Ajit Pawar : मुंबई : शरद पवार हे जातियवादी आहेत, राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर महाराष्ट्रात जातियवाद वाढला अशी टीका राज ठाकरे यांनी काल केली होती. त्यावर अजित पवार यांनी प्रत्युत्तर दिले असून राज ठाकरे स्वतः जातीयवादी असून सरड्यासारखे रंग बदलतात अशी टीका केली आहे.
अजित पवार म्हणाले की, राज ठाकरे यांना टीका करण्याशिवाय आणि नकला करण्याशिवाय दुसरे काही जमत नाही. कोणे एकेकाळी राज ठाकरे यांचे १३ आमदार निवडून आले होते. हे आमदार राज ठाकरे यांना का सोडून गेले याचे त्यांनी आत्मपरीक्षण करावे. फक्त भाषणं करून जनतेचे प्रश्न सुटत नाही. राज ठाकरे हे आपल्या भूमिकांवर ठाम नसतात. गेल्या लोकसभा निवडणूकीत त्यांनी भाजपविरोधी भूमिका घेतली होती, विधानसभेत त्यांनी काय भूमिका घेतली होती हे सर्वपरिचित आहेत आणि कालच्या भाषणात ते काय बोलले हे ही सगळ्यांना माहित आहे. राज ठाकरे असे सरड्यासारखे रंग बदलतात असेही पवार म्हणाले.
कोल्हापुरात आज शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेतली. तेव्हा पवार म्हणाले की, राज ठाकरे काहीही बोलू शकतात. उत्तर प्रदेशचं राज ठाकरे यांना कौतुक वाटतं त्यांना तिथे काय दिसल काय माहित. उत्तर प्रदेशमध्ये भाजपला यश मिळाले त्याची कारणे वेगळी आहेत. परंतु लखीमपूरमध्ये शेतकर्यांची हत्या झाली. उत्तर प्रदेशच्या सीमेवर शेतकरी आंदोलन करत होते. त्यांची समजूत काढण्यासाठी कोणीही पुढे आले नाही. योगींच्या राजवटीत अनेक गोष्टी घडल्या. उत्तर प्रदेशमध्ये चांगल्या गोष्टीत होत आहेत असे राज ठाकरे यांचे म्हणने आहे तर त्यावर माझे काही म्हणने नाही. परंतु महाराष्ट्रात उद्धव ठाकरे यांचे सरकार असे काही होऊ देणार नाही.
राज ठाकरे यांनी मोदींच्या बाबतीत काय काय भूमिका मांडल्या हे महाराष्ट्राने यापूर्वी पाहिले आहे. आता त्यांच्यात काही बदल झालेले दिसत आहेत. राज ठाकरे यांची आजची भूमिका ही भाजप अनुकूल आहे. त्यांच्या भूमिकेत सातत्य नसतं. राज ठाकरे ३ ते ४ माहिने भूमिगत होतात आणि लेक्चर देतात. नंतर पुढचे ३ ते ४ महिने काय करतात हे माहित नाही. ते काही बोलू शकतात त्यांच्या बोलण्यावर कोणी बंदी नाही घालू शकत.