सरकार पडताच भाजपला एक मोठा झटका, पाहा काय घडलं

गावगाडा
रोहित गोळे
Updated Nov 27, 2019 | 15:41 IST

MLA: राज्यात भाजपने सत्ता स्थापन केली पण अवघ्या चार दिवसातच त्यांचं सरकार कोसळलं. सरकार कोसळताच भाजपला आता आणखी एक मोठा धक्का बसला आहे.  

bva party three mlas support to mahavikas aaghadi a big blow to the bjp
सरकार पडताच भाजपला एक मोठा झटका, पाहा काय घडलं  |  फोटो सौजन्य: Times Now

थोडं पण कामाचं

  • सरकार जाताच भाजपला बसला मोठा धक्का
  • महाविकास आघाडीची ताकद आणखी वाढली
  • बविआच्या तीन आमदारांचा महाविकास आघाडीला पाठिंबा

मुंबई: राज्यात महाविकास आघाडीचं सरकार येणार असल्याचं स्पष्ट झाल्यानंतर आता छोटे पक्ष आणि काही अपक्ष आमदार या महाविकास आघाडीत सामील होत असल्याचं दिसतं आहे. कारण थोड्या वेळापूर्वीच बहुजन विकास आघाडीच्या तीन आमदारांनी आपला पाठिंबा महाविकास आघाडीला देऊ केला आहे. पण त्यामुळे भाजपला मोठा धक्का बसला आहे. कारण सुरुवातीला राज्यात सुरु असलेल्या सत्तासंघर्षात बाविआचे तीनही आमदारांनी भाजपला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, भाजपचं सरकार कोसळताच त्यांनी आपला पाठिंबा हा महाविकास आघाडीला देऊ केला आहे. पण यामुळे महाविकास आघाडीचा बहुमतचा आकडा आणखी वाढला आहे. 

बहुजन विकास आघाडीचे आमदार हितेंद्र ठाकूर, क्षीतिज ठाकूर आणि राजेश पाटील यांनी काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांची भेट घेऊन महाविकास आघाडीला पाठिंबा दिला आहे. याबाबतची माहिती स्वत: अशोक चव्हाण यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरुन दिली आहे. बविआने दिलेल्या या पाठिंब्यामुळे भाजपची ताकद मात्र कमी झाली आहे. 

भाजप १०५ आणि अपक्ष १३ असं एकूण ११८ जणांचं संख्याबळ हे भाजपजवळ होतं. पण आता बाविआच्या तीन आमदारांनी त्यांना पाठिंबा न देता महाविकास आघाडीला पाठिंबा दिल्याने भाजपचं संख्याबळ घटलं आहे.  

भाजपच्या चिन्हावर लढलेल्या आणि विजयी झालेल्या एकूण आमदारांची संख्या १०५ आहे. तर त्यांना अद्यापही १० अपक्ष आमदारांचा पाठिंबा आहे.  यात जनसुराज्य पक्षाचे विनय कोरे, रवी राणा, करमाळाचे आमदार संजय शिंदे, उरणचे आमदार महेश बालदी,चंद्रपूरचे आमदार किशोर जोरगेवार, गोंदीयाचे आमदार विनोद अग्रवाल, बार्शीचे अपक्ष आमदार राजेंद्र राऊत, इचलकरंजीचे आमदार प्रकाश अण्णा कवाडे,  शेकापचे आमदार श्यामसुंदर शिंदे, मीरा भाईंदरच्या आमदार गीता जैन यांचा समावेश आहे.

दरम्यान, आता बाविआने भाजपची साथ सोडल्याने इतरही काही अपक्ष आमदार तसाच काहीसा निर्णय घेऊ शकतात. त्यामुळे आता या अपक्ष आमदारांना आपल्याकडे टिकवून ठेवण्याचं मोठं आव्हान भाजपसमोर असणार आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी