नंदुरबार : नवापुर तालुक्यातील खांडबारा शहरामध्ये न्यू कृषी सेवा केंद्रामध्ये गेल्या अनेक वर्षापासून रासायनिक खतांची विक्री सुरूय. कंपनी मधून आलेल्या युरिया खताच्या सिल पॅक पोते फोडले जाते. त्यामध्ये युरियामध्ये भेसळ करून पुन्हा कोणत्याही कंपनीचा लेबल नसलेल्या पांढऱ्या पोत्यामध्ये भेसळ युरिया भरला जात असल्याचे व्हिडिओ समोर आले आहे. (Bogus fertilizer shop busted in Nandurbar)
नंदुरबार जिल्हा आदिवासी बहुल असल्याने अशिक्षित शेतकऱ्यांचा फायदा घेऊन जिल्ह्यातील अनेक ठिकाणी भेसळयुक्त बी बियाणे तसेच खते विक्रीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. मात्र, कृषी विभाग याकडे पूर्णतः दुर्लक्ष करत आहे. खांडबारामध्ये भेसळयुक्त युरिया कट्टे सील पॅक करून जिल्ह्यात व इतर राज्यांमध्ये विक्रीसाठी ट्रक भरून पाठवला जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. रात्री तसेच दिवसाढवळ्या सदर प्रकार सुरू असतानाही कृषी अधिकारी व संपूर्ण प्रशासन विभाग याकडे डोळे झाक करत आहे.
शेतीचे उत्पादन वाढवण्यासाठी हजारो रुपये खर्च करुन शेतकरी बी बियाणे तसेच खते विकत घेतो. परंतु अशा भेसळयुक्त खतांमुळे उत्पादनात घट होते. पण नंदुरबार जिल्ह्यातील अनेक कृषी सेवा केंद्रांमध्ये परवाना नसतानाही दुकाने चालू आहे. तसेच दुकानात बसलेल्या व्यक्तीला कोणताही अनुभव नसताना बियाणे तसेच खताचे विक्री सुरू आहे. न्यू श्री कृषी सेवा केंद्र व खत विक्री केंद्र दुकानातून अनेक शेतकरी व सामाजिक कार्यकर्त्यांच्या तक्रारीनंतर. कृषी विभागाच्या वतीने दुकान सील करण्यात आले आहे. मात्र अद्याप काय कारवाई झाली आहे याबाबत कृषी विभागाने कमालीची गुप्तता बाळगली आहे. त्यामुळे कृषी विभागाच्या हेतू बद्दल संशय व्यक्त केला जातोय.