Konkan Railway ला ब्रेक, मुसळधार पावसामुळे अनेक गाड्या विविध स्टेशनवर अडकल्या

गावगाडा
Updated Jul 14, 2022 | 18:02 IST | टाइम्स नाऊ मराठी

Heavy Rains in Konkan: मुसळधार पावसामुळे कोकण रेल्वे मार्गावर चिपळूण ते अंजनीच्या दरम्यान रुळावर माती आणि गाळ आला आहे. परिणामी या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. मातीच्या ढिगाऱ्याने मार्ग बंद झाल्याने चिपळूण ते खेड दरम्यान वाहतूक थांबविण्यात आली होती.

Break to Konkan Railway, torrential rains caused many trains to get stuck at various stations
Konkan Railway ला ब्रेक, मुसळधार पावसामुळे अनेक गाड्या विविध स्टेशनवर अडकल्या  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • कोकणात मुसळधार पाऊस
  • सर्वत्र पाणीच पाणी झाल्याने जनजीवन विस्कळीत
  • कोकण रेल्वे मार्गावर दरड कोसळल्याने वाहतूक ठप्प

रत्नागिरी : कोकणात गेल्या काही दिवसांपासून पावसाची धुवाँधार बॅटिंग सुरू आहे. संततधार पावसाने पाणी आल्याने रत्नागिरी, सिंधुदुर्गमधील मुख्य रस्त्यावरील वाहतूक काहीकाळ मंदावली. या पाण्यातून मार्ग काढताना वाहनचालकांना चांगलीच कसरत करावी लागली. गुरुवारी देखील दिवसभर पावसाची संततधार सुरूच होती. त्याचा फटका कोकण रेल्वेलाही बसला असून चिपळूण ते अंजनी रेल्वे मार्गावर दरड कोसळली होती त्यामुळे रेल्वे वाहतूक ठप्प झाली होती. (Break to Konkan Railway, torrential rains caused many trains to get stuck at various stations)

अधिक वाचा : पुण्यात जुन्या वाड्याची कोसळली भिंत, तीन घरातल्या 11 जणांची अग्निशमन दलाकडून सुखरूप सुटका

जुलै महिन्याच्या प्रारंभीपासून कोकणात मुसळधार पाऊस पडत आहे. रत्नागिरी जिल्ह्यात पडणाऱ्या पावसामुळे सगळीकडे पाणीच पाणी झाली आहे. त्यामुळे वाशिष्ठी, जगबुडी नद्यांसह उपनद्या, वहाळ दुथडी भरुन वाहत आहेत. पश्चिम महाराष्ट्राला कोकणला जोडणार्‍या राजापूर तालुक्यातील अणुस्कूरा घाटात बुधवारी रात्री आणि गुरुवारी पहाटेच्या दरम्याने दरड कोसळली आहे.त्यामुळे या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे.

अधिक वाचा : Dombivli Crime: वाहतूक पोलिसाला कार चालकाने फरफटत नेलं, डोंबिवलीतील घटनेचा LIVE VIDEO

गुरुवारी पावसाने अक्षरशः झोडपून काढले असून, परिसर जलमय झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. शेतीमध्ये सर्वत्र पाणीच पाणी पाहावयास मिळाले. त्याचा फटका कोकण रेल्वेला बसला असून अंजणी-चिपळूण दरम्यान रेल्वेमार्गावर दरड कोसळल्याने मार्ग बंद झाला आहे. मुंबई-मडगाव मांडवी एक्सप्रेस खेड स्थानकात अडकली आहे. इतरही गाड्या वेगवेगळ्या ठिकाणी उभ्या आहेत. कोकण रेल्वे प्रशासनाला मातीचा ढीगारा साचलेल्या ठिकाणी जाऊन तो दूर करेपर्यंत वाहतूक ठप्प राहिली. मातीचा ढिगारा उपसून वाहतूक पूर्ववत करण्याचे काम युद्धपातळीवर सुरु असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाकडून दिली जात आहे. अद्यापही वाहतूक धिम्या गतीनेच सुरु आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी