रेमडेसिवीर इंजेक्शनचा ड्रामा; ब्रुक फर्माच्या संचालकासाठी फडणवीसांनी निम्या रात्री गाठलं पोलीस स्टेशन

गावगाडा
भरत जाधव
Updated Apr 18, 2021 | 10:15 IST

रेमडेसिवीर इंजेक्शनच्या तुटवड्यावरुन शनिवार दुपारपासून केंद्र विरुद्ध राज्य अशी लढाई सुरू आहे. या लढाईचा एक भाग पार्ले येथील पोलीस स्टेशनमध्ये काल रात्री रंगला.

devendra fadnvis at police station at midnight for bruck pharam director
रेमडेसिवीर इंजेक्शनचा ड्रामा  |  फोटो सौजन्य: Indiatimes

थोडं पण कामाचं

  • प्रविण दरेकर आणि प्रसाद लाड यांनी केली होती रेमडेसिवीरची मागणी
  • कंपनीच्या संचालकाला फोनवरुन धमकी
  • Bruck Pharma कंपनीच्या संचालकांकडे जवळपास ६० हजार रेमडेसिवीरचा साठा

मुंबई : रेमडेसिवीर इंजेक्शनच्या तुटवड्यावरुन शनिवार दुपारपासून केंद्र विरुद्ध राज्य अशी लढाई सुरू आहे. या लढाईचा एक भाग पार्ले येथील पोलीस स्टेशनमध्ये काल रात्री रंगला. ब्रुक फर्मा(Bruck Pharma) कंपनीकडे रेमडेसिवीरचा साठा असल्याची माहिती मिळाल्यानंतर विले पार्ले पोलिसांनी ब्रुक फार्माचे संचालक राजेश डोकानिया यांना दहा पोलिसांनी ताब्यात घेतले.  या कारवाईची माहिती मिळताच विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आणि भाजपा आमदार प्रसाद लाड पोलीस ठाण्यात पोहोचले होते. यावेळी त्यांनी पोलिसांनी कारवाईबद्दल जाब विचारत खरडपट्टी काढली. शाब्दिक वादानंतर भाजपचे नेते आणि पोलीस अधिकारी बीकेसीतील पोलीस उपायुक्त कार्यालयात पोहोचले. पोलीस कार्यालयात देवेंद्र फडणवीस तासभर ठाण मांडून बसले होते.

पोलीस आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात चर्चा झाल्यानंतर अखेर पोलिसांनी फार्मा कंपनीच्या मालकांना सोडून दिल्याची माहिती देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांना दिली आहे. 
'चार दिवसापुर्वी भाजप नेते प्रविण दरेकर आणि प्रसाद लाड हे दमण येथील ब्रुक फार्मामध्ये गेले होते. ब्रुक फार्माचं रेमडिसिवरचा उत्पादन महाराष्ट्राला द्यावा असं निवदेन दोन्ही मंत्र्यांनी केलं होतं. तेव्हा कंपनीकडून सांगण्यात आलं की, आमच्याकडे एक्सपोर्टची परवानगी नाही, त्यानंतर आम्ही परवानगीसाठी असलेली तरतूद पुर्ण केली. ती तरतूद पूर्ण झाल्यानंतर कंपनी आपल्याकडील साठा महाराष्ट्राला देणार होते. पण दुपारी महाराष्ट्राचे ओएसडीनं कंपनी अधिकाऱ्यांना फोन करून भाजपला इंजेक्शनचा साठा कसा देता'? असा प्रश्न करून धमकावल्याची माहितीही देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

“महाराष्ट्राला रेमडेसिवीर मिळाव्यात या प्रामाणिक हेतूने आम्ही सारे प्रयत्न करीत असताना अचानक ब्रुक फार्माच्या अधिकाऱ्याला ताब्यात घेण्याचा महाराष्ट्र सरकारने केलेला प्रकार अतिशय दुर्दैवी, गंभीर आणि चिंताजनक आहे,” असं देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करत म्हटले आहे.

“एका मंत्र्यांचा ओएसडी दुपारी फोन करून धमकी देतो आणि विरोधी पक्षाच्या सांगण्यावरून तुम्ही रेमडेसिवीर देऊच कसे शकता, असा जाब विचारतो आणि संध्याकाळी १० पोलीस त्यांना ताब्यात घेतात, हे सारेच अनाकलनीय आहे. पोलीस ठाणे आणि उपायुक्त कार्यालयात जाऊन याचा जाब विचारला. महाराष्ट्र आणि दमणच्या परवानग्या घेतल्या असताना, अधिकाधिक रेमडेसिवीर महाराष्ट्राला द्या, असे स्वतः केंद्रीय मंत्र्यांनी या कंपनीला सांगितले असताना, इतक्या गलिच्छ पातळीवर राजकारण होत असेल, तर हे फारच गंभीर आहे. झालेली घटना योग्य नाही आणि ती कायद्यानुसार नाही,” अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

काय आहे पार्श्वभूमी?


भाजपचे नेते आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, आमदार प्रसाद लाड हे पाच दिवसांपूर्वीच या कंपनीत जाऊन भेट देऊन आले होते. प्रदेश भाजपला 50 हजार रेमडेसिवीरची इंजेक्शनं देण्याची तयारी या कंपनीने दाखवली होती. ही इंजेक्शनं महाराष्ट्र सरकारला देण्याचे या दोन्ही नेत्यांनी जाहीर केले होते. त्यानंतर आज सकाळी रेमडेसिवीर इंजेक्शन पुरवठ्यावरून केंद्र विरुद्ध राज्य असा सामनाही रंगला होता. पण मध्यरात्री हा वाद थेट पोलीस स्थानकात पोहोचला. दरम्यान , Bruck Pharma कंपनीच्या संचालकांकडे जवळपास ६० हजार रेमडेसिवीरचा साठा असल्याच्या संशयावरून त्यांना चौकशीसाठी विलेपार्ले पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. त्यांनी चौकशीदरम्यान सर्व लीगल पेपर्स दाखवल्याने त्यांना अटक न करता चौकशी करून सोडून देण्यात आले आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी