फोटो सौजन्य: Times Now

थोडं पण कामाचं

  • अहमदनगर महापालिका अधिकाऱ्याची बेजबाबदार पोस्ट
  • व्हॉट्सअपवर केली वृक्षारोपण मोहिमेची चेष्टा
  • आयुक्तांचे तात्काळ निलंबनाचे आदेश

अहमदनगर : एखाद्या ऑफिशिअल ग्रुपवर मस्करीत केलेली पोस्ट किती महागात पडू शकते, याचं एक मोठं उदाहरण आज, नगर जिल्ह्यात पाहायला मिळालं. अहमदनगर महापालिकेच्या एका स्वच्छता निरीक्षकानं आपल्या ऑफिसच्या व्हॉट्सअपग्रुपवर मस्करीत एक पोस्ट केली. त्याचा त्याच्या नोकरीवर इतका गंभीर परिणाम झाला की त्याला निलंबित व्हावं लागलं आहे. महापालिका प्रशासनाने त्याची गंभीर दखल घेतली आहे. किशोर देशमुख असं त्या निलंबित स्वच्छता निरीक्षकाचं नाव आहे. या संदर्भात महापालिकेच्या आयुक्तांनी स्वतः दखल घेऊन देशमुख यांना निलंबित केले आहे. सरकारी योजनांची अशी चेष्टा कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतली जाणार नाही, असं आयुक्तांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केलं आहे. देशमुख यांच्यावर बेशिस्त आणि बेजबाबदारपणाचा ठपका ठेवण्यात आला आहे.

बेजबाबदार पोस्टची गंभीर दखल

राज्य सरकार गेल्या काही वर्षांपासून जुलै महिन्यात वृक्षारोपणाचा कार्यक्रम राबवत आहे. यंदा राज्य सरकारने १३ कोटी झाडे लावण्याचे टार्गेट ठेवले आहे. त्यासाठी राज्यात ठिकठिकाणी जनजागृती मोहीम राबवण्यात येत आहे. तसंच सरकारने स्थानिक स्वराज संस्थांनाही या मोहिमेत समाविष्ट करून घेतले आहे. त्यामुळे सध्या सगळी सरकारी यंत्रणा वृक्षारोपणाच्या कार्यक्रमात व्यग्र दिसत आहे. यंदा पाऊस चांगला लागल्याने या मोहिमेला यश मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. अहमदनगरमध्ये मात्र या वृक्षारोपण मोहिमेच्या जनजागृतीला गालबोट लागले आहे. अहमदनगर महापालिकेचे स्वच्छता निरीक्षक किशोर देशमुख यांनी पालिका आरोग्य विभागाच्या ऑफिशिअल ग्रुपवर ‘एक झाड लावा व एक क्वाटर मिळवा’ अशी पोस्ट केली होती. महापालिका प्रशासनाने या पोस्टची गंभीर दखल घेतली आणि तातडीने देशमुख यांना निलंबित करण्यात आले.

Ahnr Whatsapp Group Pic

पालिकेकडून चौकशी होणार

या संदर्भात अहमदनगर महापालिकेचे आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग यांनी माध्यमांशी संवाद साधला. देशमुख यांना निलंबित करण्याची मागणी पालिका कर्मचारी युनियननेच केली होती. आयुक्त भालसिंग म्हणाले, ‘आज, महापालिकेच्या एका आरोग्य निरीक्षकाने पालिकेच्या ऑफिशिअल ग्रुपवर एक वादग्रस्त पोस्ट केली होती. प्रशासकीय शिस्तीचा भंग होता. मी त्यांना तात्काळ निलंबित करण्याचे आदेश दिले आहेत. आज आम्ही त्यांना निलंबित करत असलो तरी, त्यांची या प्रकरणी चौकशी केली जाईल आणि त्यांना जास्तीत जास्त कठोर शिक्षा होईल, असे प्रयत्न करू. ज्यामुळे सरकारी योजनांची चेष्टा करण्याचे धाडस पुन्हा कोणी करणार नाही. सरकारची किंवा सरकारी योजनांची थट्टा केल्याचा हा प्रकार असून, तो कोणत्याही परिस्थितीत सहन केला जाणार नाही.’

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
Ahmadnagar News : नगर महापालिकेत आरोग्य निरीक्षकाचा प्रताप Description: Ahmadnagar News: अहमदनगर महापालिकेच्या एका स्वच्छता निरीक्षकानं आपल्या ऑफिसच्या व्हॉट्सअपग्रुपवर मस्करीत एक पोस्ट केली. त्याचा त्याच्या नोकरीवर इतका गंभीर परिणाम झाला की त्याला निलंबित व्हावं लागलं आहे.
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola
Recommended Articles