सोलापूर: रविवारी आषाढी एकादशीचा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. पंढरपुरात राज्यभरात लाखो भाविकांनी हजेरी लावली होती. लाखो भाविकांमुळे विठुरायाची पंढरी काल फुलून गेली होती. मात्र यावेळी एक वाईट घटनाही घडली आहे. चंद्रभागेत स्नान करताना नागपूर जिल्ह्यातल्या दोन तरूणांवर काळानं घाला घातला आहे. या दोन तरूणांचा बुडून मृत्यू झाल्याची बातमी समोर येतेय. नागपूरमधील तीन तरुण आषाढी एकादशीच्या निमित्तानं पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनासाठी आले होते. यावेळी ही दुर्देवी घटना घडली आहे.
या तिघांपैकी दोन तरूण चंद्रभागा नदीत स्नान करण्यासाठी गेले. मात्र त्यावेळी त्यांच्यावर काळानं घाला घातला. हे दोन तरूण पाण्यात बुडाले. 28 वर्षीय सचिन शिवाजी कुंभारे आणि 27 वर्षीय विजय सिद्धार्थ सरदार असं दोघांची नावं आहेत. दोघांच्या मृतदेहाचं शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आलं.
अधिक वाचा- हिंगोलीत पावसाचा हाहाकार ,अनेकांचे संसार उध्वस्त, नागरिकांना सतर्क राहण्याच्या प्रशासनाच्या सूचना
नेमकी घटना कशी घडली?
आषाढी एकादशीनिमित्त विठ्ठलाच्या दर्शनासाठी नागपूर जिल्ह्यातल्या नरखेड तालुक्यातील जलालखेडा आणि नारसिंगी येथील तीन तरूण पंढरपूरला आले होते. रविवारी सकाळी ते रेल्वेनं पंढरपूरला पोहोचले. विठुरायाचं दर्शन घेण्याआधी चंद्रभागा नदीत स्नान करावं असं तिघांनी ठरवलं. त्यातील सचिन कुंभारे आणि विजय सरदार हे दोघे स्नान करण्यासाठी चंद्रभागा नदी पात्रात उतरले. मात्र पाण्याचा प्रवाह जास्त असल्यानं सचिन बुडू लागला. सचिनला पाण्याचा अंदाज आला नाही. सचिन बुडत असल्याचं पाहून त्याला वाचवण्यासाठी विजय पुढे गेला. मात्र सचिनला वाचवण्याकरिता गेलेला विजय सुद्धा पाण्यात बुडाला.
सचिन आणि विजय हे दोघंही बुडत असल्याचं पाहून नदीपात्राबाहेर उभ्या असलेल्या तिसऱ्या मित्रानं पाहिलं. त्यानं आरडाओरड केली त्यामुळे आजूबाजूला असलेल्या नागरिकांनी दोघांना ही वाचवण्याचा प्रयत्न केला. काही नागरिकांनी नदीत उडी घेऊन दोघांना पाण्यातून बाहेर काढलं. त्यानंतर दोघांनाही रूग्णालयात दाखल केलं. मात्र रूग्णालयात नेल्यावर डॉक्टरांनी दोघांनाही मृत घोषित केलं. आषाढी एकादशीच्या दिवशी अशी घटना घडल्यानं सर्वत्र हळहळ व्यक्त केली जातेय.