महाराष्ट्रात पाडणार कृत्रिम पाऊस, मराठवाड्यावर विशेष लक्ष 

गावगाडा
Updated Jul 18, 2019 | 20:20 IST | टाइम्स नाऊ मराठी

महाराष्ट्रात मान्सून दाखल होऊन १ महिना उलटला तरी मराठवाडा, विदर्भ आणि खान्देशातील काही भागात अजून वरूण राजाने कृपा केली नाही आहे. त्यामुळे राज्यातील बहुतांशी शेतकरी हवालदील झाले आहे.

artificial rain
राज्यात पाडणार कृत्रिम पाऊस  |  फोटो सौजन्य: Twitter

थोडं पण कामाचं

  • कृत्रिम पावसासाठी राज्याने मागितली केंद्राकडे परवानगी
  • २२ जुलै रोजी राज्यात कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी पोषक वातावरण
  • राज्य सरकारला आली उशीराने जाग, मान्सून राज्यात दाखल होऊन झाला १ महिना

औरंगाबाद : महाराष्ट्रात मान्सून दाखल होऊन १ महिना उलटला तरी मराठवाडा, विदर्भ आणि खान्देशातील काही भागात अजून वरूण राजाने कृपा केली नाही आहे. त्यामुळे राज्यातील बहुतांशी शेतकरी हवालदील झाले आहे. त्यामुळे आता राज्य सरकारने ज्या भागात पाऊस पडला नाही अशा भागात कृत्रिम पाऊस पाडण्याची तयारी केली आहे. यासंदर्भातील माहिती राज्याचे पाणी पुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांनी जालना येथे दिली. 

प्रसार माध्यमांशी बोलताना लोणीकर म्हणाले, की राज्यातील बहुतांशी भागात पावसाने हुलकावणी दिली आहे. अनेक भागात सरासरी इतकाही पाऊस झाला नाही. मान्सून दाखल होऊन एक महिना झाला आहे. अशा परिस्थिती ज्या भागात पाऊस पडला नाही, अशा ठिकाणी कृत्रिम पद्धतीने पाऊस पाडण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यामुळे या संदर्भातील काम क्लायमेट मीडिफिकेशन या कंपनीला देण्यात आल्याची माहिती बबनराव लोणीकर यांनी दिली आहे. 

ते म्हणाले, राज्यात कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी राज्य सरकारला एकूण १० परवानग्यांची गरज असते. या परवानग्या मिळाल्यावर राज्य सरकार नियोजीत ठिकाणी कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी प्रयत्न करू शकते. याचे काम एका कंपनीला देण्यात आले आहे. केंद्राच्या पर्यावरण मंत्रालयाने कृत्रिम पाऊस पाडण्याची परवानगी दिली तर महाराष्ट्र हे कार्यक्षेत्र निश्चित करण्यात आले आहेत. त्यामुळे येत्या ३० तारखेपूर्वी ही परवानगी मिळाली तर राज्यात कृत्रिम पाऊस पाडण्यात येऊ शकतो, असे बबनराव लोणीकर यांनी सांगितले. 

या प्रकल्पासाठी एकूण ३० कोटी रुपये खर्च होणार असून या खर्चाला राज्य सरकारने मंजुरी दिल्याची माहिती रोजगार हमी आणि फलोत्पादन मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी बीड मध्ये दिली. या संदर्भातील प्रक्रिया पूर्ण झाली असून येत्या २२ जुलै रोजी कृत्रिम पाऊस पाडण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. ढगांमध्ये पाण्याची घनता २२ जुलै रोजी जास्त असल्याचे हवामान खात्याने सांगितले आहे. 

मंत्रीमंडळाने यावर गांभीर्याने चर्चा केली असून यासाठी औरंगाबाद, सोलापूर आणि नगर जिल्ह्यांची निवड करण्यात आली आहे. 

मराठवाड्यात पावसाने पाठ फिरवल्याने मराठावाड्यात हा प्रयोग प्रथम करणार असल्याचे माहिती सूत्रांनी दिली आहे. यासाठी औरंगाबाद येथून या प्रक्रियेला सुरूवात करण्यात येणार आहे.  परंतु असे करत असताना कृत्रिम पावसासाठी परिस्थिती अनुकूल असल्यास पाऊस पाडता येतो, ढगांची स्थिती, ढगांमध्ये पाण्याचे प्रमाण यावर सर्व गोष्टी अवलंबून असतात. तसेच यासाठी हवामान खात्याची भूमिका खूप महत्त्वाची असते, त्यामुळे आता केंद्राची परवानगी, आणि वरूण राजाचा लहरीपणा यावर कृत्रिम पावसाचा प्रयोग किती यशस्वी ठरतो आणि पाऊस न पडलेल्या महाराष्ट्रातील भागात पाऊस पडतो का हे निश्चित होणार आहे. 

यापूर्वीही अनेक वेळा राज्यात कृत्रिम पावसाचा प्रयोग झाला. पण तो म्हणावा तितका यशस्वी झाला नसल्याचा पूर्वानूभव आहे. हा पूर्वानुभव जरी असला तरी यंदा हा प्रयोग यशस्वी होवो हीच बळीराजाची इच्छा असणार आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
महाराष्ट्रात पाडणार कृत्रिम पाऊस, मराठवाड्यावर विशेष लक्ष  Description: महाराष्ट्रात मान्सून दाखल होऊन १ महिना उलटला तरी मराठवाडा, विदर्भ आणि खान्देशातील काही भागात अजून वरूण राजाने कृपा केली नाही आहे. त्यामुळे राज्यातील बहुतांशी शेतकरी हवालदील झाले आहे.
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...