मुंबई : ग्रामीण विभागातील विकासामध्ये साखर कारखानांची मोलाची भूमिका आहे. महाराष्ट्रातील अनेक भागात कारखानादारीमुळे ऊस शेती आणि त्याच्या भोवती फिरणाऱ्या अर्थकारणामुळे ग्रामीण भागातील लोकांचे जनजीवन उंचावले आहे. पण, या कारखान्यामुळे तेथील लोकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माणही झाला आहे. सध्या अशी एका घटना साताऱ्याच्या खटाव तालुक्यातील गोपूज गावातून समोर आली. प्रदुषण नियंत्रण बोर्डाच्या दुर्लक्षामुळे परिसरातील कारखान्याच्या धुरांडीतून येणारी राख थेट परिसरातील लोकांच्या घरात जात असल्यामुळे ग्रामस्थांचा जीव धोक्यात आला आहे. (Air and water of Gopooj polluted due to sugar factory)
सातारा जिल्ह्यातील माण, खटाव आणि कोरेगाव हे दुष्काळी तालुके म्हणून ओखले जातात. मात्र, मागील काही वर्षांपासून सुरू असलेल्या जलसंधारणाच्या कामामुळे परिसरातील गावातील पाण्याची पातळी वाढण्यास मदत झाली. शेत-शिवारात पाणी आल्यामुळे दुष्काळी भागातील लोक ऊस शेतीकडे वळाले आहे. ऊसाचे क्षेत्र वाढल्याने साखर कारखान्यांचीही संख्या वाढली. ग्रामीण विकासाला साखर कारखान्यांचा हातभार लागत असला तरी प्रदूषणाबाबत मात्र कारखान्यांनी सामाजिक बांधिलकी जोपासलेली नसल्याचे उघड झाले आहे.
गोपूज परिसरातील साखर कारखान्याच्या धुराड्यातून निघणाऱ्या विषारी धुरामुळे होणारे प्रदूषण आणि रासायनिक घटक असलेल्या सांडपाण्यामुळे अनेकवेळा नदीतील मासे आणि जलचर मृत होण्याच्या घटना सातत्याने समोर येत असतात. तसेच पाण्याच्या पाण्याचे स्त्रोतही दुषित झाल्याच्या घटना घडल्या आहेत. सध्या कारखान्याचा गळीत हंगाम सुरू आहे. त्यामुळे दिवसरात्र कारखान्याच्या धुरांड्यातून राख हवेत सोडली जात आहे. ही राख परिसरातील लोकांच्या घरात जात आहे. या लोकांना सकाळ-सायंकाळी घरातून राखे ढिग बाहेर टाकावे लागत आहे. ही राख अनेकांच्या नाका आणि घशात जात आहेत. तसेच कारखान्याची राख गावच्या पाणीसाठ्यांमध्ये मिसळत असल्याने पाणी प्रदूषण देखील होत आहे. त्यामुळे लोकांना सर्दी, खोकला आणि श्वसनाचे आजार होत आहे. त्याला प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरीत्या कारखान्याचे प्रदूषण कारणीभूत असल्याचे स्पष्ट आहे.
अधिक वाचा : प्रभादेवीतील राड्यावेळी सदा सरवणकरांच्याच बंदुकीतून निघाली होती गोळी; बॅलेस्टिक अहवालातून स्पष्ट
या कारखान्यांवर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण बोर्ड यांच्याकडे केली. मात्र ठोस उपाययोजना न केल्यामुळे सत्यजीत गुरव यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे तक्रार केली आहे. त्यामुळे आता प्रदुषण नियंत्रण बोर्ड काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.