मिनी काश्मीरमध्ये कडाक्याच्या थंडीने भरली हुडहुडी,  महाबळेश्वरात पारा शून्यावर गेल्याने गोठले दवबिंदू

Cold Wave in Mahabaleshwar : मागील आठवड्यापासून राज्यात थंडीचा कडाका वाढला असून मंगळवारपासून मिनी काश्मीर म्हणून ओखळल्या जाणाऱ्या महाबळेश्वरामध्ये बुधवारी शून्य अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.  

Extreme cold in Mini Kashmir, dew point freezes in Mahabaleshwar as mercury drops to zero
मिनी काश्मीरमध्ये कडाक्याची थंडीने भरली हुडहुडी,  महाबळेश्वरात पारा शून्यावर गेल्याने दवबिंदू गोठले  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • तापमानात घसरण झाल्याने महाबळेश्वरमध्ये कडाक्याची थंडी पडली आहे.
  • वेण्णा तलावाजवळ तापमानाचा पारा खाली आला
  • तापमान शून्य अंशावर गेल्याने दवबिंदू गोठले होते.

सातारा : उत्तर भारताकडून येणाऱ्या थंडीच्या लाटेमुळे राज्यातील तापमानात मोठी घट झाली आहे. महाराष्ट्राचे मिनी काश्मीर म्हणून ओखळल्या जाणाऱ्या महाबळेश्वरात थंडीचा कडाका दिवसेंदिवस वाढत आहे. काल (१२ जानेवारी, बुधवार) मध्यरात्री महाराष्ट्राचे हिल स्टेशन असलेल्या महाबळेश्वरमध्ये शून्य अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. अचानक तापमान शून्य अंशावर गेल्याने वेण्णा लेक परिसरात दवबिंदू गोठले होते. (Extreme cold in Mini Kashmir, dew point freezes in Mahabaleshwar as mercury drops to zero)

दवबिंदू गोठून हिमकण तयार

नोव्हेंबर महिन्यांपासून महाबळेश्वरात पर्यटकांचा ओढा वाढता होता. नववर्षाच्या स्वागताला पर्यटकांनी मोठी गर्दी केली होती. मंगळवारी आणि बुधवारी महाबळेश्वरात चांगलाच गारठा वाढल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. महाबळेश्वरच्या वेण्णा लेक परिसरात सलग दुसऱ्या दिवशी तापमान शून्य अंशावर गेले आहे. वेण्णा लेक परिसरात तापमानाचा पारा भलताच उतरल्यामुळे दवबिंदू गोठून हिमकण तयार झाले होते. महाबळेश्वर शहर व परिसरात थंडीचा जोर वाढला असून या कडाक्याच्या थंडीमुळे निसर्गाची विविध आकर्षक रूपे व सृष्टीसौंदर्य पाहावयास मिळत आहे

काश्मीरची अनुभूती

वेण्णालेक परिसर, लिंगमळा परिसरामध्ये थंडीचा चांगलाच कडाका जाणवत आहेवाऱ्यांमुळे तापमानात घट झाली असून, महाबळेश्वरमध्ये आलेल्या पर्यटकांना देखील या थंडीचा सामना करावा लागतोय. त्यात बाजारामध्ये स्ट्राॅबेरीची आवक वाढल्याने रस्त्याच्या कडेला असलेल्या स्ट्राॅबेरी स्ट्राॅलकडे पर्यटकांची पाऊले वळत आहेत. सध्या पर्यटकांना महाबळेश्वर काश्मीरप्रमाण भासत आहे. 

कोवीड निर्बंध

त्यात ओमिक्रोनच्या संकटामुळे कोविड निर्बंध कडक करण्यात आले आहेत. महाबळेश्वर परिसरातील पर्यटनस्थळे तूर्त बंद ठेवण्यात आली आहे. वेण्णा लेकमधील बोटिंगही बंद आहे. हॉटेल ५० टक्के क्षमतेनं सुरू आहेत. केवळ लॉजिंग पूर्ण क्षमतेनं सुरू आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी