'नोकरी मागायची तर नीट मागा, १ तारखेपासून आमच्याकडे ड्रायव्हरची जागा रिकामी आहे', निलेश राणेंची केसरकरांवर एकेरी टीका

गावगाडा
रोहित गोळे
Updated Aug 07, 2022 | 15:42 IST

Rane vs Kesarkar: राणे विरुद्ध केसरकर हा वाद काही नवा नाही. मात्र भाजप-शिंदे गटाच्या युतीनंतर हा वाद शमेल असं वाटत होतं. मात्र, तसं अजिबात न होता हा वाद अधिकच वाढत असल्याचं पाहायला मिळत आहे.

bjp leader nilesh rane venomous criticism on spokesperson of shinde group deepak kesarkar
'नोकरी मागायची तर नीट मागा, १ तारखेपासून आमच्याकडे ड्रायव्हरची जागा रिकामी आहे', निलेश राणेंची केसरकरांवर एकेरी टीका 
थोडं पण कामाचं
  • नितेश राणेंची दीपक केसरकरांवर एकेरी टीका
  • दीपक केसरकर आणि निलेश राणे यांच्यात नवा वाद
  • आदित्य ठाकरेंच्या बदनामीला राणे कुटुंबीय जबाबदार, दीपक केसरकरांचा आरोप

Nilesh Rane: मुंबई: तळकोकणातील राणे आणि केसरकर यांच्यातील वैर हे सर्वश्रुत आहे. दीपक केसरकर (Deepak Kesarkar) शिवसेनेत (Shiv Sena) गेल्यानंतर हे वैर अधिक वाढलं होतं. मात्र, महिन्याभरापूर्वीच भाजप (BJP) आणि शिंदे गटाची (Shinde Group) युती झाल्याने आतातरी हे वैर संपुष्टात येईल अशी सर्वांची अपेक्षा होती. मात्र, या दोन्ही नेत्यांमधील वाद अधिकच वाढत असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यातच नारायण राणे (Narayan Rane) यांचे ज्येष्ठ पुत्र आणि माजी खासदार निलेश राणे (Nilesh Rane) यांनी आता केसरकरांवर जहरी टीका करणारं ट्विट केलं आहे. ज्यामुळे वाद अधिक चिघळण्याची शक्यता आहे. (bjp leader nilesh rane venomous criticism on spokesperson of shinde group deepak kesarkar)

नेमका वाद काय?

शिंदे गटाची प्रवक्ते दीपक केसरकर यांनी काल पत्रकारांशी बोलताना असा आरोप केला होता की, आदित्य ठाकरे यांच्या बदनामीमागे राणे कुटुंबीय आहेत. त्यानंतर एक नवा वाद निर्माण झाला. याच मुद्दावर बोलताना अखेर केसरकरांनी माघार घेतली.

अधिक वाचा: "यापुढे पत्रकार परिषदेत राणेंचं नाव घेणार नाही" : केसरकर

यावेळी केसरकर असं म्हणाले की, 'माझा आणि राणे साहेबांचा वाद झाला होता हे सर्वांना माहिती आहे. प्रत्येकाचा रेफरन्स त्याच्याशी जोडणे हे चुकीचं आहे. जेव्हा-जेव्हा राणे साहेब मला भेटले आहेत त्यावेळी त्यांच्यासोबत मी अत्यंत आदरपणे वागलेलो आहे. अनेकदा मी सांगितलं आहे, राणे साहेबांसोबत माझा व्यक्तिगत वाद नाहीये.' 

'जिल्ह्याच्या विकासात त्यांच्यासोबत काम करण्याची वेळ आली तर मी नेहमीच तयार आहे हे मी वारंवार सांगितलं आहे. ज्याप्रमाणे मी म्हटलं की, पवार साहेबांच्या विरोधात मी कुठलंही वक्तव्य करणं चुकीचं असल्याने माझ्या एकंदरीत वक्तव्यात मी कधीही पवारसाहेबांचं नाव घेणं टाळलं आहे. मी एनसीपी म्हणतो पवार साहेबांचं नाव नाही घेत. तसंच माझ्या लक्षात आलं आहे, मी किती चांगलो बोललो किंवा वाईट बोललो तरी राणेंच्या संदर्भात मी बोललो तर त्याचा रेफरन्स हा माझा त्यांच्यासोबत झालेल्या वादासोबत जोडला जातो. त्यामुळे यापुढच्या काळात ज्या-ज्यावेळी माझ्या पत्रकार परिषद होतील त्यावेळी राणेंचं नाव घेतलं जाणार नाही.' असं केसरकर यांनी काल पत्रकार परिषदेत स्पष्ट केलं.

अधिक वाचा: एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंना डिवचलं

निलेश राणेंचं जहरी ट्वीट

दरम्यान, केसरकरांच्या या स्पष्टीकरणानंतर निलेश राणे यांनी पुन्हा एकदा त्यांना डिवचणार ट्विट केलं आहे. आपल्या ट्विटमधून टीका करताना निलेश राणे म्हणाले की, 'दिपक केसरकर म्हणतो मी राणेंबरोबर काम करायला तयार आहे, नोकरी मागायची आहे तर नीट मागा, १ तारखेपासून आमच्याकडे ड्रायव्हरची जागा रिकामी आहे.' अशा एकेरी शब्दात निलेश राणे यांनी केसरकरांवर टीका केली आहे.

अधिक वाचा: ठाकरेंनी केली हातमिळवणीची तयारी पण १२ आमदारांमुळे...

यामुळे आता दीपर केसरकर हे निलेश राणेंच्या या टीकेला नेमकं कसं उत्तर देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तसंच भाजप आणि शिंदे गटातील हा वाद अधिक वाढत गेला तर त्याचा या युतीवर नेमका काय परिणाम होणार यावर पुढील बऱ्याच गोष्टी अवलंबून असणार आहे. त्यामुळे या दोन्ही नेत्यांमधील वाद अधिक वाढू नये यासाठी मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांना बरेच प्रयत्न करावे लागण्याची शक्यता आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी