मुंबई : येस बँक (Yes Bank)-डीएचएफएल (DHFL) फसवणूक प्रकरणी अटकेत असलेले पुण्यातील प्रसिद्ध व्यावसायिक अविनाश भोसले (Avinash Bhosale) यांना 10 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. सीबीआयने (CBI) केलेली कारवाई बेकायदेशीर असल्याचा भोसलेंचा दावा न्यायालयाने फेटाळला आहे. तसेच सीबीआयला अविनाश भोसलेंना मुंबईबाहेर नेण्यास मनाई कोर्टाने केली आहे.
सीबीआयने अविनाश भोसले यांना २६ मे रोजी पुण्यातून अटक केली होती. त्यानंतर मुंबईतील सीबीआय कोर्टात त्यांना २७ मे रोजी हजर करण्यात आले होते. सीबीआयनं भोसलेंची १० दिवसांकरता रिमांड मागितली होती. मात्र सीबीआयची कारवाई बेकायदेशीर असल्याचा दावा करत भोसलेंच्या वकिलांनी रिमांडला विरोध केला होता. अविनाश भोसले यांना YES BANK/DHFL घोटाळा प्रकरणात अटक केली होती. त्यानंतर त्यांना सीबीआय कोठडीत ठेवण्यात आले होते. आज त्यांची कोठडी संपत आली होती. त्यानंतर आज भोसले यांना मुंबई सत्र न्यायालयातील विशेष सीबीआय कोर्टात हजर करण्यात आले होते. २८, ३० आणि ३१ मे असे ३ दिवस युक्तीवाद करण्यात आला होता. यावेळी अविनाश भोसले यांना ८ जूनपर्यंत CBI कोठडी सुनावण्यात आली आहे.
गेल्या वर्षी जून 2021 मध्ये अविनाश भोसले आणि त्यांच्या कुटुंबीयातील सदस्यांच्या नावावर असलेली तब्बल 40 कोटी 34 लाख रुपयांची संपत्ती ईडीकडून जप्त करण्यात आली होती. विदेशी मुद्रा प्रबंधन अधिनियमांतर्गत ही कारवाई करण्यात आली होती. आता DHFL घोटाळा प्रकरणानंतर त्यांना सीबीआयकडून अटक करण्यात आली आहे.
महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेश शहरातून अविनाश भोसले रोजगाराच्या शोधात पुण्यात आले होते. त्यांनी आपल्या करिअरची सुरुवात रिक्षा चालक म्हणून केली होती. त्यावेळी ते पुण्यातील रस्ता पेठ भागात भाड्याच्या घरात राहत होते. अविनाश भोसले यांनी हळूहळू बांधकाम उद्योगाशी संबंधित लोकांशी ओळख वाढवली. यानंतर ते रस्ते तयार करण्याचं छोटं-मोठं काम घेऊ लागले. यानंतर ते पूर्णपणे बांधकाम व्यवसायात शिरले आणि आज कोट्यवधी रुपयांच्या ABIL ग्रुपचे मालक आहेत.