अंत्योदत्य एक्सप्रेस ५०० फूट दरीत कोसळली असती, पण चालकामुळे वाचली!

गावगाडा
Updated Jul 18, 2019 | 11:24 IST

कसारा-इगतपुरीदरम्यान आज पहाटेच्या दरम्यान रेल्वे रुळावरुन खाली घसरली. पण यावेळी फक्त चालकाच्या प्रसंगावधानामुळे मोठी दुर्घटना टळली. 

Railway accident_ twitter
तर अंत्योदत्य एक्सप्रेस ५०० फूट दरीत कोसळली असती!  |  फोटो सौजन्य: Twitter

कसारा: गोरखपूर अंत्योदय ही एक्सप्रेस आज (गुरुवार) पहाटे चारच्या सुमारास कसारा घाटात रुळावरुन अचानक घसरली, पण चालकाच्या प्रसंगावधानामुळे मोठी दुर्घटना टळली. कसारा घाटातील भाम नदीच्या उंच पुलावरुन जात असतानाच हा अपघात घडला. पण वेळीच चालकाने ब्रेक लावल्याने मोठी जीवितहानी टळली. चालकाने जर अपघात वेळीच टाळला नसता तर या एक्सप्रेसचे दोन डब्बे थेट ५०० फूट खोल दरीत कोसळले असते. पण सुदैवाने चालकाला वेळीच घडला प्रकार लक्षात आल्याने त्याने तात्काळ ब्रेक दाबत एक्सप्रेसला आवर घातला. त्यामुळे चालकाने ज्या शिताफीने संपूर्ण गाडी रोखली त्याचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. 

दरम्यान, या अपघातामुळे मुंबई-नाशिक ही रेल्वे सेवा विस्कळीत झाली आहे. रुळावरुन घसरलेला डब्बा हटवण्याचं काम युद्धपातळीवर सुरु आहे. या अपघातामुळे एक मार्गिका पूर्णपणे ठप्प झाली आहे. पण मध्य आणि अप मार्ग सुरु असल्याने वाहतूक काही अंशी सुरु आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून सुटलेली गोरखपूर अंत्योदय एक्सप्रेस ही इगतपुरीजवळ कसारा घाटात रुळावरुन अचानक घसरली. या अपघातामुळे मुंबई-नाशिक ही पंचवटी एक्सप्रेस रद्द करण्यात आली आहे.  तसेच या मार्गावरील इतरही अनेक लांब पल्ल्याच्या गाड्या या उशिराने धावत आहेत. 

या अपघाताची रेल्वे प्रशासनाला माहिती मिळताच संबंधित रेल्वे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत रुळावरुन घसरलेला डब्बा बाजूला करण्याचं काम तात्काळ सुरु केलं. उंच पुलावर रेल्वे घसरल्याने तो बाजूला काढण्यास बऱ्याच अडचणी येत आहे. 

दरम्यान, काही दिवसांपासूनच मुंबई- पुणे रेल्वे मार्गावर लोणावळ्याच्या घाटात मालगाडी घसरली होती. मालगाडी रूळावरून घसरल्यानं वाहतूक विस्कळीत झाली होती. ही दुर्घटना देखील पहाटे साडेचारच्या सुमारासच घडली होती. या घटनेनं पुण्याकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली होती. त्यामुळे मुंबईकडे येणाऱ्या वाहतुकीवरही त्याचा मोठा परिणाम झाला होता. कर्जतजवळच्या घाटात जामरूंग आणि ठाकूरवाडी स्थानकादरम्यान मालगाडीचे हे डबे घसरले होते. मालगाडीचे जवळपास पाच ते सहा डबे घसरले होते.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
अंत्योदत्य एक्सप्रेस ५०० फूट दरीत कोसळली असती, पण चालकामुळे वाचली! Description: कसारा-इगतपुरीदरम्यान आज पहाटेच्या दरम्यान रेल्वे रुळावरुन खाली घसरली. पण यावेळी फक्त चालकाच्या प्रसंगावधानामुळे मोठी दुर्घटना टळली. 
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...