माजी सहकारमंत्र्याच्या पुत्राने केली सहकार मंत्र्याची गोची, जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीत भरला अर्ज

सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्यास आजपासून सुरवात झाली. पहिल्याच दिवशी कराड विकास सेवा सोसायटी मतदारसंघातून जिल्हा परिषद सदस्य ॲड. उदयसिंह पाटील उंडाळकर यांनी आपला अर्ज दाखल केला आहे.

Former Co-operation Minister's son made a problem for Co-operation Minister, filed an application in the District Bank election
माजी सहकारमंत्र्याच्या पुत्राने केली सहकार मंत्र्याची गोची, जिल्हा बॅंकेच्या निवडणूकीत भरला अर्ज  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणूक
  • कराड विकास सेवा सोसायटी मतदारसंघातून ॲड. उदयसिंह पाटील उंडाळकर यांचा अर्ज
  • सहकार मंत्री बाळसाहेब पाटील यांच्यापुढे अडचण निर्माण

सातारा : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणूक जाहीर झाली असून आजपासून अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली. पहिल्याच दिवशी कराड विकास सेवा सोसायटी मतदारसंघातून माजी सहकारमंत्री विलासकाका पाटील, उंडाळकर यांचे पुत्र जिल्हा परिषद सदस्य ॲड. उदयसिंह पाटील उंडाळकर यांनी आपला अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. (Former Co-operation Minister's son made a problem for Co-operation Minister, filed an application in the District Bank election)

निवडणूक बिनविरोध करण्याचे प्रयत्न

सातारा जिल्हा मध्यवर्ती बॅंकेची निवडणूक जाहीर झाली आहे. आज सुमारे ८९ अर्जांची विक्री झाली असून यामध्ये अनेक आजी, माजी संचालकांनी अर्ज विकत नेले आहेत. ही निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी सत्ताधारी गटाचा प्रयत्न आहे. यासाठी विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, बाळासाहेब पाटील, शिवेंद्रसिंहराजे भोसले, शशिकांत शिंदे यांचे प्रयत्न सुरु आहेत. राज्याचे सहकार मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळसाहेब पाटील हे कराड विकास सेवा सोसायटी मतदारसंघातूनच अर्ज भरणार होते. मागील काही दिवसांपासून त्यांनी तशी तयारी केली होती. मात्र, उंडाळकरांनी दाखल केलेल्या या अर्जामुळे सहकारमंत्री पाटील यांची गोची झाली आहे.

उंडाळकरांचा पारंपारिक मतदारसंघ

बॅंकेच्या प्राथमिक कृषी पतपुरवठा मतदारसंघातील अकरा जागा सोडल्यातर उर्वरित सात मतदारसंघात सातारा तालुका सर्वाधिक निर्णायक ठरणार आहे. त्यापाठोपाठ कराड, फलटण आणि पाटण तालुका आहे. कराड मतदारसंघातून १९६७ पासून विलासराव पाटील-उंडाळकर प्रतिनिधित्व करीत आहेत. सलग ११ वेळा याच मतदारसंघातून काका बँकेत संचालक राहिले. त्यांच्या निधनानंतर काकांच्या जागेवर त्यांचे सुपुत्र उदयसिंह पाटील यांनी काॅंग्रेसच्या वरिष्ठ नेतेमंडळीच्या सल्ल्याने व कराड सोसायटी मतदारसंघातील मतदाराशी चर्चा करून उमेदवारी निश्चित केली.  

सहकारमंत्र्यांना पराभवाची सल भरु काढण्याची इच्छा

मात्र, याच मतदारसंघातून सहकार मंत्री बाळासाहेब पाटील हे जिल्हा बँकेत संचालक म्हणून येण्याची तयारी केली होती. त्यानुसार त्यांनी ठराव ही केलेले आहेत. यापूर्वी सहकार मंत्र्यांना निवडून येऊन संचालक होता आलेले नाही. विलासकाका उंडाळकर यांच्या नेतृत्वाखाली एकदा खासदार उदयनराजे भोसले यांच्याकडून तर एकदा ॲड. उदयसिंह पाटील यांच्याकडून पराभव पत्करावा लागला होता. त्यामुळे यंदा राष्ट्रवादीकडून कोणत्याही परिस्थितीत सहकार मंत्र्यांना याच मतदारसंघातून निवडून आणण्याची तयारी केली जात आहे. त्यामुळे या मतदारसंघासाठी राष्ट्रवादीचे नेते कोणती भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी