मुंबई : महाराष्ट्रात आज दिवसभर हायव्होल्टेज ड्रामा सुरूच होता. शिवसेना नेते एकनाथ शिंदे गट आणखी मजबूत होत आहे. आता एकनाथ शिंदे यांचा दावा आहे की, त्यांच्याकडे शिवसेना आणि अपक्षांसह ४६ आमदार आहेत. दुसरीकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेनेच्यावतीने १२ आमदारांवर बडतर्फ करण्याची मागणी केली आहे.
अधिक वाचा :
नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर महाविकास आघाडी सरकार अडचणीत आले आहेत. अशा वेळी मुंबईपासून गुवाहाटीपर्यंत सर्वत्र विविध घटनाक्रमांना वेग आला आहे. दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्या गटात एक-एक आमदारांची संख्या वाढत आहे. गुवाहाटीतील हॉटेल रॅडिसन ब्लूमध्ये आणखी काही आमदार दाखल झाले आहेत. यात आमदार संजय राठोड, दादा भुसे आणि एम.एस.ली रविंद फाटक यांचा सहभाग आहे. उद्धव ठाकरेंनी बंडखोर आमदारांशी बोलण्यासाठी ज्या दोन लोकांना सुरतला पाठवले त्यात फाटक यांचाही समावेश आहे.
अधिक वाचा :
उद्धव ठाकरेंना आणखी एक धक्का? अनेक नगरसेवक शिंदे गटाच्या संपर्कात
दरम्यान, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी बोलावलेल्या बैठकीला उपस्थित न राहणाऱ्या पक्षाच्या शिवसेनेच्या 12 आमदारांवर कारवाईची मागणी शिवसेनेकडून गटनेते अजय चौधरी, पक्षप्रतोद सुनील प्रभू, उच्च शिक्षणमंत्री उदय सामंत, राजन साळवी यांच्यावतीने विधानसभेचे उपसभापती नरहरी झरवळ यांना करण्यात आली आहे. त्या आमदारांना अपात्र घोषित करावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
या १२ आमदारांंमध्ये एकनाथ शिंदे, तानाजी सावंत,प्रकाश सुर्वे, बालाजी किणीकर, अनिल बाबर,लता सोनावणे, यामिनी जाधव, संजय शिरसाट, भरत गोगावले, संदिपान भुमरे,अब्दुल सत्तार, महेश शिंदे यांचा समावेश आहे.
त्याचवेळी एकनाथ शिंदे यांनी ट्विट केले आहे. त्यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, तुम्ही कोणाला घाबरवण्याचा प्रयत्न करत आहात?, तुमच्या पद्धती आणि कायदे आम्हाला माहीत आहेत. राज्यघटनेच्या 10 व्या अनुसूचीनुसार, व्हीप हा विधानसभेसाठी नसून कामकाजासाठी आहे. याबाबत सर्वोच्च न्यायालयाचे अनेक निर्णय आहेत. 12 आमदारांवर कारवाईसाठी अर्ज करून तुम्ही आम्हाला घाबरवू शकत नाही. कारण आदरणीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे आम्ही खरे शिवसैनिक आहोत. आम्हाला कायदा माहीत आहे, त्यामुळे आम्हाला धमकावू नका, तुमच्याकडे नंबर नाहीत तरीही तुम्ही सरकार चालवत आहात. आता आम्ही तुमच्यावर कारवाईची मागणी करतो.