आदित्य ठाकरे रचणार इतिहास, 'ठाकरे' कुटुंबीयांनी जे कधीही केलं नाही ते करणार! 

गावगाडा
Updated Sep 30, 2019 | 21:21 IST | टाइम्स नाऊ मराठी

ठाकरे कुटुंबातील पहिलाच व्यक्ती हा निवडणूक लढवणार आहेत. ती व्यक्ती म्हणजे युवा सेना अध्यक्ष आदित्य ठाकरे. आजच आदित्य ठाकरे यांनी याबाबत घोषणा केली आहे. 

aditya thackeray will contest from worli assembly constituency he is first person from thackeray failmy who contest election 
आदित्य ठाकरे रचणार इतिहास, 'ठाकरे' कुटुंबीयांनी जे कधीही केलं नाही ते करणार!   |  फोटो सौजन्य: Twitter

थोडं पण कामाचं

  • ठाकरे कुटुंबीयांनी कधीही न केलेली गोष्ट आदित्य ठाकरे करणार 
  • विधानसभा निवडणूक आदित्य ठाकरे लढविणार 
  • आदित्य ठाकरे मुंबईतील वरळी मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात 

मुंबई: महाराष्ट्राच्या राजकारणात 'ठाकरे' कुटुंबाचं अनन्य साधारण महत्त्व आहे. दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी नेहमीच आपल्या खास शैलीत राज्याचं नव्हे तर संपूर्ण देशाचं राजकारण ढवळून काढलं आहे. शिवसेना या पक्षाची स्थापना करुन बाळासाहेबांनी आपल्या राजकारणाला सुरुवात केली. पण अखेरपर्यंत बाळासाहेबांनी स्वत: कधीही कोणतीच निवडणूक लढवली नाही. पुढे त्यांनी पक्षाची जबाबदारी आपले पुत्र उद्धव ठाकरे यांच्यावर सोपवली. उद्धव ठाकरे यांनी देखील नेहमी मागच्या सीटवर बसूनच राजकारण करणं पसंत केलं. त्यामुळे ठाकरे कुटुंब कधीही प्रत्यक्षरित्या निवडणूक प्रकियांमध्ये दिसून आलं नाही. पण आजवर जे घडलं नाही ते आता घडलं आहे. कारण शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे चिरंजीव आणि युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे हे स्वत: विधानसभा निवडणूक लढवणार आहेत. त्यासाठी त्यांनी वरळी या मतदारसंघाची निवड केली आहे. 

आदित्य ठाकरे आता विधानसभा निवडणूक लढवणार असल्याची चर्चा गेले काही दिवस जोरदार सुरू होती. त्यावर आज स्वत: आदित्य ठाकरे यांनी शिक्कामोर्तब केलं. वरळी येथे विजय संकल्प मेळावा घेण्यात आला. याच मेळाव्यात आदित्य ठाकरेंनी आपल्या उमेदवारीची घोषणा केली. आजवर ठाकरे कुटुंबानी कधीही जी गोष्ट केली नव्हती ते करण्याचं धाडस आता आदित्य ठाकरे करणार आहेत. 

राज्यात आतापर्यंत अनेक राजकीय पक्ष, घराणे असल्याचं पाहायला मिळालं आहे. अनेक नेत्यांनी आपल्या पुढील पिढीला निवडणुकांच्या रिंगणात उतरवलं आहे. त्यामुळे तसं पाहता ही गोष्ट फारशी मोठी नाही. पण जेव्हा हीच गोष्ट ठाकरे कुटुंबीयांच्या बाबतीत लागू होते त्यावेळी मात्र एक नवा 'ट्रेंड सेटर' ठरणार आहे. आतापर्यंत उद्धव ठाकरे यांनी पक्षाची जबाबदारी अतिशय समर्थपणे सांभाळली. पण कधीही कोणत्याही घटनात्मक पदावर ते गेले नाही. थेट निवडणूक न लढवता देखील बाळासाहेब आणि उद्धव ठाकरे हे नेहमी राजकारणाच्या केंद्रस्थानी राहिले. पण आता आदित्य ठाकरे यांनी  प्रथमच निवडणूक लढवण्याच निर्णय घेत राजकारणाच्या केंद्रस्थानी न राहता थेट त्याचा केंद्रबिंदू बनण्याचा प्रयत्न केला आहे.  

तसं पाहता नेत्यांच्या मुलांनी निवडणूक लढवणं आता काही नवीन राहिलेलं नाही. गेल्या काही दिवसात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू पार्थ पवार आणि विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांचे पुत्र सुजय विखे-पाटील यांनी निवडणूक लढवल्या. अशावेळी आता आणखी एक 'यंगस्टर' निवडणुकीच्या रणांगणात उतरणार आहे. 

आदित्य ठाकरे यांनी अगदी कमी वयातच राजकारणाचे धडे गिरवण्यास सुरुवात केली होती. कॉलेजमध्ये असतानाच युवा सेनेच्या माध्यमातून त्यांनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसाठी पुढाकार घेतला होता. त्यांनतर २०१४ च्या लोकसभा आणि विधानसभा प्रचाराची धुरा देखील त्यांच्यावर सोपवण्यात आली होती. या सगळ्याचा परिपाक म्हणूनच आदित्य ठाकरे यांना थेट विधानसभेत पाठविण्याची तयारी सुरु करण्यात आली आहे.  

'या' मतदरासंघातून आदित्य ठाकरे निवडणूक लढवणार 

आदित्य ठाकरे विधानसभा निवडणूक लढवणार अशी जेव्हा चर्चा सुरु झाली त्याच वेळी एक असाही प्रश्न निर्माण झाला होता की, आदित्य ठाकरे नेमकं कोणत्या मतदारसंघात निवडणूक लढवणार? सुरुवातीला आदित्य ठाकरे यांच्यासाठी अनेक सेफ मतदारसंघाची चाचपणी करण्यात आली. शिवसेनेतील काही नेत्यांच्या मते, आदित्य ठाकरे यांनी ग्रामीण भागातून निवडणूक लढवावी. पण अखेर मुंबईतील वरळी हा मतदारसंघ आदित्य ठाकरेंसाठी निश्चित करण्यात आला. या मतदारसंघात मागील निवडणुकीत शिवसेनेचे सुनील शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सचिन अहिर यांच्याविरुद्ध मोठा विजय मिळवला होता. दरम्यान, काही दिवसांपूर्वीच सचिन अहिर यांनी राष्ट्रवादीला राम-राम करुन शिवसेनेची वाट धरली. त्यामुळे आदित्य ठाकरेंचा मार्ग आणखीनच सोपा झाला. दरम्यान, आता या निवडणुकीत विजय मिळवून आदित्य ठाकरे उपमुख्यमंत्रिपदी विराजमान होणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी