पुणे : कोरोनाच्या ओमिक्राॅन या नवी व्हेरिएंटमुळे राज्यातील शाळा आणि महाविद्यालय बंद करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे दहावी आणि बारावीच्या परिक्षांबाबत संभ्रम निर्माण झाल्यानंतर दहावी व बारावीच्या परीक्षा ऑफलाइन आणि वेळापत्रकानुसारच होतील, असे राज्य परिक्षा मंडळाकडून स्पष्ट केले. त्यानंतर मंडळाने गुरुवारी परिपत्रक जारी केले असून त्यात बारावी परीक्षेच्या वेळापत्रकात अंशत: बदल करण्यात आल्याचे नमूद केले आहे. (Big news for 12th grade students and parents! Maharashtra State Board of Education changes HSC exam schedule)
करोनाच्या तिसऱ्या लाटेमुळे राज्यात शाळा आणि महाविद्यालय बंद करण्यात आले आहे. त्यामुळे या १५ फेब्रुवारीपर्यंत ऑनलाइन शिक्षण होणार आहे. या पार्श्वभूमीवर दहावी व बारावीच्या परीक्षा ऑनलाइन होणार का, अशी शंका उपस्थित होत असतानाच या परीक्षा ऑफलाइनच होणार असल्याचे परिक्षा मंडळाने स्पष्ट केले.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या बारावी परीक्षेच्या वेळापत्रकात अंशत: बदल करण्यात आला आहे. याबाबतचे परिपत्रक मंडळाने जारी केले आहे. बारावीची परीक्षा ४ मार्च २०२२ ते ३० मार्च २०२२ या कालावधीत ऑफलाइन पद्धतीने होणार आहे.
बारावीच्या परीक्षेतील अर्धमागधी (१६) या विषयाच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. अर्धमागधी (१६) विषयाची परीक्षा ७ मार्च २०२२ रोजी दुपारी ३ ते सायंकाळी ६.३० या वेळेत होणार होती. हा पेपर आता सुधारित वेळेनुसार, ८ मार्च २०२२ रोजी दुपारी ३ ते सायंकाळी ६.३० या वेळेत होणार आहे.
बारावीच्या लेखी व अन्य परीक्षेच्या उर्वरित वेळापत्रकामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. वेळापत्रकातील या अंशत: बदलाची सर्व संबंधित उच्च माध्यमिक शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांनी तसेच विद्यार्थी, पालकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन राज्य शिक्षण मंडळाने केले आहे.